ताणतणाव, अपुरी झोप, प्रदूषण या सर्वाचा परिणाम वंध्यत्वावर होत असल्याचे निष्कर्ष यापूर्वीच जाहीर झाले आहेत. त्यातच झोपेच्या वेळा बदलल्या की त्याचा परिणाम मेंदूमधून स्रवणाऱ्या गर्भधारणेसाठी आवश्यक हार्मोन्सवर होत असल्याने रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या दिसत असल्याचे प्रसुतितज्ज्ञांचे मत आहे. सध्याच्या काळातील ताणतणावाने आधीच घायकुतीला आलेल्या महिलांना राज्य सरकारच्या रात्रपाळीच्या निर्णयाचा असाही फटका बसणार आहे.
जगभरात साधारण १५ टक्के जोडप्यांमध्ये या ना त्या कारणाने वंध्यत्व येते. आर्थिकदृष्टय़ा खालच्या स्तरात कुपोषितपणामुळे तर वरच्या स्तरात स्थूलता, वय, ताण-तणाव, गर्भधारणेची क्षमता आदी कारणांमुळे जोडप्यांना मूल होत नाही. शहरातील अधिकाधिक गुंतागुंतीची होत जाणारी जीवनशैली, उशिरा झालेली लग्न ही वंधत्वाची प्रमुख कारणे दिसतात. गेल्या दशकभरात कृत्रिम गर्भधारणेबाबत वेगाने झालेले बदल व त्यासाठी खर्च करण्याची आलेली क्षमता यामुळे शहरातील कृत्रिम गर्भधारणा केंद्राकडे मदतीसाठी जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. यात एका मूलानंतर गर्भधारणा होत नसल्याची समस्या घेऊन येणारेही असतात. इतर सर्व कारणांसोबत जोडप्याचे वाढलेले वय हे दुसऱ्या मुलाच्या गर्भधारणेतील प्रमुख अडथळा असतो. याबाबत नोव्हा आयव्हीआय केंद्राने त्यांच्याकडे आलेल्या जोडप्यांच्या केलेल्या अभ्यासात मुंबईतील २० टक्के जोडप्यांना दुसऱ्या मुलावेळी समस्या जाणवल्या.  लग्नानंतरही सातत्याने कामाच्या ठिकाणी अधिक वेळ घालवणारे नवरा बायको हे कारणही ठसठशीतपणे दिसत आहे, असे नोव्हा आयव्हीआय केंद्राच्या संचालक डॉ. रिचा जगताप म्हणाल्या.
वंध्यत्वात पुरुषांचाही दोष
गर्भनलिकेतील दोष (१६.७० टक्के), पुरुषांमधील दोष (३२ टक्के), अनिश्चित कारण (१८.७० टक्के), गर्भाशयातील दोष (३ टक्के), एकापेक्षा अधिक कारणे (२३.६० टक्के), इतर कारणे (२.९० टक्के) वंधत्वासाठी कारणीभूत ठरतात. यात पुरुषांच्या शुक्रजंतूंची संख्या तसेच क्षमतेचा संबंध येतो. शारीरिक दोषांसोबतच सिगारेट ओढणे, ड्रग्ज, प्रदूषण व किरणोत्सर्ग तसेच कर्करोग, मधुमेह, संसर्ग अशा कारणांमुळे गर्भधारणा होताना समस्या येतात.