आपल्यापैकी काहीजणांना संगणकाचा किंवा एखाद्या फाईलचा पासवर्ड लक्षात ठेवणे कटकटीचे काम असल्याचा अनुभव अनेकदा आला असेल. एकीकडे महत्वाच्या फाईलचा पासवर्ड सोपा ठेवणे म्हणजे संगणक हॅकर्सचे काम सोपे केल्यासारखे होते. तर दुसरीकडे, गुंतागुंतीचा पासवर्ड ठेवल्यास तो विसरण्याची किंवा गोंधळ उडण्याचीच शक्यता अधिक असते. अशावेळी संगणकातील आपली माहिती नक्की कशाप्रकारे सुरक्षित ठेवता येईल, असा पेचप्रसंग संगणक वापरकर्त्यांसमोर उभा राहतो. मात्र, एका नवीन तंत्रामुळे पासवर्ड विसरण्याचा धोका आता इतिहासजमा होणार आहे. ‘फेसलॉक’ हे तंत्रज्ञान मानवामधील चेहरा ओळखण्याच्या उपजत मानसिकतेवर आधारलेले आहे. एकदा बघितलेला चेहरा किंवा चित्र लक्षात ठेवण्याची अचाट क्षमता मानवी मेंदूमध्ये सामावलेली असते. मानवी मेंदू कितीही धूसर अथवा अस्पष्ट असलेले चित्र स्वतःकडे साठवून, हव्या त्या वेळेस पुन्हा आपल्या नजरेसमोर आणू शकतो. एखाद्या अनोळखी चेहऱ्याविषयी अंदाज बांधणे म्हणजे एखाद्या अनोळखी भाषेत संवाद साधण्याइतके कठीण असते. ब्रिटनच्या यॉर्क विद्यापीठातील रॉब जेनकिन्स यांच्या म्हणण्यानुसार, अनोळखी व्यक्ती किंवा भाषेविषयी अंदाज बांधणे म्हणजे जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट असते. ‘फेसलॉक’ तंत्रज्ञानाचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीचा चेहरा आपला पासवर्ड म्हणून ठेवू शकता. कोणत्याही छायाचित्रात असणारा तुमच्या प्रिय व्यक्तींचे चेहरा तुम्ही सहजपणे ओळखू शकता. त्यामुळे या प्रिय व्यक्तींच्या वेगवेगळ्या रंगरूपांतील छायाचित्रांची माहिती फक्त तुमच्याच मेंदूत साठविली गेली असते. तुमच्या मेंदूतील या अंतर्गत माहितीचा वेध घेणे दुसऱ्या व्यक्तीला शक्य नसल्याने, फेसलॉक तंत्राद्वारे या माहितीचा उपयोग तुमच्या पासवर्डसारखा होऊ शकतो. त्यामुळे आता या नवीन तंत्राच्या साह्याने संगणक वापरकर्ते पासवर्ड विसरण्याच्या भीतीवर सहजपणे मात करू शकतात.