उन्हाळा असो वा पावसाळा, दिवसभर शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतच राहतं. घाम, लघवी आणि श्वसनाद्वारे आपल्या नकळत पाणी व क्षारांची मोठ्या प्रमाणावर हानी होते. केवळ पाणी पिणं पुरेसं नसतं. कारण- त्यातून शरीराला आवश्यक असलेले इलेक्ट्रोलाइट्स म्हणजेच सोडियम व पोटॅशियम पुन्हा मिळत नाहीत. अशा वेळी लोक सर्वसाधारणपणे ORS (ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन) किंवा नैसर्गिक पर्याय म्हणून नारळपाण्याचा वापर करतात. पण नेमकं योग्य काय नारळपाणी की ओआरएस, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करून राहिलेला असतो.

डॉ. स्मृती झुनझुनवाला (पोषणतज्ज्ञ) सांगतात की, डिहायड्रेशन म्हणजे फक्त पाण्याची कमतरता नाही. त्यामुळे इलेक्ट्रोलाइट्सचेही नुकसान होते. शरीरातील तापमानात बदल होणे, लघवी घट्ट होणे, अशक्तपणा येणे ही त्याची प्रमुख लक्षणं आहेत. अशा वेळी साधं पाणी पुरेसं नसतं. त्यामुळे जास्त हायड्रेशन इंडेक्स असलेले पेयं अधिक परिणामकारक ठरतात.

ओआरएस का आणि केव्हा?

उष्ण हवामान, अतिसार, उलट्या किंवा जोरदार व्यायाम यांमुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण झपाट्यानं कमी होऊ शकते. अशा वेळी ओआरएस सर्वात विश्वासार्ह पर्याय आहे. कारण- त्यात ग्लुकोज, सोडियम व पोटॅशियम यांचं संतुलित मिश्रण असतं. हे मिश्रण अतिशय लवकर रक्तात शोषलं जातं आणि शरीराला त्वरित ऊर्जा व द्रव परत मिळतात. हे तीव्र किंवा मध्यम डिहायड्रेशनमध्ये वापरावे.

नारळपाणी कितपत उपयोगी?

नारळपाणी नैसर्गिक, हलकं व चविष्ट असल्यामुळे सौम्य डिहायड्रेशन किंवा रोजच्या पाण्याच्या भरपाईसाठी उत्तम आहे. त्यात पोटॅशियम मुबलक प्रमाणात असलं तरी सोडियम कमी असल्यानं गंभीर डिहायड्रेशनमध्ये ते अपुरं पडू शकतं. म्हणून तज्ज्ञ म्हणतात की, नारळाच्या पाण्यानं सौम्य तहान भागवा, परंतु जर तुम्हाला खूप थकवा येत असेल किंवा मळमळ व जुलाब होत असतील, तर ओआरएसची निवड करा.

किती प्रमाणात घ्यावं?

नारळपाणी – दिवसाला एिक ते दोन ग्लास (सुमारे २०० ते ४०० मिली) पुरेसं आहे.

ओआरएस – प्रत्येक वेळेस द्रव कमी झाल्यावर २००-४०० मिली सावकाश प्या.

नैसर्गिक पर्याय कोणते?

लिंबूपाणी (मीठ व साखर मिसळून) प्यायल्यानं शरीराला सोडियम आणि ऊर्जा त्वरित मिळते. ताकात मीठ व भाजलेलं जिरं टाकल्यास पचन सुधारतं आणि शरीरात थंडावा टिकून राहतो. डाळिंब पोटॅशियमयुक्त असल्यामुळे रक्तातील क्षारांची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते. केळी हे नैसर्गिक ओआरएस असल्यामुळे थकवा, स्नायूंचे ताण व इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता दूर करण्यासाठी उत्तम आहे. डॉ. झुनझुनवाला सांगतात की, पिण्याइतकंच ‘खाणं’देखील महत्त्वाचं – कलिंगड, टोमॅटो, काकडी, दही हे पाण्यानं समृद्ध असलेले अन्नप्रकार दीर्घकाळ हायड्रेट ठेवू शकतात.

रोजच्या ताजेतवानेपणासाठी नारळपाणी उत्तम; पण आजारपणात किंवा अतितहान लागल्यास ओआरएस सर्वांत प्रभावी. दोन्ही योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतल्यास डिहायड्रेशनवर मात करणं अगदी सोपं होतं शरीराचं ऐका आणि योग्य वेळी योग्य पेय निवडा!