Ovarian Cancer Symptoms: ओव्हरी कॅन्सर (Ovarian Cancer) म्हणजे महिलांच्या अंडाशयाला ग्रासणारा कर्करोग. अंडाशय हा महिलांच्या प्रजनन प्रणालीचा भाग आहे. स्तनाच्या कर्करोगानंतर महिलांना सर्वाधिक प्रमाणात होणारा हा दुसरा कर्करोग आहे.
जगभर अंडाशयाच्या कर्करोगाला ‘सायलेंट किलर’, असे म्हटले जाते. कारण- याची सुरुवातीची लक्षणे फार किरकोळ आणि सामान्य स्वरूपाची वाटतात, ज्याकडे महिला अनेकदा दुर्लक्ष करतात. अंडाशयाचा कर्करोग हा महिलांमध्ये तिसरा सर्वांत सामान्य स्त्रीरोगाशी संबंधित कर्करोग आहे आणि अमेरिकेत महिलांच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये हे पाचवं सर्वांत मोठं कारण आहे. २०२४ च्या आकडेवारीनुसार, जगभरात या कर्करोगाची सुमारे ३,२४,६०३ नवीन प्रकरणे नोंदवली गेली; तर २,०६,९५६ महिलांचा मृत्यू झाला.
अंडाशयाचा कर्करोग हा सहसा अंडाशयात होणाऱ्या घातक ट्यूमरपासून सुरू होतो. त्यापैकी एपिथीलियल ओव्हरी कॅन्सर सर्वांत सामान्य प्रकार आहे. महिलांमध्ये याचा आयुष्यभर होण्याचा सरासरी धोका सुमारे १.३% आहे; पण वय वाढणे, कुटुंबात कर्करोगाचा इतिहास असणे आणि काही विशिष्ट जीन्समधील बदल (म्युटेशन) यांमुळे हा धोका खूप वाढतो. म्हणून याची सुरुवातीलाच ओळख होणे फार महत्त्वाचे आहे.
कॅन्सर काउंसिलच्या माहितीनुसार, अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणे अनेकदा स्पष्ट दिसत नाहीत; पण शरीरात काही बदल होतात, ज्यांकडे लक्ष दिल्यास या आजाराची सुरुवातीलाच ओळख पटू शकते. जर अंडाशयाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कळला, तर सुमारे ९०% महिलांना जास्त आयुष्य मिळू शकते; पण फक्त १५–२०% प्रकरणांत सुरुवातीच्या टप्प्यात ओळख पटते. याचे मुख्य कारण म्हणजे महिला आपल्या शरीरातील छोटे छोटे बदल गांभीर्याने घेत नाहीत.
अंडाशयाचा कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे (Ovarian Cancer Early Signs)
सतत पोट फुगणे किंवा सूज येणे
सतत पोट फुगणे किंवा गॅसची समस्या सामान्य असते; पण ही समस्या अनेक दिवस टिकली आणि कपडे घट्ट होऊ लागले, तर ते अंडाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
पचनसंस्थेत बदल आणि बद्धकोष्ठता
दीर्घकाळ टिकणारी बद्धकोष्ठता, वारंवार पोटदुखी किंवा पोट खराब होणे ही सामान्य गोष्ट नाही. हीदेखील अंडाशयाचा कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
सतत पेल्विक किंवा पोटदुखीचा त्रास होणे
मासिक पाळीशी संबंधित वेदना सामान्य असतात; पण खालच्या पोटात किंवा पाठीच्या खालच्या भागात सतत वेदना होत राहिल्या किंवा संभोगाच्या वेळी त्रास होत राहिला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
लवकर पोट भरल्यासारखे वाटणे किंवा भूक न लागणे
जर थोडेसे खाल्ल्यावरही पोट भरल्यासारखे वाटू लागले, तर ते सामान्य नाही. हे ट्यूमर किंवा पोटात द्रव साठल्यामुळे होऊ शकते. त्याशिवाय सतत थकवा येणे, भूक न लागणे, कारण नसताना वजन कमी होणे किंवा वाढणे हीसुद्धा सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
वारंवार लघवी लागणे किंवा लघवीच्या सवयींमध्ये बदल होणे
जास्त पाणी न पितादेखील वारंवार लघवीची इच्छा होत असेल किंवा अचानक लघवी आवरणे कठीण होत असेल, तर ते अंडाशयाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
BEACH ट्रिकने लक्षणे लक्षात ठेवा
तज्ज्ञांच्या मते, अंडाशयाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी ‘BEACH’ फॉर्म्युला खूप उपयोगी ठरू शकतो. त्यापैकी कोणतेही लक्षण २–३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकले आणि घरगुती उपायांनी फरक पडला नाही, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
B – Bloating (पोट फुगणे)
E – Early Satiety (लवकर पोट भरल्यासारखे वाटणे)
A – Abdominal Pain (पोट किंवा पेल्विक दुखणे)
C – Changes in bowel/bladder (शौच किंवा लघवीच्या सवयींमध्ये बदल)
H – Heightened Fatigue (सतत थकवा येणे)