Diwali air pollution effects: दरवर्षी दिवाळीचा सण आनंद, प्रकाश आणि एकतेचे प्रतीक ठरतो. प्रत्येक घरात दिव्यांचा उजेड पसरतो, फटाक्यांचा आवाज आकाश गाजवतो आणि अशा या झगमगाटात आणि दणदणाटात आनंदाचे क्षण साजरे केले जातात. पण या सणाच्या जल्लोषानंतर वातावरणात एक काळी बाजू दिसून येते आणि ती म्हणजे वाढते वायुप्रदूषण. दिवाळीनंतर देशातील अनेक शहरांमध्ये हवेतील प्रदूषणाचे प्रमाण भयंकर पातळीवर पोहोचते. चमचमत्या दिव्यांच्या सणाचा आनंद काही तासांचा असतो; पण त्यानंतरचे प्रदूषण दिवसेंदिवस आरोग्यावर गंभीर परिणाम करीत राहते.
दिवाळीनंतर प्रदूषणात वाढ का होते?
दिवाळीनंतर प्रदूषणात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे फटाके फोडणे. फटाक्यांमधून कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि जड धातूंचे सूक्ष्म कण (PM2.5 आणि PM10) हवेत मिसळतात. हे सूक्ष्म कण फुप्फुसांपर्यंत पोहोचून रक्तातही प्रवेश करतात आणि श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम करतात.
त्याशिवाय पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये शेतीतील पराली जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर हवेतील प्रदूषण आणखीनच वाढवतो. हिवाळ्याच्या सुरुवातीला हवामान थंड असल्याने हे प्रदूषक हवेतच अडकतात आणि जमिनीच्या जवळ राहतात. त्यातच दिवाळीच्या सुटीमुळे वाढलेली वाहनांची रहदारी, बाजारातील गर्दी, तसेच शहरांमध्ये सतत सुरू असलेले बांधकाम आणि धुळीचे प्रदूषण या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून वातावरण अधिकच दूषित होते.
आरोग्यावर होणारे परिणाम
१. श्वसनसंस्थेवर होणारे दुष्परिणाम
दिवाळीनंतर हवेत वाढलेल्या प्रदूषणामुळे श्वसनासंबंधीच्या तक्रारी वाढतात. दमा, ब्राँकायटिस किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD)सारखे आजार असलेल्या लोकांना या काळात अधिक त्रास जाणवतो. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर या प्रदूषित हवेचा सर्वाधिक दुष्परिणाम होतो. या काळात अनेकांना सतत खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत जडपणा जाणवणे आणि घशात जळजळ किंवा कोरडेपणा जाणवणे, अशी लक्षणे दिसून येतात. हवेतील सूक्ष्म कण फुप्फुसात अडकून श्वास घेणे कठीण करतात आणि त्यामुळे शरीरात अशक्तपणा येऊन थकवा जाणवू शकतो.
२. डोळे व त्वचेच्या समस्या
दिवाळीनंतर फटाक्यांमुळे हवेत खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थ मिसळतात, जसे सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड. या धुरामुळे डोळ्यांची जळजळ होणे, पाणी येणे, डोळे लाल होणे किंवा खाज सुटणे, असे त्रास सुरू होतात. काही लोकांना या धुरामुळे त्वचेवर पुरळ, लालसरपणा किंवा अॅलर्जीचाही त्रास होतो. विशेषतः ज्यांची त्वचा संवेदनशील असते, त्यांना याचा त्रास जास्त होतो. दिवसभर बाहेर राहणाऱ्या लोकांच्या त्वचेवर धूळ आणि प्रदूषण साचल्यामुळे त्यांची खाज, कोरडेपणामुळे चिडचिड होऊ शकते. त्यामुळे अशा काळात चेहरा आणि त्वचा स्वच्छ ठेवणे, डोळे थंड पाण्याने धुणे आणि शक्य असल्यास बाहेर पडताना सनग्लासेस वापरणे फायदेशीर ठरते.
३. हृदयविकाराचा धोका
दिवाळीनंतर हवेत वाढलेले सूक्ष्म कण, म्हणजे PM2.5 सारखे प्रदूषक श्वासावाटे शरीरात जातात आणि रक्तात मिसळतात. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयावर ताण येतो. ज्यांना आधीपासून हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह आहे, त्यांच्यासाठी हा काळ विशेष धोकादायक ठरतो. अशा लोकांना छातीत दुखणे, थकवा, चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. प्रदूषणामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. म्हणूनच प्रदूषणाच्या दिवसांत शक्यतो बाहेर कमी वेळ राहणे, हलका आहार घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे नियमितपणे घेणे महत्त्वाचे आहे.
४. मानसिक आरोग्यावर परिणाम
दिवाळीनंतर हवेतले प्रदूषण फक्त शरीरावर नाही, तर मनावरही परिणाम करते. सतत धूर आणि घुसमटलेल्या वातावरणामुळे डोके जड वाटणे, डोकेदुखी होणे व थकवा जाणवणे सामान्य गोष्ट होते. शुद्ध हवा न मिळाल्याने शरीरात ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचतो. त्यामुळे एकाग्रता कमी होते आणि मन सतत अस्वस्थ राहते. काही लोकांना चिडचिडेपणा, झोप न लागणे किंवा थकवा जाणवतो. काही अभ्यासांनुसार, ज्या शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण जास्त असते, तिथे नैराश्य आणि चिंतेसारख्या मानसिक समस्या वाढताना दिसतात. म्हणूनच या काळात मन शांत ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे, हलके फिरणे, संगीत ऐकणे आणि तुमच्या घरातील हवा स्वच्छ ठेवणे हे उपयुक्त उपाय आहेत.
५. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे
प्रदूषणामुळे शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. या काळात फ्लू आणि सर्दीचे प्रमाणही वाढलेले असते, त्यामुळे संसर्गाचा धोका जास्त असतो.
स्वतःचे संरक्षण कसे करावे?
दिवाळीनंतरच्या प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. बाहेर जाताना नेहमी N95 मास्क वापरावा. कारण- तो धूर आणि धूळ आत जाण्यापासून थांबवतो. घरात एअर प्युरिफायर लावल्यास हवा स्वच्छ राहते आणि दरवाजे-खिडक्या बंद ठेवल्याने बाहेरील प्रदूषण आत येत नाही. पहाटे किंवा रात्री उशिरा बाहेर व्यायाम करणे टाळावे. कारण- त्या वेळी हवेतील प्रदूषणाचे प्रमाण जास्त असते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि फळे, भाज्या, हळद यांसारखे अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थ खा, जे शरीरातील विषारी घटक कमी करण्यात मदत करतात. तसेच AQI एयर क्वालिटी इंडेक्स, (SAFAR) सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फॉरेकास्टिंग अँड रिसर्च किंवा Plume Labs यांसारख्या मोबाईल अॅप्सवरून आपल्या परिसरातील हवेची गुणवत्ता तपासत राहा आणि प्रदूषण वाढल्यास बाहेर जाणे टाळा.