फ्रान्स सरकारकडून दिला जाणाऱ्या ‘ऑर्डर ऑफ अॅग्रीकल्चर मेरीट’ या पुरस्काराने भारतीय शेफ प्रियम चॅटर्जी याला गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळवणारा प्रियम हा पहिलाच भारतीय ठरला आहे. पारंपारिक भारतीय आणि फ्रेन्च डिशेशचे पुनरुज्जीवन करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल सोमवारी त्याला फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांड्रे झिगलर यांच्या हस्ते फ्रान्सच्या दुतावासात हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रियम चॅटर्जी (वय ३०) हा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. बंगालमधील पारंपारिक डिशेश बनवण्याची त्याची खासीयत आहे. विशेष म्हणजे या रुचकर पारंपारिक भारतीय डिशेशसोबत फ्रेन्च डिशेश बनवण्यातही तो पटाईत आहे.

फ्रान्स सरकारे केलेल्या गौरवाबद्दल बोलताना प्रियम म्हणाला, “माझ्या पाककृतीवर परिणाम करणारे दोन मोठे घटक म्हणजे माझे कुटुंब आणि फ्रान्स. माझा जन्म अशा बंगाली कुटुंबात झाला ज्यामध्ये स्वयंपाकी आणि कलाकार मंडळी होती. आमच्या कुटुंबात मेजवाणी नेहमीच असायची. त्यामुळे लहानपणापासूनच माझ्यामध्ये जेवण तयार करणे, चवीने खाणे आणि जेवण आकर्षक पद्धतीने सर्व्ह करणे याचे संस्कार घडले होते. हैदराबादच्या पार्क हयात या हॉटेलमध्ये माझी पहिली शेफ म्हणून व्यावसायिक कारकिर्द सुरु झाल्यानंतर येथे माझी फ्रेंच शेफ जीन क्लॉड यांची भेट झाली ज्यांनी मला फ्रेंच पाककृतीचे प्रशिक्षण दिले, त्यानंतर मला माझ्या करियरला दिशा मिळाली. क्लॉड यांनी येथे मला जे शिकवले त्यामुळे मी पूर्णपणे फ्रान्सच्या प्रेमात पडायला भाग पडलो.”

प्रियम सध्या फ्रान्समधील एका नैकेतील जान रेस्टॉरंट येथे हेड शेफ म्हणून काम करीत आहे. यापूर्वी तो मेहरॉली येथील ‘रुह’ आणि ‘क्ला’ या दोन्ही रेस्तराँचा मुख्य शेफ होता. दरम्यान, पाककलेबरोबरच संगीतामध्येही प्रियमला रस आहे. प्रियममधील या गोष्टींची दखल घेत फ्रेन्च दूतावासामध्ये पहिल्यांदाच आम्ही एखाद्या शेफच्या कलागुणांचा उत्सव साजरा करीत आहोत, असे फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांड्रे झिगलर यांनी म्हटले आहे. हा सन्मान तुमचे कौशल्य आणि फ्रेंच पाककृतीला प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेसाठी देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

फ्रेंच रिपब्लिककडून १८८३पासून ‘Ordre du Mrite Agricole’ (ऑर्डर ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल मेरिट) कृषी, कृषी-खाद्य उद्योग आणि पाककला या क्षेत्रांमध्ये अमुल्य योगदान देणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.