पूरस्थ ग्रंथी म्हणजे प्रोस्टेट कर्करोगात सध्याच्या निदानपद्धती फारशा अचूक नाहीत त्यामुळे त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर करून घेता येईल, असे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे. दी लॅन्सेट ऑनकोलॉजी या नियतकालिकात म्हटले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र हे निदान त्याचबरोबर या रोगाच्या पातळीचा अंदाज घेण्यास उपयुक्त ठरेल. स्वीडनच्या कॅरोलिन्स्का इन्स्टिटय़ूटचे प्राध्यापक मार्टिन एकलुंड यांच्या मते पूरस्थ ग्रंथीच्या कर्करोगाचे सध्याचे निदान बायोप्सीने केले जाते पण त्यातही अचूकता कमी असते.

शिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र वापरल्यास रोगनिदान तंत्रज्ञांवरचा भारही कमी होईल. त्यांना तो वेळ इतर रोगांच्या निदानासाठी वापरता येईल. संशोधकांच्या मते आताच्या पूरस्थ कर्करोग निदानपद्धती या सदोष असून नमुन्यांच्या तपासणीनंतर तज्ञांचे निष्कर्ष वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे रोगनिदानाच्या मूल्यमापनात चुका होतात. त्या दूर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र उपयोगी आहे.

कर्करोग असलेली बायोप्सी व नसलेली बायोप्सी यातील भेद ओळखण्याचे प्रशिक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेला देता येते. अशा ६६०० नमुन्यांच्या मदतीने हे प्रशिक्षण देण्यात आले. रोगनिदान तज्ञ व कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा यांनी केलेल्या निदानांची तुलना करता त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणेने केलेले निदान हे मानवी पातळीवरच्या निदानापेक्षा जास्त अचूक ठरले. यात कर्करोगाच्या गाठीचा आकार या यंत्रणेने अचूक सांगितला.
ग्लीसन मापन प्रणालीच्या मदतीने पूरस्थ ग्रंथीच्या कर्करोगाचे मापन व निदान करता येते. ही पद्धत जास्त उपयुक्त असल्याचा दावा कॅरोलिन्स्का संस्थेचे प्राध्यापक वार्स इगेवद यांनी केला.