Best Oils for Heart Health: आपल्या शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय. ते निरोगी राहिलं, तरच जीवनात ऊर्जा, आनंद व स्वास्थ्य टिकू शकते. पण, आपल्या दैनंदिन आहारातल्या काही चुकीच्या सवयी आणि तेलांचा अयोग्य वापर हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो. त्याच पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती व हृदयशस्त्र विशेषज्ञ डॉ. श्रीराम नेने यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हृदयासाठी सर्वोत्तम स्वयंपाकयोग्य तेलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली.

डॉ. नेने म्हणतात, “स्वयंपाकासाठी निवडलेली तेलं तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर थेट परिणाम करतात. योग्य प्रमाणात आणि योग्य तेलांचा वापर केल्यास हृदय निरोगी राहू शकते.” त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पाच सर्वोत्तम तेलांची शिफारस केली आहे, ज्यामुळे LDL म्हणजे ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल कमी होते आणि HDL म्हणजे ‘चांगला’ कोलेस्ट्रॉल वाढते. चला तर पाहूयात कोणती आहेत ही तेल…

चुकीच्या तेलामुळे वाढतो हार्ट अटॅकचा धोका, ‘ही’ ५ तेलं ठरतील सुरक्षित

१. राईस ब्रॅन तेल

हे तेल हृदयासाठी विशेष लाभदायक आहे. त्यात असलेल्या अनसॅच्युरेटेड फॅट्समुळे LDL कमी होते आणि HDL वाढते. तसेच, त्यातील अँटिऑक्सिडंट्स हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील सूज कमी करतात आणि लिपिड प्रोफाईल सुधारतात.

२. शेंगदाण्याचे तेल

मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्समुळे हे तेल हृदयासाठी उपयुक्त ठरते. त्यातील व्हिटॅमिन E ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून, हृदयाचे संरक्षण करते.

३. मोहरीचे तेल

हे तेल ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी ॲसिड्सने समृद्ध आहे, जे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म हृदयातील सूज आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात मदत करतात.

४. ऑलिव्ह तेल

मध्यंतरीचे डाएटचे मुख्य घटक ऑलिव्ह तेल, LDL कमी करते आणि HDL टिकवून ठेवते. त्यातील पॉलीफेनॉल्स आणि व्हिटॅमिन E हृदयाचे संरक्षण करतात आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात.

५. तिळाचे तेल

पॉलीअनसॅच्युरेटेड व मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्समुळे हे तेल हृदयासाठी उपयुक्त ठरते. तिळामध्ये असलेले सेसामोल व सेसामिन अँटिऑक्सिडंट्स हृदयाचे रक्षण करतात, तर मॅग्नेशियम रक्तदाब कमी करून हृदयाच्या कार्यात मदत करतो.

येथे पाहा व्हिडीओ

डॉ. नेनेंच्या या शिफारशीनुसार, योग्य प्रमाणात या तेलांचा वापर केल्यास हृदय निरोगी राहू शकते आणि कार्डिओव्हॅस्क्युलरचा धोका कमी होतो.

टीप : प्रमाणाबाहेर कोणतेही तेल वापरू नका आणि नेहमी संतुलित आहाराचे पालन करा. हृदयाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे म्हणजे आयुष्यभराची सुरक्षा.