प्रत्येकाला आपल्या आवडत्या व्यक्तीसह लग्न करायचे असते. यासाठी काही लोक कुटुंबाच्या विरोधात जातात. यात काही कुटुंब सुरुवातीला तीव्र विरोध केल्यानंतर आपला मुलगा किंवा मुलीच्या आनंदासाठी लग्नास परवानगी देतात. पण, काही कुटुंब अशा मुलाशी किंवा मुलीबरोबरचे नाते कायमचे तोडतात. आजही अनेक कुटुंबात प्रेमविवाहाला तितकासा पाठिंबा नसतो. अशावेळी प्रेमी युगुल आपला निर्णय घेत लग्न करतात.
काहीवेळा नेहमी एकमेकांसोबत राहण्यासाठी भांडणाऱ्या या प्रेमी युगुलांना लग्नानंतर स्वत:च्या निर्णयावर रडण्याची वेळ येते. जेव्हा दोघांच्या संसारात तिसऱ्या व्यक्तीची अचानक एन्ट्री होते तेव्हा सहसा असे घडते. पती किंवा पत्नी यापैकी कोणीही यासाठी जबाबदार असू शकतो. पण, बहुतेकदा अशी फसवणूक पुरुषांकडूनच होते असे म्हटले जाते.
जर्नल सोशल सर्व्हेच्या अहवालातही याची पुष्टी करण्यात आली आहे की, पुरुष महिलांपेक्षा अधिक फसवणूक करणारे असतात. वैवाहिक जीवनात खूश नसल्याने ते अनेकदा विवाहबाह्य संबंध ठेवतात. पण, यामागे नेमकी काय कारणं आहेत, ज्यामुळे प्रेमविवाह करूनही पत्नीसोबतचे संबंध सुधारण्याऐवजी पुरुष इतर महिलांसह संबंध ठेवतात ते जाणून घेऊ…
१) दबावाखाली येऊन लग्न करणे
केवळ अरेंज मॅरेंज नाही तर काहीवेळा लव्ह मॅरेंजमध्येही अनेकांना दबावाखाली येऊन लग्न करावे लागते. हा दबाव अनेकदा पालक किंवा पार्टनरकडून टाकला जातो. अशावेळी पुरुष विवाहाच्या जबाबदाऱ्या घेण्यास मानसिकदृष्या तयार नसतो, तेव्हा तो कालांतराने सर्व गोष्टी समजून न घेता कंटाळून या नात्यातून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. अनेकवेळा असे लग्न एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सवर येऊन संपतात.
२) घरात वाढती भांडणं
लग्नानंतर पुरुष अनेकदा पत्नी आणि कुटुंबातील मतभेदांमध्ये अडकतात. यामुळे वेळोवेळी त्यांच्यावर पत्नी किंवा कुटुंबातील इतर सदस्य यांपैकी एकाची बाजू घ्यावी लागते. यात जर मुलाने आपल्या आवडत्या मुलीशी लग्न केले असेल तर परिस्थिती आणखीन वाईट होते.
कारण आवडत्या मुलीसोबत लग्न केल्याने त्याला घरच्यांकडून सतत टोमणे मारले जातात. यात पत्नीकडून सतत घर सोडण्याची धमकी दिली जाते. अशावेळी सर्व गोष्टींपासून दूर पळण्यासाठी अनेक पुरुष अनोळखी स्त्रीसह संबंध ठेवतो.
३) नात्यात कंटाळा येणे
लग्नाआधी अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर अनेकदा नात्यात कंटाळा येतो. पती-पत्नी एकमेकांना जाणून घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाहीत. अशावेळी अनेक पुरुष थ्रील अनुभवण्यासाठी विवाहबाह्य संबंध ठेवतात. जेणेकरून तो त्याच्या जोडीदाराकडून जे सुख अनुभवू शकला नाही, ते तो दुसऱ्या स्त्रीबरोबर राहून अनुभवू शकेल.
४) नातेसंबंधांमधील बदल स्वीकारण्यास तयार नसणे
प्रत्येक गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड लग्नाआधी एकमेकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जातात. दोघे अशा अनेक गोष्टी करून पाहतात, जणू काही ते आकाशात मुक्तपणे उडणारे पक्षी आहेत. काही काळ एकत्र राहिल्यानंतर दोघं सतत एकमेकांना आनंदी ठेवण्याचाच विचार करतात.
यानंतर जेव्हा दोघेही लग्न करून एकत्र राहायला लागतात, तेव्हा कधी-कधी त्यात येणारे बदल त्यांना नीट हाताळता येत नाहीत. त्यामुळे परस्पर संबंध बिघडू लागतात. प्रेमातील तो हळूवारपणा, रोमान्स हळूहळू दूर होतो. सर्व गोष्टी मतभिन्नतेने संपतात. याला कंटाळून पुरुष अनेकदा इतर महिलांकडून आनंद, थोडा विसावा शोधण्यासाठी जातात.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट कॉम या माहितीची पुष्ठी करत नाही.)