Healthy Foods for Kidneys: मनोरंजनविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या प्रसिद्ध मालिकेतील प्रख्यात अभिनेते सतीश शाह यांचं निधन किडनी फेल झाल्याने झालं, अशी माहिती सूत्रांनी दिली. काही दिवसांपासून त्यांना मूत्रपिंडाशी संबंधित त्रास होता; पण अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं सर्व चाहत्यांना हादरवून सोडलं आहे. अनेकांना प्रश्न पडतोय “किडनी म्हणजे मूत्रपिंड का बिघडतं? आणि याची काळजी कशी घ्यायची?”

तज्ज्ञ सांगतात की, मूत्रपिंड हे शरीराचं नैसर्गिक फिल्टर आहे. ते रक्त शुद्ध करतं, टॉक्सिन्स बाहेर काढतं आणि शरीरातील पाण्याचं संतुलन राखतं; पण चुकीचा आहार, ताणतणाव, अपुरी झोप आणि कमी पाण्याचं सेवन यामुळे मूत्रपिंडावर ताण येतो. त्यामुळे आजार वाढतो आणि शेवटी किडनी फेल्युअर होऊ शकतं. मात्र, योग्य आहार आणि काही सुपरफूड्सच्या सेवनानं तुम्ही मूत्रपिंडाचं आरोग्य टिकवू शकता. कानपूरच्या क्रॅनबेरी रीजेन्सी हॉस्पिटलचे नेफ्रॉलॉजी तज्ज्ञ डॉ. निर्भय कुमार यांनी सांगितलंय की, खालील ५ सुपरफूड्स मूत्रपिंडासाठी ‘आयुष्याचं वरदान’ ठरतात.

किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी खा ‘हे’ ५ सुपरफूड्स

१. फुलकोबी

फुलकोबीमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K व फायबर हे घटक मुबलक असतात. त्यात पोटॅशियमचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे मूत्रपिंडावर ताण येत नाही. ही भाजी रक्तदाब नियंत्रणात ठेवते आणि शरीरातील घातक टॉक्सिन्स बाहेर काढते. सूप, करी किंवा सलाड कोणत्याही स्वरूपात तिचं सेवन लाभदायक ठरतं.

२. जांभूळ आणि बेरी फळं

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी यांसारखी बेरी फळं मूत्रपिंडाचं रक्षण करतात. ही फळं अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C यांनी भरलेली असतात, जी शरीरातील फ्री-रॅडिकल्स कमी करून टॉक्सिन्स दूर करतात. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीही ही फळं उपयुक्त आहेत, जी मूत्रपिंडासाठी अत्यंत आवश्यक आहेत.

३. शिमला मिरची

लाल शिमला मिरची हा मूत्रपिंडासाठी उत्तम शाकाहारी अन्नपदार्थ आहे. त्यात व्हिटॅमिन A व C ही जीवन भरपूर असतात, पण पोटॅशियम कमी असतो. त्यामुळे मूत्रपिंडावर भार पडत नाही. ही मिरची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते.

४. भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, मॅग्नेशियम व अँटीऑक्सिडंट्स असतात. या बिया मूत्रपिंडाची सूज कमी करतात आणि खडे तयार होण्याची शक्यता घटवतात. दररोज थोड्या प्रमाणात या बिया खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि मूत्रपिंडाचं कार्य सुधारतं.

५. रताळे

रताळ्यात व्हिटॅमिन C, फायबर व अँटीऑक्सिडंट्स असतात. ते शरीरातील पाणी संतुलित ठेवतं, रक्तातील साखर नियंत्रित करतं आणि मूत्रपिंडावरचा ताण कमी करतं. त्यात सायट्रिक अ‍ॅसिड असल्यामुळे खडे तयार होणंही रोखलं जातं. तज्ज्ञ सांगतात की, हे सुपरफूड्स नियमितपणे आहारात समाविष्ट केल्यास मूत्रपिंडं निरोगी राहतात आणि किडनी फेल्युअरचा धोका कमी होतो.

लक्षात ठेवा :

सतीश शाहसारख्या अनुभवी कलाकारानेही मूत्रपिंडाच्या आजाराशी लढा दिला; पण आपण वेळीच काळजी घेतली, तर अशा शोकांतिकेपासून वाचू शकतो.

थोडक्यात :

दररोज पुरेसं पाणी प्या, मिठाचं प्रमाण कमी ठेवा, प्रोसेस्ड फूड टाळा आणि या ५ सुपरफूड्सचा समावेश करा. कारण- मूत्रपिंड बिघडलं, तर शरीराचं संतुलनच ढासळतं.