sharad purnima 2025: आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वपूर्ण उत्सव असून, त्यालाच कोजागिरी पौर्णिमा, असेही म्हटले जाते. या दिवशी चंद्र पूर्ण कलांनी तेजोमय असतो आणि त्याच्या प्रकाशाने वातावरण अधिक सुंदर व शांत भासते.
शरद पौर्णिमेला खीर का ठेवतात?
मान्यतेनुसार, शरद पौर्णिमेच्या रात्री अमृत वर्षाव होतो, असे समजले जाते. त्यामुळे या दिवशी आकाशाखाली खीर ठेवण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, चांदण्यांच्या प्रकाशात ठेवलेली खीर आरोग्यवर्धक आणि समृद्धी देणारी ठरते.
शास्त्रांनुसार या दिवशी चंद्र १६ कलांनी पूर्ण मानला जातो. चंद्र आणि दूध यांचा घनिष्ठ संबंध असल्याने दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांना चांदण्यात ठेवणे शुभ मानले जाते. तसे मानण्यामागे खिरीला चांदण्यांच्या किरणांमधून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. हे कारण असल्याचे सांगितले जाते. त्याशिवाय देवी लक्ष्मीला दुधाची खीर प्रिय असल्याने तिच्या पूजेत खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो.
खीर बनविण्यासाठी लागणारे साहित्य :
दूध
तांदूळ
साखर
मखाना
केशर
शरद पौर्णिमेला खीर कशी बनवायची?
शरद पौर्णिमा म्हटलं की, लक्ष्मीमातेची खीर ही आवडती गोष्ट म्हणून तिला परंपरेनुसार दाखविल्या जाणाऱ्या नैवेद्यात खिरीला सर्वांत महत्त्वाचे स्थान असल्याचे मानले जाते. त्यामुळे बनवली जाणारी ही खीर केवळ चवीसाठी नसून, त्यामागे धार्मिक श्रद्धा, आरोग्य व समृद्धीची भावना जपणे हे कारण आहे. म्हणूनच तिची तयारीही शुद्धतेने आणि विधिपूर्वक केली जाते.
खीर बनवण्यापूर्वी वापरण्यात येणारे भांडे स्वच्छ धुऊन ठेवावे. खीर बनविण्यासाठी सर्वप्रथम दूध उकळायला ठेवावे. दूध तापू लागले की, त्यात धुतलेले तांदूळ घालून, ते मंद आचेवर शिजू द्यावेत. त्यात पाणी अजिबात मिसळू नये. तांदूळ शिजत असताना त्यात केशर टाकावे, ज्यामुळे खिरीला रंग आणि सुगंध दोन्ही मिळतो. तांदूळ मऊ झाले की, त्यात थोडेसे अजून दूध घालून मखाने मिसळावेत. मिश्रण छान घट्टसर झाले की, साखर टाकून ते नीट हलवावे, जेणेकरून साखर त्यात पूर्णपणे विरघळेल. खीर तयार झाल्यावर ती स्वच्छ भांड्यात काढून घ्यावी आणि रात्री चांदण्यांत ठेवण्याच्या दृष्टीने तयारी करावी.