Brain Hemorrhage Symptoms: आपल्या यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून कोकणातील खाद्य संस्कृती दाखवणारा यूट्यूबर शिरीष गवस याचे दु:खद निधन झाले आहे. रेड सॉइल स्टोरी या प्रसिद्ध यूट्यूब चॅलेनच्या माध्यमातून शिरीष आणि त्याची पत्नी पूजा हे प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. काही दिवसांपूर्वी त्याचे ब्रेन हॅमरेज झाले होते आणि गोव्यातील बांबोळी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या या निधनानंतर ब्रेन हॅमरेज आजाराबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. चला तर मग जाणून घेऊ हा नेमका काय आजार आहे? याची लक्षणे काय आहेत आणि लक्षणे ओळखली, तर जीव वाचू शकतो का?
मेंदूतील रक्तस्राव ही एक अतिशय गंभीर आरोग्य स्थिती आहे, जी प्राणघातकही ठरू शकते. खरं तर, मेंदू हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. जर त्यात थोडीशीही समस्या असली, तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होतो. मेंदूशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या असतात, त्यापैकी एक म्हणजे ब्रेन हॅमरेज. ब्रेन हॅमरेजला मेंटल अटॅक किंवा स्ट्रोक, असेही म्हणतात. गुरुग्राम येथील पारस हॉस्पिटलमधील न्यूरो इंटरव्हेंशनल विभागाचे ग्रुप डायरेक्टर आणि एचओडी डॉ. विपुल गुप्ता यांनी ब्रेन हॅमरेज म्हणजे काय, त्याची लक्षणे व कारणे काय आहेत आणि ब्रेन हॅमरेजवर उपचार कसे करता येतील हे स्पष्ट केले.
डॉ. विपुल गुप्ता म्हणाले की, मेंदूतील रक्तस्राव ही एक गंभीर स्थिती आहे, ज्यामध्ये मेंदूतील रक्तवाहिनी फुटते. जर त्वरित उपचार मिळाले नाहीत, तर ती प्राणघातक ठरू शकते. काही पोषक घटकांची दीर्घकालीन कमतरता, विशेषतः व्हिटॅमिन केची कमतरता, हे याचे एक प्रमुख कारण असू शकते.
मेंदूतील रक्तस्राव म्हणजे काय?
जर मेंदूमध्ये रक्तस्राव होत असेल, तर या स्थितीला मेंदूतील रक्तस्राव म्हणतात. मेंदूतील रक्तस्रावाचे मुख्य कारण म्हणजे मेंदू किंवा त्याच्या आसपासच्या ऊतींना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारची गळती. मेंदू स्वतःहून ऑक्सिजन आणि पोषण साठवू शकत नाही आणि त्यासाठी रक्तवाहिन्यांच्या जाळ्यावर अवलंबून असतो. जेव्हा मेंदूमध्ये रक्तस्राव होतो तेव्हा रक्तवाहिन्या फुटतात आणि मेंदू रक्ताने भरतो.
मेंदूतील रक्तस्रावाचे प्रकार
रक्तस्रावाच्या अचूक स्थानावर अवलंबून, मेंदूतील रक्तस्रावाचे अनेक प्रकार आहेत. आपला मेंदू तीन प्रकारच्या ऊतींनी झाकलेला आणि संरक्षित असतो. या तीनही ऊतींपैकी कोणत्याही ऊतींमध्ये (सामान्यतः मेनिन्जेस म्हणतात) रक्तस्राव होऊ शकतो. मेंदूच्या प्रत्यक्ष ऊतींमध्येही रक्तस्राव होऊ शकतो. मेंदूतील रक्तस्रावात दोन प्रकारचे रक्तस्राव होऊ शकतात.
मेंदूतील रक्तस्रावाची लक्षणे
- अचानक तीव्र डोकेदुखी
- गिळण्यास त्रास होणे
- पाहण्यास त्रास होणे
- समजण्यास त्रास होणे
- तंद्री किंवा बेशुद्धी
- झटके येणे आणि बोलण्यास त्रास होणे
कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे मेंदूतील रक्तस्राव होण्याचा धोका असतो
ब्रेन हॅमरेजची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ- एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊ शकते किंवा डोक्याला कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ शकते, ज्यामुळे मेंदूतील रक्तस्राव होऊ शकतो. या सर्वांव्यतिरिक्त व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे मेंदूतील रक्तस्रावदेखील होऊ शकतो. व्हिटॅमिन के रक्त गोठण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात त्याची कमतरता असल्यास, रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकत नाहीत, ज्यामुळे कोणत्याही रक्तवाहिनीतून रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो. जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये ही समस्या उद्भवते तेव्हा त्याला ब्रेन हॅमरेज म्हणतात.
ब्रेन हॅमरेज होऊ नये म्हणून काय करावे?
ब्रेन हॅमरेज टाळण्यासाठी व्हिटॅमिन केसोबत काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत वेळोवेळी तुमचा रक्तदाब तपासा, उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करा, तुमचे वजन नियंत्रणात ठेवा आणि निरोगी आहार व व्यायामासोबत कमी अल्कोहोल घ्या.