Uric Acid Can Increase Due To These Pulses: आपण रोजच्या जेवणात आरोग्यासाठी चांगल्या समजल्या जाणाऱ्या डाळी आवर्जून खातो. पण, तुम्हाला माहीत आहे का, डाळ-भाताची ही सवयच तुमच्यासाठी वेदनादायक ठरू शकते? हो, तुमचं ऐकणं खरं आहे… डाळ म्हणजे केवळ प्रोटीन्सचा खजिना नाही, तर काही डाळी शरीरात युरिक अ‍ॅसिड (Uric Acid) वाढवण्याचं कामही करतात आणि एकदा का हे अ‍ॅसिड नियंत्रणाबाहेर गेलं, की सांध्यांमध्ये सूज, असह्य वेदना व संधिवातासारखा त्रास होऊ शकतो. प्युरिन नावाचा घटक आणि काही डाळी यांच्यातील संबंध समजून घेतलात, तर तुम्हीही पुढच्या वेळी डाळ निवडताना १० वेळा विचार कराल. कोणत्या डाळींपासून राखावं सावधतेचं अंतर आणि कोणत्या डाळी खाव्यात वाचा पुढे…

युरिक अ‍ॅसिड हा शरीरातील एक नैसर्गिक अपशिष्ट पदार्थ आहे, जो प्युरिन नावाच्या घटकाच्या विघटनातून तयार होतो. सामान्यतः हा मूत्रमार्गातून बाहेर टाकला जातो; पण जेव्हा प्युरिनचं प्रमाण शरीरात वाढतं, तेव्हा किडनी ते पूर्णपणे फिल्टर करू शकत नाही आणि ते क्रिस्टल्सच्या स्वरूपात सांध्यांमध्ये साठतं. हेच पुढे जाऊन गाठ, सूज, सांधेदुखी यांसारख्या आजारांना आमंत्रण देतं.

युरिक अ‍ॅसिडमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. त्याशिवाय सतत वेदना होणं, क्रॅम्पिंग, सांध्यांमध्ये सूज येणं, चालण्यात अडचण किंवा किडनी स्टोन यांसारखी लक्षणं निदर्शनास येतात. युरिक अ‍ॅसिड हा एक टाकाऊ पदार्थ आहे. जेव्हा शरीरात प्युरिनचं विघटन होतं, तेव्हा ते तयार होतं.  आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. प्रताप चौहान यांच्या मते, ‘या’ डाळी युरिक अ‍ॅसिड वाढवू शकतात.

१. मसूर डाळ

या डाळीत प्युरिनचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे याचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास युरिक अ‍ॅसिड अचानक वाढू शकतं.

२. चणा डाळ

ही डाळ प्रोटीन आणि प्युरिन या दोन्हींचं मोठा स्रोत आहे. त्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या रुग्णांना सूज आणि दुखण्याचा त्रास अधिक होतो.

३. अरहर (तूर) डाळ

ही डाळसुद्धा प्रथिनांनी भरलेली असून, युरिक अ‍ॅसिडचे लक्षण अधिक तीव्र करू शकते.

४. उडीद डाळ

ही डाळ शरीराला उष्णता देते आणि पचायला जड असल्यानं, त्यामुळे सूज, जळजळ व दुखणं वाढू शकतं.

मग कुठल्या डाळी खाव्यात?

डॉ. चौहान सांगतात की, अशा रुग्णांनी मूग डाळ किंवा कमी प्युरिन असलेल्या डाळींचं मर्यादित प्रमाणात सेवन करावं. डाळींमध्ये फायबर्स व पोषणमूल्यं भरपूर असतात आणि त्यामुळे त्यांना पूर्णपणे टाळणं योग्य नाही. पण, योग्य ते प्रमाण राखणं आणि योग्य डाळी निवडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थोडक्यात काय?

जर तुम्हाला युरिक अ‍ॅसिडचा त्रास आहे, तर पुढच्या वेळी डाळ निवडताना फक्त चव बघू नका. तर आरोग्याचा विचार करा… कारण- एक चुकीची डाळ तुमच्या सांध्यांत असह्य वेदना निर्माण करू शकते.