हिवाळा जवळ येत असताना, हवामान बदलत चालेल आहे; यामुळे अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू होतो. विशेषतः लहान मुलांवर या वातावरणाचे परिणाम अधिक वेगाने होताना दिसून येतात. कारण- त्यांची रोगप्रतिकार शक्ती अजून विकसित होत असते. अशा परिस्थितीत अनेक पालकांच्या मनात हा प्रश्न उदभवतो की, मुलांना सर्दी झाली असेल किंवा त्यांचे नाक वाहत असेल, तर त्यांनी अंघोळ करणे योग्य आहे का? अनेक पालकांचा असा विश्वास आहे की, थंड हवामानात मुलांना अंघोळ केल्याने समस्या निर्माण होतील; परंतु प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टर मनोज मित्तल यांनी सोशल मीडियावरील व्हिडीओद्वारे याबाबत सांगून मार्गदर्शन केले आहे.

डॉक्टर मित्तल म्हणतात की, सर्दी किंवा खोकल्याचा त्रास असलेल्या मुलांनी दररोज थोड्याशा कोमट पाण्याने अंघोळ केल्याने फायदा होऊ शकतो. थोडेसे कोमट पाणी मुलांच्या शरीराला नैसर्गिक उष्णता प्रदान करते आणि त्यांना त्यामुळे ताजेतवाने वाटते. अंघोळ केल्याने नाकातील मार्ग व घसा साफ होतो आणि छातीतील कफ कमी होतो. खोकल्याचा त्रास असलेल्या मुलांना नैसर्गिक वाफ मिळते, ज्यामुळे वेगळ्या वाफेच्या उपचारांची आवश्यकता भासत नाही.

पण, अंघोळ करताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम पाण्याचे तापमान योग्य ठेवले पाहिजे. मुलांचे शरीर बदलत्या हवामानात संवेदनशील असते. म्हणून तुम्ही स्वतःच्या कोपराने पाण्याचे तापमान तपासण्याचा प्रयत्न करावा. मुलांसाठी सुमारे ३७.८° सेल्सिअस (१००° फॅरेनहाइट) तापमान योग्य राहते. त्याचप्रमाणे मुलांना जास्त वेळ बाथरूममध्ये सोडू नका. लहान मुलांच्या नेहमी जवळ राहावे किंवा त्यांच्या शरीरावर एक हात ठेवावा आणि मोठ्या मुलांना बाथ टबमध्ये कधीही एकटे सोडू नये. मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नाक गळती किंवा इजा टाळण्यासाठी योग्य काळजी आवश्यक आहे.

अंघोळ केल्यानंतर मुलांना लगेच टॉवेलने हलकेसे पुसून कोरडे करावे, त्यांचे अंग जोरजोराने चोळू नये. नंतर त्वचेला हळुवार लोशन लावून, मुलांना आरामदायी आणि उबदार कपडे घालावेत. अशा प्रकारे मुलांना अंघोळीनंतर सुरक्षित आणि उबदार वाटते, ज्यामुळे त्यांना सर्दी आणि खोकल्यापासून लवकर बरे होण्यास मदत होते.

थोडक्यात सर्दी, खोकला किंवा नाकातून पाणी वाहणाऱ्या मुलांना दररोज कोमट पाण्याने आंघोळ केल्याने फायदा होऊ शकतो. नैसर्गिक वाफ मिळते आणि त्यांचे शरीर स्वच्छ राहते. मात्र, पाण्याचे तापमान, बाथरूममध्ये किती वेळ राहायचे आणि अंघोळीनंतरची योग्य काळजी यांकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक ती काळजी घेतल्यास मुले सर्दी-खोकल्याच्या त्रासातून लवकर बरी होऊ शकतात.