Early Warning Signs of Heart Attack Females: हृदयविकार म्हटलं की, आपल्याला लगेच आठवते छातीत होणारी तीव्र वेदना, श्वास घ्यायला त्रास होणं व घाम फुटणं. पण, तुम्हाला माहितीये का? अनेक महिलांना हृदयविकाराचा झटका अगदी शांतपणे आणि सूक्ष्म लक्षणांतून येतो, ज्यामुळे तो वेळेत ओळखणे कठीण जाते.

प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. दिमित्री यारानोव्ह (Instagram: heart_transplant_doc) यांनी सावधगिरीचा इशारा देत म्हटलेय, छातीत दुखणं हे हृदयविकाराचं लक्षण महिलांमध्ये अनेकदा दिसतच नाही; उलट थकवा, मळमळ, पाठीचा किंवा जबड्याचा त्रास, श्वास घ्यायला त्रास अशा स्वरूपात त्याची लक्षणं दिसतात.

लक्षणं कोणती असतात?

  • असामान्य थकवा व अशक्तपणा: अगदी साध्या कामांनंतरही थकवा जाणवणं, सतत दमल्यासारखं वाटणं.
  • श्वास लागणे, भोवळ, चक्कर: अचानक श्वास न घेता येणं, चक्कर येणं.
  • जबडा, मान, खांदा, पाठ किंवा हात दुखणे: ही वेदना स्नायू दुखण्यासारखी भासते, पण प्रत्यक्षात ती हृदयाशी निगडित असू शकते.
  • पोटाशी संबंधित तक्रारी: मळमळ, उलट्या, अपचन, पोटदुखी. अनेकदा लोक हे गॅस समजून दुर्लक्ष करतात.
  • थंड घाम, चिंताग्रस्तपणा: मानसिक तणावाचा परिणाम वाटणारे हे संकेतही हृदयविकाराचे सूक्ष्म लक्षण असू शकतात.
  • झोपेचे विकार: झोप लागायला त्रास होणं, वारंवार जागं होणं किंवा झोपूनही थकल्यासारखं वाटणं. ‘सायलेंट’ हार्ट अटॅक अगदी लक्षणं न दाखवता होणारा झटका! त्यामध्ये महिलांना काहीसा अस्वस्थपणा जाणवतो; पण ते दुर्लक्षित केल्यानं मोठं नुकसान होतं.

महिलांमधील लक्षणं का वेगळी असतात?

तज्ज्ञांच्या मते, हार्मोन्स, सूक्ष्म रक्तवाहिन्यांतील बिघाड (Coronary Microvascular Dysfunction), आर्टरी स्पॅझम किंवा SCAD (Spontaneous Coronary Artery Dissection) यांसारख्या समस्येमुळे महिलांना मोठ्या आर्टरी ब्लॉकेजशिवायही हृदयविकार होऊ शकतो. पण ही लक्षणं तपासणीत सहज दिसत नाहीत. त्यामुळेच महिलांचा आजार अनेकदा चुकून ताण, गॅस, अॅसिडिटी किंवा चिंता समजून थांबवला जातो.

काय कराल तुम्ही?

  • लक्षणं लक्षात ठेवा – छातीत वेदना नसली तरी थकवा, श्वास लागणे, पोटदुखी, घाम येणे, अशक्तपणा याकडे दुर्लक्ष करू नका.
  • वेळेत कृती करा – शंका आली तर त्वरित डॉक्टरांकडे जा किंवा आपत्कालीन सेवा घ्या.
  • जोखमीचे घटक ओळखा – डायबेटीस, बीपी, स्थूलता, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, कौटुंबिक इतिहास, रजोनिवृत्ती.
  • आरोग्यदायी जीवनशैली ठेवा – नियमित व्यायाम, संतुलित आहार, तणाव नियंत्रण, पुरेशी झोप, धूम्रपान व दारू टाळा.

शेवटी लक्षात ठेवा- महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका नेहमी चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे छाती पकडून पडण्याने येत नाही. तो कधी मळमळ, कधी थकवा, कधी पोटदुखी या स्वरूपात लपून पुढे येतो. शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. कारण- वेळेत लक्ष दिलं, तर एखाद्याचा आयुष्य वाचू शकतं.