Kidney Disease Prevention: आपण सगळेच दररोज आपल्या जेवणात एक विशेष पांढरा पदार्थ वापरतो. अगदी चव वाढवण्यासाठी, भाजीत त्याचं थोडंसं प्रमाण जास्त झालं तरी हरकत नाही, असं म्हणत आपण त्याचा वापर करीत असतो. पण, हा दिसायला निरुपद्रवी वाटणारा पदार्थ तुमच्या शरीरात हळूहळू काही गडबड करीत जातो की, शेवटी त्याचा मोठा फटका तुमच्या मूत्रपिंडांना (Kidneys) बसतो.
होय, डॉक्टर सांगतात की, स्वयंपाकात हा महत्त्वपूर्ण पदार्थ आहे. तो जितका चवदार बोलतो, तितकाच तो आतून शरीराला बिघडवत असतो. सुरुवातीला आपल्याला त्यामुळे काही त्रास जाणवत नाही; पण दिवसेंदिवस हे पांढरं ‘विष’ शरीरात साठत जातं. मग सुरू होतात थकवा, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे हे त्रास आणि सर्वांत गंभीर बाब म्हणजे मूत्रपिंडाचं कार्य बिघडणं.
चेन्नईतील नामांकित मूत्रविज्ञानी (Urologist) डॉ. वेनकट सुब्रह्ममण्यम यांनी नुकताच सोशल मीडियावर इशारा दिला आहे “लोकांना वाटतं की, मी रोज थोड्याच प्रमाणात घेतो, त्यामुळे काय होतंय? पण याच ‘थोड्याशानं’ शरीराचं दीर्घकाळासाठी मोठं नुकसान होतं.” त्यांनी सांगितलं की, हा पदार्थ जास्त प्रमाणात घेतल्यानं मूत्रपिंडात खडे (Kidney Stones) तयार होतात, रक्तदाब वाढतो आणि मूत्रपिंडाचं कार्य हळूहळू मंदावू लागतं.
डॉ. सुब्रह्मण्यम पुढे म्हणतात, “लोकांना वाटतं की, चव म्हणजे फक्त हा पदार्थ. पण, खरं तर आहारात लिंबू, मिरी, लसूण यांसारख्या नैसर्गिक चवींचा वापर केला तरीही शरीरालाही फायदा होतो आणि जेवणालाही चव येते; पण लोकांना तेवढा संयम पाळणं शक्य होत नाही.”
विशेष म्हणजे आपण घरी जेवताना भांड्यात किती टाकतो तेवढं कमी असतं; पण धोका लपलेला असतो पॅकेज्ड फूडमध्ये. बिस्किटं, चिप्स, सॉस, रेडी-टू-ईट पदार्थ सगळीकडे हा पांढरा शत्रू इतक्या प्रमाणात मिसळलेला असतो की, आपण नकळत त्याचं रोजच्या गरजेपेक्षा दुप्पट प्रमाणात सेवन करतो.
डॉ. सुब्रह्मण्यम यांनी सांगितलं, “तुम्ही रोज किती खाताय हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण- छोट्या सवयींमधले छोटे बदल पुढे मोठं आरोग्य वाचवतात. मूत्रपिंडं टिकवायची असतील, तर हा पदार्थ ‘मापात’च घ्या.”
तज्ज्ञ सांगतात की, दररोज एका प्रौढ व्यक्तीनं साधारण पाच ग्रॅमपेक्षा जास्त प्रमाणात याचं सेवन करू नये. पण, भारतातील बहुतांश लोक याचं दुप्पट किंवा तिप्पट प्रमाणात सेवन घेतात.
आणि आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल हा नेमका कोणता पांढरा पदार्थ? होय, हा तोच… ‘मीठ!’ तेच मीठ, ज्याशिवाय जेवण फिकं वाटतं; पण त्याचं अति सेवन शरीराची गोडी हिरावून घेतं.
(टीप : ही माहिती डॉक्टरांच्या सल्ल्यावर आधारित आहे आणि ती वैद्यकीय उपचाराची जागा घेणारी नाही. कोणतेही आरोग्यविषयक बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
