हवामानात बदल होत असताना सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी थोडीशी थंडी जाणवते. या बदलत्या हवामानात लहान मुलं आणि वृद्धांना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या दिवसांत सर्दी आणि तापाचे प्रमाणही वेगाने वाढते. त्यामुळे केवळ हवामानाचाच नाही, तर घरातील काही वस्तूंचाही परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो हे लक्षात घ्या. घरातील खिडक्या, इलेक्ट्रॉनिक्स यावरची धूळदेखील आजाराला कारणीभूत ठरू शकते. दिवाळीच्या तोंडावर सगळेच घरात साफसफाई करतात. अशावेळी गीझर साफ करताना तु्म्ही फक्त तो वरवरच साफ करता का? सततचा वापर किंवा बराच काळ वापरात नसताना गीझरमध्ये घाण, चिकट थर तसंच गंज लागतो. त्यामुळे गीझरच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

अशा परिस्थितीत जास्त वेळ गीझर असूनही पाणी गरम करता येत नाही. शिवाय गरजेपेक्षा जास्त वीजेचा वापर होतो. तेव्हा एखाद्या मेकॅनिकला घरी बोलावून तुम्ही गीझर स्वच्छ करू शकता. मात्र, यादरम्यान गीझरबाबतीतल्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील.

गीझर स्वच्छ करण्यापूर्वी त्याचे झाकण उघडा. नंतर जमा झालेली घाण साफ करा. घाण आणि मीठ किंवा चिकटपणा बहुतेकदा गरम घटकावर जमा होतो. तो काढण्यासाठी तुम्ही व्हिनेगर क्लिनिंग एजंट वापरू शकता. त्यानंतर या मिक्षणात भिजवलेल्या कापडाने आतील भाग पुसून काढा. गीझर सुकू द्या आणि मगच त्याचे झाकण बंद करा.

गीझर साफ करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

घरातील गीझर साफ करण्यापूर्वी गीझरचा पावर सप्लाय पूर्णपणे बंद आहे याची खात्री करून घ्या. जर तुमच्याकडे गॅस गीझर असेल तर गॅस पुरवठा बंद आहे का याची खात्री करा. साफसफाई करताना मास्क आणि हँडग्लव्ह्ज वापरा.

गीझर स्वच्छ करण्यासाठी असे मिश्रण तयार करा

तुमच्या गीझरमधील चिकट घाण काढून टाकण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण बनवू शकता. हे मिश्रण गीझर साफ करताना वापरा म्हणजे सर्व घाण साफ होऊन जाईल. त्यानंतर गीझरची टाकीदेखील त्याच मिश्रणाचा वापर करून स्वच्छ करा.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गीझर तुम्ही घरीच स्वच्छ करत असलात तरी त्याला ओला हात किंवा कुठलाही ओलसरपणा आतमध्ये राहणार नाही याची काळजी घ्या. तसंच शक्यतो तो तज्ज्ञ व्यक्तीनेच साफ करावा.