Tips To Clean Dark Neck And Underarms: उन्हाळ्यात अधिक घाम, घट्ट कपडे, डिओडरंटचा अधिक वापर व रेझरच्या वारंवार वापरामुळे काखेत काळपटपणा दिसू लागतो. घाम आणि धुळीमुळे मान दिवसेंदिवस काळी पडू लागते. अशा वेळी काखेतील आणि मानेवरील काळपटपणामुळे लाज वाटू लागते. अनेकदा त्यामुळे आवडीचे कपडे वापरता येत नाहीत. पण, या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही मान आणि काखेतील काळेपणा दूर करू शकाल. त्यासाठी तुम्हाला किचनमधील काही पदार्थांचा वापर करून दोन प्रकारचे पॅक तयार करायचे आहेत.
हळद, लिंबू, दही, बेसनाचा पॅक
त्वचेसाठी हळद, लिंबू, दही, बेसनापासून बनविलेला पॅक खूप फायदेशीर ठरतो. हा पॅक लावल्याने अंडरआर्म्स आणि मानेवरील काळेपणाच्या समस्येपासून आराम मिळतो. त्यासाठी एका वाटीत दही, लिंबू, हळद व बेसन घ्या. हे सर्व पदार्थ चांगले एकजीव करून पॅक तयार करा आणि मग दररोज अंघोळीपूर्वी या पॅकचा वापर तुम्ही करू शकता. १५ दिवस सातत्याने त्याचा वापर केल्यास तुम्हाला मान आणि काखेतील रंगात फरक जाणवेल. कारण- दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. जे त्वचेवरील काळेपणा दूर करते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, जे रंगद्रव्य काढून टाकते. दुसरीकडे हळद त्वचेचा रंग उजळवते.
बेकिंग सोडा आणि लिंबू
काख आणि मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबूदेखील वापरू शकता. एका भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. तयार केलेली पेस्ट मानेवर आणि काखेत लावा. तुमच्या काखेवर लिंबाची साल हलके चोळा. १५ मिनिटांनी ही पेस्ट पाण्याने धुऊन टाका. काख आणि मानेवरील काळेपणा दूर करण्यासाठी हा घरगुती उपाय तुम्हाला खूप मदत करील.