रात्री सहा तास किंवा त्यापेक्षा कमी झोप मिळाली तर नैराश्याचा रोग प्रौढांमध्ये बळावतो असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. प्रौढ जुळे व समुदायाधारित अभ्यास यावरून असे सांगण्यात आले की, झोपेचा काळ व नैराश्य यांचा संबंध आहे. ११ ते १७ वर्षे वयोगटातील ४१७५  मुलांचा अभ्यास यात प्रथमच करण्यात आला असून त्यांच्यावर कमी झोप व त्यामुळे त्यांना येणारे नैराश्य यांचा परस्परसंबंध सिद्ध केला आहे. रात्री सहा तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ झोपेविना राहणाऱ्या लोकांमध्ये नैराश्य वाढते व परत त्यातून झोप लागत नाही असे हे दुष्टचक्र आहे. झोपेविना राहणे म्हणजे नैराश्याला निमंत्रण  देणे आहे असे टेक्सास विद्यापीठातील आरोग्य विज्ञान केंद्राचे डॉ. रॉबर्ट इ. रॉबर्टस यांनी सांगितले.  १७८८ प्रौढ जुळ्यांवर प्रयोग केले असतात त्यांच्यात झोपेअभावी नैराश्याची लक्षणे दिसली व त्यांच्यात जनुकीय जोखीमही वाढलेली दिसून आली. जे प्रौढ ८.९ तास झोप घेत होते त्यांच्यात नैराश्याची लक्षणे केवळ २७ टक्के होती. आरोग्यदायी झोप ही मानसिक व शारीरिक विश्रांतीसाठी गरजेची असून त्यामुळे भावनांचा विकासही चांगला होतो असे अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनचे अध्यक्ष एम.सफवान बद्र यांनी म्हटले आहे. नवीन संशोधनात झोपेला प्राधान्य देऊन आपण आपले आरोग्य कसे सुधारू शकतो यावर भर दिला आहे. जनुकीय प्रभावामुळे ५३ टक्के जुळ्यांमध्ये कमी झोपेचा त्रास जाणवला. त्यांना रात्री केवळ पाच तास झोपता येत होते तर ४९ टक्के जणांमध्ये रात्रीची झोप ही दहा तासांची होती.  ज्या जुळ्यांची कमी झोप झालेली होती त्यांच्यात ज्यांची झोप सुरळीत आहे त्यांच्यापेक्षा जास्त नैराश्य दिसून आले असे मुख्य संशोधक डॉ. नॅथनियल वॉटसन यांनी म्हटले आहे. बहुतांश जुळ्यांमध्ये आनुवंशिकतेने हे घडून येत असल्याचे डॉ. नॅथनियल वॉटसन यांनी म्हटले आहे. कमी किंवा जास्त अशा दोन्ही प्रकारच्या झोपेमुळे नैराश्याची लक्षणे दिसतात असे वॉटसन यांचे म्हणणे आहे. स्लीप नावाच्या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित करण्यात आले.