बाहेरून हिरवट-पिवळट रंगाचे दिसणारे हे फळ मेणाचे आवरण असल्यासारखे वाटते. आंबट गोड लागणारे व पाणीदार असे हे फळ मूळचे दक्षिण आशियामधले आहे. सप्टेंबर ते फेब्रुवारीपर्यंत भारतात हे फळ उपलब्ध असते.
’फळाचा रस ताप व डोळ्यांचा संसर्ग कमी करण्यासाठी गुणकारी मानला जातो. ’आयुर्वेदामध्ये या फळाचा उल्लेख चांगले पचन होण्यासाठी तसेच शक्तिवर्धक म्हणून केला आहे. त्याचबरोबर घशाचा संसर्ग,कफ, दमा, जुलाब,अपचन, तोंड येणे, दात दुखणे, उलटीसारखे होणे या सर्व तक्रारीवर उपचार म्हणून उपयोगी ठरते. ह ेतंतूमय फळ असल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते.यात ‘क’ जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणावर असते. या फळाच्या गरात पोटाचे अल्सर बरे करण्याचा गुणधर्म आहे. त्वचेच्या विकारांवर हे फळ चांगला उपाय आहे. या फळात कॅलरी अतिशय कमी असल्याने स्थूल व्यक्तींनाही या फळाचा आनंद घेता येईल.
कोणी खाऊ नये?
स्टार फ्रूटमध्ये असणाऱ्या ऑक्झॉलिक आम्लामुळे मूत्रिपिंडाचे विकार असलेल्यांनी हे फळ अजिबात खाऊ नये. विशेषत डायलिसिसवर असणाऱ्या मुतखडा असलेल्या व्यक्तींनी हे फळ पूर्णपणे टाळावे.