घोरणे ही श्वासोच्छ्वासाची एक समस्या आहे, ज्यामुळे रात्री झोपताना घशातून मोठा आवाज येतो. घोरण्यामुळे केवळ अस्वस्थताच जाणवत नाही, तर कधी कधी त्यामुळे गंभीर आरोग्य समस्यादेखील उदभवू शकतात. हा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो आणि तो तात्पुरता किंवा दीर्घकालीन असू शकतो. घोरणे कधी कधी नाकातून होते, तर कधी कधी तोंडातून. त्याचे मुख्य कारण म्हणजे झोपेच्या वेळी घसा, जीभ आणि टाळूचे स्नायू आराम करतात, ज्यामुळे वायुमार्गातील अडथळ्यांमुळे हवा कंप पावते आणि आवाज निर्माण होतो.

लठ्ठपणा, जास्त मद्यपान, सायनस समस्या किंवा चुकीच्या स्थितीत झोपणे ही सर्व घोरण्याची प्रमुख कारणे आहेत. मुलेदेखील घोरू शकतात, विशेषतः जर त्यांचे टॉन्सिल वाढलेले असतील, वाकडे नाक किंवा सततच्या सर्दीमुळे. कधी कधी जास्त मोठी जीभदेखील याचे कारण ठरते.

घोरणे कमी करण्यासाठी नियमितपणे वापर करण्याजोगे काही सोपे आणि घरगुती उपाय खालीलप्रमाणे :

ऑलिव्ह ऑइल –ऑलिव्ह ऑइलमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात. झोपण्यापूर्वी या तेलाचे नाकात दोन थेंब टाकल्याने श्वासोच्छवास सुधारण्यास आणि घोरणे कमी होण्यास मदत होते.

हळदीचे दूध – हळदीमध्येही दाहकविरोधी आणि विषाणूविरोधी गुणधर्म असतात. झोपण्यापूर्वी गरम दुधात चिमूटभर हळद मिसळून प्यायल्याने घशातील जळजळ कमी होते आणि गाढ झोप येते.

मध – मध घशाला मऊ करतो आणि सूज कमी करतो. एक ग्लासभर कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून प्यायल्याने श्वसनमार्ग उघडा राहतो आणि घसा खवखवणे टाळता येते.

देशी तूप – देशी तूप नाकाला ओलसर ठेवते आणि घशातील सूज कमी करते. रात्री झोपण्यापूर्वी नाकात तुपाचे काही थेंब टाकल्यास घोरणे हळूहळू कमी होऊ लागेल.

लसूण – लसूण सायनस आणि नाक बंद होण्यावर परिणाम करते. लसणाची एक पाकळी भाजून झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत सेवन केल्याने घशातील सूज कमी होते आणि त्यामुळे घोरणे कमी होते.

या घरगुती उपायांचा नियमित वापर केल्यास घोरणे नक्कीच कमी होऊ शकते. तसेच, वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणेदेखील फायदेशीर ठरते; विशेषत: जर घोरणे अचानक वाढले किंवा झोपेत श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला असेल तर. तेव्हा या सोप्या उपायांच्या मदतीने तुम्ही आरोग्यपूर्ण आणि शांत झोप अनुभवू शकता.