Easy Trick to Store Potato’s from Rotting: भारतीय स्वयंपाकघर बटाट्याशिवाय अपूर्ण आहे. बटाटा हा एक असा जिन्नस आहे, जो प्रत्येक पदार्थात घातला जातो. बटाटा वापरून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता, त्यामुळे बटाटे मोठ्या प्रमाणात घरात उपलब्ध असतात. पण, पावसाळा किंवा उष्णतेच्या दिवसात बटाटे पटकन सडतात, त्याला मोड येणे, हिरवे डाग पडणे किंवा तो मऊ होणे असे काही ना काही होते आणि अखेर ते वापरण्यायोग्य राहात नाहीत. तुम्हीही अशा समस्येला नेहमी सामोरे जाता का? तर ही बातमी वाचल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कारण केवळ एक सोपी गोष्ट बटाट्यांचं आयुष्यमान वाढवू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक असा पारंपरिक देशी उपाय, जो आपल्या आजी-आजोबांनी वापरला आहे आणि जो आजही तितकाच प्रभावी आहे.
अंधाऱ्या आणि थंड जागेचं महत्त्व
बटाटे स्टोअर करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या जागी ठेवणं. बटाटे उन्हाच्या संपर्कात आले की, त्यांच्यात अंकुर फुटतात. त्यासाठी बटाट्यांना कपाटात, बंद कॅबिनेटमध्ये किंवा बेसमेंटसारख्या थंड जागी ठेवा. मात्र फ्रिजमध्ये ठेवणं टाळा, कारण तिथली थंडी बटाट्यातील स्टार्चचं रूपांतर साखरेत करते, ज्यामुळे त्यांचा स्वाद बदलतो.
बटाटा आणि कांदा एकत्र? चूक करू नका!
कांद्यातून निघणारा एथिलीन वायू बटाट्यांना लवकर खराब करतो. त्याऐवजी जर तुम्ही बटाट्यांसोबत १-२ सफरचंद ठेवलीत, तर तोच वायू बटाट्यांचं अंकुरण थांबवतो. आश्चर्य वाटलं ना? पण हा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला उपाय आहे.
प्लास्टिक नव्हे, कागद ठेवा!
प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी पिशव्या, जुने वर्तमानपत्र किंवा ज्यूटच्या पिशव्या वापरा. प्लास्टिकमध्ये हवा खेळती राहात नाही आणि त्यामुळे बटाटे लवकर सडतात. तर कागद ओलसरपणा शोषून घेतो आणि बटाटे कोरडे व ताजे ठेवतो.
पुदिन्याची जादू
पुदिन्याच्या पानांचं काम खूप मोठं आहे. बटाट्यांमध्ये पुदिन्याची काही ताजी पानं ठेवा. त्यातून येणाऱ्या सुगंधामुळे एथिलीन वायू कमी होतो आणि बटाटे अंकुरणाच्या प्रक्रियेतून वाचतात. पानं कोमेजल्यावर नवीन पानं ठेवायला विसरू नका.
माती किंवा वाळूचा देसी जुगाड
आजींचा आजमावलेला एक जुना उपाय जर मोठ्या प्रमाणात बटाटे साठवायचे असतील, तर कोरडी माती किंवा वाळूच्या थरांमध्ये बटाटे पुरून ठेवा. वाळू/माती प्रकाश आणि आर्द्रतेपासून संरक्षण करते आणि बटाट्यांना खराब होण्यापासून वाचवते.
एक गोष्ट लक्षात ठेवा, सडलेले किंवा कापलेले बटाटे इतर चांगल्या बटाट्यांनाही खराब करतात, त्यामुळे साठवणुकीआधी प्रत्येक बटाटा नीट तपासा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)