Inflammation on Body Cause: शरीरात सूज येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. शरीरात येणारी सूज ही शरीरात होणारे बदल किंवा त्रासांबद्दल सूचित करते. सामान्यतः एखाद्या जागी दुखापत झाल्यावर सूज येते; पण कधी कधी शरीराच्या कोणत्याही भागात सूज येणं हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.
सूज आल्यावर बऱ्याच वेळा ताप येतो आणि तहान जास्त लागते. शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सूज येते. शरीराच्या एखाद्या भागामध्ये सूज येणं हे लक्षण त्या भागाच्या समस्येकडे इशारा करतं. काही आजारही सूज येण्यास कारणीभूत होतात. आता प्रश्न असा आहे की, ही सूज येणं म्हणजे नेमकं काय असतं आणि त्यामुळे कोणकोणते गंभीर आजार होऊ शकतात.
सूज किंवा दाह ही शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी एखाद्याला दुखापत, संसर्ग किंवा टिश्यूंचे नुकसान यावर शरीराने व्यक्त केलेली प्रतिक्रिया असते.
सूज वाढल्यामुळे होणारे ४ गंभीर आजार कोणते असू शकतात ते पाहूया… (Swelling Causes Diseases)
- हृदयविकाराचा (Heart Disease) धोका वाढतो.
- सांधेदुखी आणि गाठ (Arthritis) यांसारख्या त्रासांची शक्यता वाढते.
- नैराश्य (Depression) आणि मेंदूच्या समस्या होऊ शकतात.
- मधुमेह आणि स्थूलता (Diabetes & Obesity) यांसारख्या आजारांचा धोका वाढतो
वेबएमडीच्या माहितीनुसार, सूज असल्यास शरीराची ताकद आणि कार्यक्षमता या दोन्ही गोष्टी कमी होतात, पचनाचे त्रास वाढतात आणि त्वचादेखील खराब दिसू लागते. जर तुम्ही आयुर्वेदानुसार सूज कमी करू इच्छित असाल, तर योग आणि प्राणायाम करा. भरपूर पाणी प्या. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) बाहेर टाकायला मदत होते. साखर, प्रोसेस्ड फूड आणि तळलेले पदार्थ टाळा. चांगली झोप घ्या आणि तणाव नियंत्रणात ठेवा. कारण- सततचा तणाव (क्रॉनिक स्ट्रेस) सूज वाढवू शकतो.
भारतीय योग गुरू, लेखिका, संशोधक व टीव्हीचे वलयांकित व्यक्तिमत्त्व डॉ. हंसा योगेंद्र यांनी सांगितले की, काही पेयांद्वारे तुम्ही सहजपणे शरीरातील सूज कमी करून, होणाऱ्या आजारांपासून बचाव करू शकता. चला तर मग जाणून घेऊया तज्ज्ञांकडून की अशी कोणती पेये आहेत, जी सूज कमी करतात आणि शरीराला निरोगी ठेवतात.
जामू ज्यूस प्या
जामू ज्यूस (Jamu Juice) हा इंडोनेशियातील पारंपरिक हर्बल ज्यूस आहे. या पेयाचा पर्याय सूज कमी करणे, पचन सुधारणे व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी शेकडो वर्षांपासून वापरला जातो. जामू ज्यूस एक लोकप्रिय पेय आहे, ज्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी (दाहविरोधी) गुणधर्म असतात. या पेयाचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीर आजारांपासून सुरक्षित राहते. अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स व इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असलेले हे पेय शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून काढते, सूज कमी करते आणि शरीर सुस्थितीत ठेवते.
जामू ज्यूस बनवण्यासाठी १ चमचा हळद पावडर, १ तुकडा आले, २ चमचे लिंबाचा रस, १–२ चमचे मध, २ कप पाणी व एक चिमूटभर काळी मिरी घ्या. आले व हळद मिक्सरमध्ये वाटा आणि पाण्यात घालून, ती १० मिनिटं उकळा. नंतर ते द्रावण गाळून थंड करा. मग त्यात लिंबाचा रस आणि मध घाला. हे ज्यूस दिवसात १–२ वेळा प्या, त्यामुळे शरीरातील सूज नियंत्रणात राहील.
अननस आणि हळदीची स्मूदी
अननस आणि हळदीची स्मूदी हे एक अतिशय आरोग्यदायी, चवदार व सूज कमी करणारे पेय आहे. ही स्मूदी घेतल्याने शरीरातील सूज, सांधेदुखी, अॅलर्जी, त्वचेवरील सूज व पचनाशी संबंधित सूज कमी करता येते. हळदीमध्ये असणारे करक्युमिन हे सूज कमी करण्यास मदत करते. त्यामध्ये जंतूंना मारणारे आणि सूज कमी करणारे गुणधर्म असतात. व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन डीने भरलेली ही स्मूदी सूज नियंत्रणात ठेवते.
ही स्मूदी बनवण्यासाठी १ कप ताजे अननसाचे तुकडे, १/२ चमचा हळद पावडर, एक चिमूटभर काळी मिरी, १/२ कप नारळ पाणी किंवा नारळ दूध, १/२ केळं, १ छोटा तुकडा आले आणि १ चमचा मध घ्या. सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाका, व्यवस्थित ब्लेंड करा आणि त्याचे सेवन करा.