डिझाइनचे तत्त्व- समतोल

इतर काही गोष्टींप्रमाणेच गृहसजावटीमध्येही समतोल राखणं महत्त्वाचं ठरतं.

इतर काही गोष्टींप्रमाणेच गृहसजावटीमध्येही समतोल राखणं महत्त्वाचं ठरतं. वस्तूच्या विविध घटकांवर हा समतोल अवलंबून असतो. याबाबत नेमका अभ्यास केला तर गृहसजावट चतन्यपूर्ण दिसते.

तुम्ही सगळ्यांनीच लहानपणी माकड, दोन बोके आणि खव्याची गोष्ट ऐकली असणार. दोन बोके ‘खवा कोण खाणार’वरून भांडत असतात. एक माकड हे भांडण बघते व भांडण सोडवायला पुढे सरसावते. चतुराईने दर वेळी तराजूत असमान वाटा करून, ज्या बाजूचा खवा जास्त तो खवा स्वत: मटकावते. असे करता करता सगळा खवा माकडाच्या पोटात जातो!! लहानपणी बाबा मला ही गोष्ट रंगवून रंगवून सांगायचे. बोक्यांची झालेली फजिती ऐकून मला हसू यायचे. ‘दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ’ असे जरी गोष्टीचे तात्पर्य असले तरी ‘असमानता न समजल्याने पचका होतो’ असा मी, माझ्या पुरता अर्थ काढला. बॅलेन्स किंवा समतोलाशी झालेली माझी ही पहिली ओळख. किती छान तऱ्हेनी पंचतंत्रात या मूलभूत तत्त्वाबद्दल मुलांना गोष्टी रूपाने समजावून सांगितले आहे. असमानता-मग ती वजनात असो किंवा आयुष्यात, कधीच हितकारक नसते.

बालपणानंतर जसजसे आपण मोठे होतो तसतसे समतोलाबद्दलचे आपले संदर्भही बदलू लागतात. त्याला खोलवर अर्थ प्राप्त होतो. अभ्यास आणि खेळातील समतोल, कौटुंबिक आयुष्य आणि कामातील समतोल, एवढेच नाही तर वजन वाढते तेव्हा दिला जाणारा समतोल आहार किंवा बॅलन्स डायट. हे काय प्रकरण आहे समतोल म्हणजे? का त्याला इतके महत्त्व दिले जाते? खरे तर तोल साधण्याची सुरुवात आपली, आपण पहिले पाउल टाकतो तेव्हा पासूनच होते. दहा वेळा आपटतो तेव्हा कुठे तोल सावरायला शिकतो. चायनीज तत्त्वज्ञान तर पूर्ण यीन आणि यांग या दोन विरुद्ध शक्तींचा समतोल साधण्यावरच आधारित आहे. काय होते जर का हा समतोल साधला गेला नाही तर? माणसांच्या बाबतीत बोलायचे झाले तर माणूस कोलमडतो किंवा पडतो, एका बाजूला झुकल्यासारखा वाटतो आणि कलेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ती कलाकृती गुंतागुंतीची, अस्वस्थ करणारी भासते.

गृहसजावटीमध्ये तर समतोल खूपच महत्त्वाचा. हे दृश्य माध्यम असल्याने तोल सांभाळण्याची क्रिया अर्थातच डोळ्याला भासणाऱ्या वजनावर  (visual weight) अवलंबून असते. किंवा थोडक्यात सांगायचे तर ज्याकडे आपले लक्ष आकर्षति होते त्याचे व्हिज्युअल वजन जास्त. हा समतोल वस्तूंचे आकारमान, रंग, पोत, पारदर्शकता यावर अवलंबून असतो. थोडय़ाशा अभ्यासाने व कल्पकतेने आरामात हा समतोल आपण साधू शकतो. ज्यामुळे आपली गृहसजावट निश्चितच हटके आणि चतन्यपूर्ण दिसते.

मग कसा साधायचा हा तोल? तुमच्यापकी बऱ्याच जणांनी होडीतून प्रवास केला असेल. होडी चालू करण्यापूर्वी सर्वप्रथम नावाडी काय करतो तर होडीच्या दोन्ही बाजूंना प्रवाशांच्या वजनानुसार समान विभागणी करतो. कारण तर आपल्या सर्वाना माहीतच आहे- एका बाजूला जास्त वजन होऊन होडी बुडू नये म्हणून. याच फंडय़ाला गृहसजावटीत आपण सिमिट्रीकल बॅलन्स (Symmetrical Balance) किंवा समरूप तोल म्हणतो. ज्याप्रमाणे माणसांची समान विभागणी होते, त्याचप्रमाणे खोलीची मधोमध उभी किंवा आडवी विभागणी करून डाव्या बाजूचे फíनचर जसेच्या तसे उजव्या बाजूला मांडले जाते! ही आहे सर्वात सुरक्षित व अचूक मांडणी. सगळ्यांना जमणारी आणि सर्वाना आवडणारी. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ताजमहाल. डाव्या बाजूचे मनोरे, जाळी, घुमट जसेच्या तसे उजवीकडे साकारले आहेत. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळचे राजवाडे, देवळे, मुघल गार्डन्स या रचनेचा उत्तम नमुना आहेत. ही कलाकृती गृहसजावटीत अवश्य वापरावी.

समरूप तोलाच्या विरुद्ध थोडीशी हटके आणि नावीन्यपूर्ण रचना म्हणजे असिमिट्रिकल बॅलन्स किंवा असंतुलित तोल. ही रचना जास्त जिवंत व रसरशीत वाटते. यात आधी सांगितलेल्या साचेबंध रचनेला पूर्ण फाटा देऊन समतोल साधला जातो. यात एखाद्या डोळ्यांना जड भासणाऱ्या वस्तूचे छोटय़ा छोटय़ा वस्तूंच्या एकत्रीकरणातून संतुलन साधले जाते. उदाहरणार्थ जड दिसणाऱ्या सोफ्याला संतुलित करायला तसाच सोफा न ठेवता त्या सोफ्याच्याच कापडाच्या खुच्र्या ठेवून, जड फुलदाणीच्या विरुद्ध दिशेला फुलदाणीच्या रंगाच्या छोटय़ा कँडल्सचा ग्रुप करून किंवा पडद्यावरील डिझाइन सोफ्यावरील कुशन्सवर करून समतोल साधला जातो. यामध्ये आपण काय करतो तर व्हिझ्युअल वेट एकाच जागी केंद्रित न करता त्याची खोलीभर समान विभागणी करतो.

तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या डोळ्याला जड भासतात? आणि ज्याचा गृहसजावटीवर थेट परिणाम होतो? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थातच आकार. जसे होडीमध्ये तुमचे वास्तविक / खरे वजन लक्षात घेतले जाते तसे गृहसजावटीत वस्तूंचा आकार लक्षात घेतला जातो. जेवढा आकार मोठा तेवढे त्याचे डोळ्याला भासणारे वजन जास्त. समजा आपल्याला झोपायच्या खोलीची रचना बदलायची आहे, अशावेळी खोलीतील कपाट, पलंग, टेबल या सगळ्या मोठय़ा आणि जड वस्तू सहाजिकच आधी नजरेत भरतात. अशा जड गोष्टी एका बाजूला आणि दुसरी बाजू पूर्ण रिकामी ठेवल्यास होडीप्रमाणे खोली एका बाजूलाच जड होऊन तिचा समतोल ढळल्यासारखा वाटेल. तिची मांडणी चुकीची भासेल. अशा वेळी काय करावे तर वस्तूंची त्यांच्या दृश्य वजनानुसार खोलीभर समान विभागणी करावी जेणेकरून खोली संतुलित व आरामदायी वाटेल. काही अपरिहार्य कारणामुळे खोलीच्या एकाच बाजूला सगळे फíनचर ठेवणे भाग असेल तर अशा वेळी काच, आरसा, स्टील या पारदर्शक व प्रकाश परावर्तित करणाऱ्या गोष्टींचा योग्य वापर फíनचर बनवण्यासाठी केल्यास सजावटीला हलकेपणा येऊन तोल सांभाळायला मदत होते.

परवाच एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले असताना तेथील सजावटीच्या प्रेमातच पडले. जेमतेम ५०० फुटांची जागा. पण कल्पकतेने सजवल्यामुळे तरुणांचा अड्डाच बनला होता तिथे. विचार केल्यावर जाणवले, ही जागा लोकांना आपलीशी वाटण्याचे मुख्य कारण म्हणजे सजावटीत वापरलेले वेगवेगळे पोत किंवा टेक्स्चर्स. दोन मिनिटे फक्त विचार करा तुमची आजूबाजूची जागा टेक्स्चर्सशिवाय कशी दिसेल ती. किती सगळ्या गोष्टी सपाट, निस्तेज वाटतील. त्या गुबगुबीत काप्रेटमध्ये रुतणारे पाय, लाकडाचा नसíगक खडबडीत स्पर्श, स्टीलचा गुळगुळीत थंडगारपणा आणि आईच्या साडीचा मऊपणा!! या सगळ्या गोष्टी अनुभवू शकतो फक्त आणि फक्त त्या वस्तूवरील टेक्स्चर्समुळे. आकाराप्रमाणेच ज्या वस्तूचा पोत (texture) जास्त, त्या वस्तूचे वजन जास्त. स्पर्शाने एखाद्या गोष्टीचा खडबडीतपणा किंवा गुळगुळीतपणा जाणवतो, तसाच तो नजरेलासुद्धा जाणवतो. सजावटीत वेगवेगळे पोत वापरल्यास सजावटीला खूप उठाव येतो. जसे आकाराच्या बाबतीत बघितले तसेच जास्त टेक्स्चर्स असलेल्या गोष्टी एकत्र ठेवल्यास सजावटीचे संतुलन बिघडेल. यावर उपाय म्हणजे दोन विरुद्ध टेक्स्चर्सचे कल्पकतेने केलेले एकत्रीकरण. यामुळे सजावटीला वेगळीच उंची लाभते. जसे खडबडीत िभतीवर सुळसुळीत पडदे, लाकडाच्या ओंडक्यावर ठेवलेली काच, दगडी शोभेच्या भांडय़ात गुलाबाच्या पाकळ्या या छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून सजावट खुलते. दुर्दैवाने गृहसजावटीत महत्त्वाचा असणारा हा घटक सर्व सजावट झाल्यानंतर विचारात घेतला जातो. तसे न करता आधी याचा विचार करून नंतर त्यानुसार बाकीची सजावट केल्यास शेवटी समतोल साधण्याची मारामार होणार नाही.

आकार आणि पोत याप्रमाणेच रंग, आकृत्या, प्रकाश, पेंटिंग्स या गोष्टीही खोलीत संतुलन साधायला हातभार लावतात. कसा, ते आपण पुढच्या लेखात बघू.

गृहसजावटीत जिवंतपणा आणण्यासाठी या लक्ष आकर्षति करणाऱ्या गोष्टी असणे फार गरजेचे आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणे जरुरीचे आहे की या डोळ्यांना जड दिसणाऱ्या गोष्टींची उपस्थिती ही भरलेल्या ताटातल्या लोणच्या एवढीच असावी. चमचाभरच-पण लज्जत वाढवणारी आणि पंचपक्वान्नाच्या ताटाला पूर्णत्व देणारी.
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Symmetrical balance in interior design