स्मार्टफोनची बॅटरी लवकर उतरण्याची समस्या अनेकांना सतावते. खरंतर पूर्वीचे फोन दोन-दोन, तीन-तीन दिवस चार्ज करण्याची गरजच पडायची नाही, पण आता दिवसातून किमान दोनदा तरी स्मार्टफोन चार्ज करावा लागतो. पण फोन चार्ज करताना आपण काही चुका आपण हमखास करतो. या चुका टाळल्या तर फोनची बॅटरी दीर्घकाळ टिकायला नक्कीच मदत होईल, त्यामुळे फोन चार्ज करताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा.
– अनेकांना स्मार्टफोनची बॅटरी पूर्णपणे उतरल्यावर तो चार्ज करण्याची सवय असते. पण असं न करता बॅटरी २० टक्क्यांवर आली की फोन चार्ज करावा.
– अगदी १०० टक्के चार्जिंग केली नाही तरी चालेल पण नेहमी फोन किमान ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ द्यावा.
– फोन चार्ज करताना काहीजण त्या मोबाईल कंपनीचा चार्जर न वापरता मिळेल तो चार्जर घेऊन फोन चार्ज करतात. पण असं करणं चुकीचं आहे. प्रत्येक फोनची बॅटरी ही वेगवेगळी असते तिला किती ऊर्जा आवश्यक आहे, याचं ठराविक प्रमाण असतं त्यामुळे नेहमीच मोबाईल कंपनीच्या चार्जरने फोन चार्ज करावा.
– फोन रात्रभर कधीही चार्ज करत ठेवू नये. जास्तवेळ बॅटरी चार्ज झाल्याने तिची ‘बॅटरी लाईफ’ कमी होते.
– पॉवर बँक वापरून फोन चार्ज करतेवेळी कधीही फोनवर बोलू नये, यामुळे फोनचं आतील तापमान वाढतं आणि यामुळे ‘बॅटरी लाईफ’ कमी होण्याची शक्यता अधिक असते.
– जर तुम्ही मोबाईल कव्हर वापरत असाल, तर फोन चार्ज करताना मोबाईल कव्हर काढून मग फोन चार्ज करावा.
– स्वस्तातले चार्जर फोन चार्ज करण्यासाठी कधीही वापरू नये, यामुळे बॅटरीला अधिक धोका निर्माण होतो आणि बॅटरी लवकर खराब होते.