Tongue cancer sign and symptoms: आजकालच्या या धावपळीच्या जीवनात कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जर कॅन्सरला वेळीच रोखले गेले नाही तर मग हा आजार आपल्या जिवावरसुद्धा बेतू शकतो. कॅन्सरबद्दल एक गोष्ट अनेकदा बोलली जाते ती म्हणजे, जर वेळीच या आजाराचे निदान झाले तर त्यावर उपचार शक्य असतो. जिभेच्या पेशींपासून सुरू होणारा जिभेचा कर्करोग हा तोंडाच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. हा कर्करोग जिभेच्या पुढच्या भागात किंवा घशाच्या मागच्या भागात होतो. हा भारतातील एक सामान्य कर्करोग आहे, जो पुरुषांमध्ये जास्त आढळतो. तोंडाचा आणि जिभेचा कर्करोग हा भारतात सर्वात सामान्य कर्करोग आहे. राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रम (NCRP) नुसार, भारतात दरवर्षी तोंडाच्या कर्करोगाचे ७७,००० हून अधिक नवीन रुग्ण नोंदवले जातात, त्यापैकी बहुतेक जिभेचे कर्करोग असतात. हा आजार ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो.
आकाश हेल्थकेअरच्या सर्जिकल ऑन्कोलॉजीचे संचालक डॉ. अरुण कुमार गिरी म्हणाले की, भारतात जिभेचा कर्करोग सामान्य होत चालला आहे, ज्याची अनेक कारणे असू शकतात. हा आजार अनुवांशिकदेखील असू शकतो आणि काही कारणेदेखील त्यासाठी जबाबदार असू शकतात. सहसा हा आजार धूम्रपान, तंबाखूचे जास्त सेवन, गुटखा, पान मसाला आणि अल्कोहोलमुळे होतो.
जिभेच्या कर्करोगाचे अनुवांशिक कारण
काही लोक असे आहेत जे पान, गुटखा आणि तंबाखू खात नाहीत, त्यांचा कोणताही कौटुंबिक इतिहास नाही, पण तरीही त्यांना कर्करोग आहे, यासाठी अनुवांशिक कारणे जबाबदार आहेत. अनुवांशिक म्हणजे त्यांच्या डीएनएमध्ये काही बदल झाला आहे, ज्यामुळे त्यांना हा कर्करोग झाला आहे.
जिभेच्या कर्करोगाचे टप्पे
जसे प्रत्येक प्रकारच्या कर्करोगाचा एक टप्पा असतो, तसेच या कर्करोगाचाही एक टप्पा असतो. जिभेच्या कर्करोगाचे चार टप्पे असतात, स्टेज १, स्टेज २, स्टेज ३ आणि स्टेज ४; जी सर्वात धोकादायक स्थिती आहे. चौथ्या टप्प्यात कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरतो. तज्ज्ञांनी सांगितले की, सुरुवातीच्या टप्प्यात होणाऱ्या कर्करोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे, केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया वापरली जातात.
कोणत्या टप्प्यावर यशस्वी उपचार करता येतात?
डॉक्टरांनी सांगितले की, जर सुरुवातीलाच हा कर्करोग आढळला तर त्यावर यशस्वीरित्या उपचार करता येतात. तज्ज्ञांनी सांगितले की स्टेज १ आणि स्टेज २ हे कर्करोगाचे असे टप्पे आहेत, ज्यात कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. स्टेज ३ मध्ये आयुष्य जास्त असू शकते, परंतु स्टेज ४ मध्ये परिणाम चांगला नसतो आणि रुग्णाचा जीव धोक्यात राहतो.
शरीरात दिसणारी जिभेच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे
- जिभेवर न बरा होणारा फोड. हा फोड दोन ते तीन आठवड्यांतही बरा होत नाही.
- जिभेवरील जखमेतून रक्त येणे.
- जेवताना जिभेत वेदना होणे.
- जिभेवर लाल किंवा पांढरे डाग येणे.
- घशातून अन्न गिळण्यास त्रास होणे.
- जीभ हलवण्यास त्रास होणे.
- आवाजात बदल होणे.
- जेवताना, पिताना किंवा बोलताना वेदना होणे.
- जिभेवर गाठ किंवा सूज येणे.
- चव बदलणे किंवा जिभेचा बधीरपणा.
- तोंडाची दुर्गंधी
- जबडा किंवा घशात कडकपणा येणे ही जिभेच्या कर्करोगाची लक्षणे आहेत.
- मसालेदार आणि तेलकट अन्न जिभेच्या कर्करोगात विषासारखे काम करते.
जिभेचा कर्करोग कसा टाळावा
- तंबाखू आणि अल्कोहोल पूर्णपणे टाळा.
- तोंड आणि दात नियमितपणे स्वच्छ करा.
- जर तुम्ही तंबाखू किंवा अमली पदार्थांचे सेवन करत असाल तर वर्षातून एकदा तोंडाच्या कर्करोगाची तपासणी करून घ्या.
- दंत स्वच्छतेकडे लक्ष द्या.
- निरोगी आहार आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा.