फिरणं, भटकंती करणं अनेकांनाच आवडतं पण मग कधी कधी प्रश्न येतो तो पैशांचा. हॉटेल्समध्ये राहणं, बाहेर जेवणं आणि एकंदरीत फिरण्याचा खर्च परवडण्यापलीकडे होतो आणि मग खिशाला चांगलीच कात्री लागते. स्वस्तात मस्त फिरण्यासारख्या काही ठराविक जागा आहेत, जिथे तुम्हाला ट्रीपचं बजेट फार काही लागत नाही. पण फिरण्याचा आनंद तितकाच लुटता येतो. म्हणूनच अशा काही ठिकाणांबद्दल जाणून घ्या जिथे तुम्ही साधारणपणे तीन ते पाच दिवसांची ट्रीप अगदी माफक बजेटमध्येही करू शकता..

१. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स (उत्तराखंड)


निसर्गसौंदर्य अनुभवायचं असेल तर उत्तराखंडमधल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्ससारखं दुसरं ठिकाण नाही. साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ पर्यटकांसाठी खुली होऊ लागते. सूर्यप्रकाशात डोलणारा फुलांचा बहर पाहून तुम्हीसुद्ध थक्क व्हाल यात काही शंका नाही. हिमालयाच्या उंच शिखरांमध्ये बद्रिनाथ आणि गोविंदघाटपासून जवळ ही व्हॅली वसली आहे. ब्रह्मकमळ, ब्ल्यू पॉपी आणि कोब्रा लिली यांसारखी दुर्मीळ फुलं त्याचप्रमाणे वाइल्ड रोज, डेलिया, सैक्सिफेज, ट्युलिप या फुलांच्या अनेक जाती, त्यांचे विविध रंग पाहताना तुम्ही स्वत:ला विसरून जाल. अवघ्या ४ हजार रुपयांत इथे ३ दिवसांची सोय करणारी उत्तम हॉटेल्स उपलब्ध आहेत.

२. माऊंट अबू (राजस्थान)


थोड्या जास्त दिवसांच्या सुट्टीचा प्लान असेल तर राजस्थानातील माऊंट अबू हे ठिकाण खास उन्हाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. आरवली पर्वतातले हे सुप्रसिद्ध हिल स्टेशन. पर्यटकांचा कायम ओढा असलेल्या या ठिकाणी हॉटेल्स फार काही महागडी नाहीत. इथेसुद्धा पाच ते सहा हजार रुपयांमध्ये ४ दिवस ३ रात्रींचं पॅकेज मिळतं.

३. डलहौसी ( हिमाचल प्रदेश)


हिमाचल प्रदेशमधील कुलू-मनाली, शिमला, डलहौसी आणि धरमशाला ही निसर्गाने वेढलेली ठिकाणं पाहणं म्हणजे डोळ्याची पारणं फिटण्याचा अनुभव असतो. हिमालयाच्या रांगांमध्ये वसलेल्या डलहौसी या ठिकाणाला चहुबाजूंनी निसर्गसौंदर्याची देणगी लाभली आहे. फक्त ५ हजार रुपयांमध्ये इथे ३ दिवसांच्या मुक्कामाची सोय होऊ शकते.

४. कुर्ग (कर्नाटक)


कर्नाटकातील कुर्ग हे निसर्गरम्य हिरवेगार असे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. वेलची आणि मसाल्याच्या झाडांची ओळख येथे होते. चहाचे मळे कॉफीबियांची पैदास पाहता येते. निसर्गाच्या कुशीतलं हे ठिकाण नक्कीच सगळ्यांना आवडेल असं आहे. इथे ६ हजार रुपयांत इथे ३ दिवसांची सोय करणारी उत्तम हॉटेल्स उपलब्ध आहेत.

५. ओरछा, मध्यप्रदेश


ओरछा हे आवर्जून पाहावे असे बुंदेलखंडातील झाशीजवळील एक ठिकाण, मध्य प्रदेश राज्याच्या टिकमगड जिल्ह्यात आहेत. महत्वाचं म्हणजे इथे फक्त २ रात्र आणि ३ दिवसाचा खर्च हा फक्त ४ हजार ५०० रुपये इतका आहे. अत्यंत प्राचीन अशी मंदिरं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. शिवाय या जागेचं सौंदर्य सर्वात जास्त खुलतं ते पावसाळ्यात.