How To Eat Ghee On Empty Stomach: तूप, हे प्राचीन सुपरफूड पौष्टिक गुणधर्मांमुळे आजही अनेकांच्या डाएटचा महत्त्वाचा भाग आहे. आयुर्वेदाविषयी सविस्तर माहिती देणाऱ्या चरक संहितेमध्ये सुद्धा वात आणि पित्त विकारांनी ग्रस्त असलेल्यांसाठी तुपाच्या फायद्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पचन सुरळीत करणे, रोग प्रतिकारशक्ती वाढवणे, दृष्टी वाढवणे अशा नानाविध फायद्यांसाठी तूप ओळखले जाते. पण प्रत्येक चांगली गोष्ट ही जोडीला ‘पण’ घेऊन येत असते, तसेच तुपाचे सेवन सुद्धा कधी, किती व कसे करायला हवे याविषयी जाणून घेणे गरजेचे आहे.
आयुर्वेदतज्ज्ञ डॉ रेखा राधामोनी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये आरोग्याच्या फायद्यासाठी तूप सेवन करण्याच्या योग्य आणि चुकीच्या पद्धतींबद्दल सांगितले आहे. यानुसार सकाळी एक चमचा तूप खाणे कितपत योग्य आहे आणि फायदे मिळवण्यासाठी नेमकं कोणत्या पद्धतीने तूप खायला हवं हे जाणून घेऊया..
सकाळी रिकाम्या पोटी तूप खाणे योग्य आहे का?
डॉ राधामोनी यांच्या माहितीनुसार, तूप हा अधिक कॅलरीजयुक्त असा जड पदार्थ आहे. तुपाचे सेवन करताना आधी तूप शिजवणे किंवा गरम करणे हे गरजेचे असते. सहसा कच्चे तूप खाणे टाळणेच उचित ठरेल.
तूपाचे सर्व फायदे मिळवण्यासाठी सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते शिजवलेल्या स्वरूपात खावे. मग अगदी, जेव्हा तुम्ही डाळ बनवत असाल, तेव्हा शिजवताना किंवा फोडणी देताना तूप वापरू शकता. तेलापेक्षा तुपात भाजी परतून घेऊ शकता किंवा सगळ्यात उत्तम सरळ पोळीला तूप लावून किंवा भातावर चमचाभर तुप घालून खाऊ शकता. जेव्हा तुम्ही फायबर युक्त भाज्यांच्या जोडीने तुपाचे सेवन करता तेव्हा पचनाचा वेग खऱ्या अर्थाने सुधारू शकतो. तसेच वरणभात व तुपामुळे प्रोटीन अधिक उत्तमरित्या शरीरात शोषले जाऊ शकते.
हे ही वाचा<< ३० दिवस चहा बंद! एका महिन्यात शरीरात काय व कसे बदल दिसतील? फायदेच नाही, तोटेही आहेत, तज्ज्ञ सांगतात…
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. यासंदर्भात गरज लागल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला सुद्धा आवर्जून घ्या)