How to make turmeric milk for weight loss: कधी ना कधी तुमच्या आईने हळदीचे दूध पिण्याचा आग्रह केलाच असेल. तुम्हाला दुखापत झाली असेल किंवा सर्दी झाली असेल हळदीचे दूध आवर्जून प्यायला दिले जाते. हे चमत्कारिक पिवळे दूध सर्व काही बरे करते असा समज आहे. महत्त्वाचं म्हणजे आता तेच हळदीचे दूध परदेशात गोल्डन मिल्क म्हणून प्रसिद्ध आहे. तेव्हा हे आता आजीच्या स्वयंपाकघरांपुरते मर्यादित राहिलेले नाही. बालपणीचे हळदीचे दूध अगदी हाय फाय कॅफेजमध्ये आणि रेस्टॉरंट्समध्ये एका नवीन नावाने दिले जाते. हे प्यायल्यानंतर कोणीही म्हणतं की, वाह, काय पेय आहे… आपल्या आजीने एकेकाळी घरगुती उपचार म्हणून केलेला पदार्थ आता जगभरातील वेलनेस ट्रेंड ठरत आहे.
हळदीच्या दूधामुळे सर्दी आणि शरीरदुखीसारख्या अनेक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते, मात्र वजन कमी करण्यासदेखील मदत होऊ शकते. हळदीचे दूध पिऊन तुम्ही वजन कमी करू शकता, पण ते एका विशिष्ट पद्धतीने बनवल्यास त्याचा परिणाम आरोग्यदायी ठरतो.
हळदीचे दूध इतके फायदेशीर का आहे?
हळद हा काही सामान्य मसाल्याचा घटक नाही. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीव्हायरल आणि दाहकविरोधी गुणधर्म आहेत. म्हणूनच सर्दी, थकवा किंवा झोपेच्या समस्यांवर हे प्रभावी मानले जाते.
हळदीचे दूध आणि वेटलॉस
हळदीचे दूध आणि वजन कमी करते ते कसे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी सांगितले की, हळदीचे दूध वजन कमी करण्यास आणि शरीराला तंदुरूस्त ठेवण्यास मदत करू शकते. हळद आणि दूध एकत्रितपणे शरीरातील चांगले फॅट, अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक विरोधी घटक वाढवतात. त्यामुळे फॅट जलदगतीने कमी होण्यास आणि शरीर जलदगतीने बरे होण्यास मदत होते.
वेटलॉससाठी हळदीचे दूध घेताना कोणते दूध वापरावे?
याबाबत ऋजुता दिवेकर सांगतात की, हळदीचे दूध बनवण्यासाठी ताजे, फुल क्रीम दूध सर्वात बेस्ट आहे. सर्वात चांगले दूध ते असते, जे फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होते. सोप्या भाषेत सांगायचं तर पॅक न केलेलं गाई किंवा म्हशीचं दूध सर्वोत्तम असते, कारण त्यात कोणतीही रसायने मिसळलेली नसतात आणि फ्रिजमध्ये न ठेवल्यास ते लवकर खराब होते. जर हे उपलब्ध नसेल तर बदाम, ओट्स किंवा सोया दूधदेखील वापरू शकता.
कोणती हळद सर्वात जास्त चांगली
ऋजुता यांच्या मते, हळद निवडताना काही विशिष्ट गोष्टी पाहण्याची गरज नाही. विशिष्ट ब्रँडची हळद खरेदी करणे आवश्यक नाही, फक्त ती चांगल्या दर्जाची आहे याची खात्री करून घ्या. जर तुम्हाला ती सापडली तर नैसर्गिक किंवा सेंद्रिय हळद सर्वात उत्तम. केळीच्या झाडाच्या सावलीत उगवलेली हळद ही सर्वात चांगली असते असे म्हटले जाते.
किती हळद वापरावी?
एक ग्लास कोमट दुधात एक चिमूटभर हळद घालावी. हे प्रमाण तुमचे वजन कमी करण्यास मदत करू शकते.
कसे तयार करावे हळदीचे दूध?
साहित्य– १ कप दूध, अर्धा टिस्पून हळद पावडर, एख चिमूटभर काळी मिरी, अर्धा टिस्पून तूप किंवा नारळ तेल (पर्यायी), अर्धा टिस्पून मध किंवा गूळ (पर्यायी) आणि दालचिनीचा एक छोटा तुकडा किंवा पाव टिस्पून दालचिनी पावडर.
पद्धत– दूध एका भांड्यात घ्या आणि ते मंद आचेवर गरम करा. त्यात हळद, काळी मिरी आणि दालचिनी घाला. साधारण ३ ते ५ मिनिटे उकळू द्या. गॅस बंद करून ते थंड होऊ द्या. दूध कोमट थंड झाल्यावर त्यात गूळ किंवा मध घाला आणि त्याचे सेवन करा.
