Urine Hold Problem on Health: कामाच्या धावपळीमध्ये आपण अनेकदा खायचं तर विसरतोच, पण लघवीसाठी वेळ काढायलाही विसरतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की कामातली ही व्यस्तता आणि लघवी थांबवण्याची सवय तुमच्या आरोग्याची शत्रू ठरू शकते? कधी कधी लघवी थांबवणं गरजेचं असू शकतं, पण जर तुम्ही ही सवय म्हणून नेहमी करत असाल, तर तुम्ही आपल्या आरोग्याशी खेळत आहात. लघवी थांबवत राहिल्याने युरीनशी संबंधित अनेक त्रास होऊ शकतात.
वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथील युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. आशुतोष बघेल यांच्या मते, आपल्या शरीरातील मूत्राशय (ब्लॅडर) हा एका फुग्याप्रमाणे असतो. जेव्हा ब्लॅडर हळूहळू लघवीने भरू लागतो, तेव्हा एक मर्यादा गाठल्यावर तो मेंदूला सिग्नल पाठवतो की आता लघवी करायची वेळ झाली आहे. पण जर हा सिग्नल वारंवार दुर्लक्षित केला आणि लघवी रोखून धरली, तर मूत्राशयाच्या स्नायूंवर दबाव येतो, आणि त्यामुळे पुढे जाऊन अनेक आरोग्याच्या समस्या होऊ शकतात.
तज्ज्ञांनी सांगितले की लघवी रोखून धरल्याने ब्लॅडर फुगतो आणि त्याच्यावर ताण येतो. जर बराच वेळ हा ताण राहिला, तर विविध त्रास होऊ लागतात. चला तर मग जाणून घेऊया तज्ज्ञांकडून की लघवी खूप वेळ थांबवून ठेवल्यास कोणते त्रास होऊ शकतात.
यूटीआय आणि ब्लॅडर इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो…
पोषण तज्ज्ञ लीमा महाजन यांच्या मते, वारंवार किंवा जास्त वेळ लघवी थांबवण्याची सवय असल्यास यूटीआय होण्याचा धोका वाढतो. जेव्हा आपण मेंदूने दिलेला लघवी करण्याचा सिग्नल सतत दुर्लक्षित करतो, तेव्हा लघवी बराच वेळ ब्लॅडरमध्ये साठून राहते. त्यामुळे त्यामध्ये असलेले जंतू वाढू लागतात आणि हे संसर्ग मूत्रमार्ग व ब्लॅडरपर्यंत पोहोचू शकतात.
जेव्हा आपण ५-६ तास लघवी थांबवून ठेवतो, तेव्हा ब्लॅडरच्या कामावरही परिणाम होतो. अशाने ब्लॅडरचे स्नायू कमकुवत होतात आणि यूरीन लिकेज किंवा वारंवार लघवी लागणे अशा समस्या निर्माण होतात. या त्रासांपासून वाचायचे असेल, तर शरीराने लघवी करण्याचा संकेत दिल्यावर लगेच लघवी करावी. दिवसभर भरपूर पाणी प्या आणि लघवीशी संबंधित त्रास असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पेल्विक फ्लोअरचे स्नायू कमकुवत होऊ शकतात…
दररोज लघवी रोखून काम करत राहिल्याने ब्लॅडरचे स्नायू हळूहळू कमकुवत होतात आणि पेल्विक फ्लोअरची ताकदही कमी होते. पेल्विक फ्लोअर कमजोर झाल्यास लघवीची इच्छा नसतानाही लघवी सांडते. ब्लॅडर आरोग्यदायी ठेवण्यासाठी आणि लघवीशी संबंधित या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कीगल एक्सरसाइज करा. जर वारंवार यूरीन लिकेजची समस्या होत असेल, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
नैसर्गिक लघवी करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम
जेव्हा तुम्ही वारंवार किंवा जास्त वेळ लघवी थांबवता, तेव्हा हळूहळू शरीराच्या नैसर्गिक लघवी करण्याच्या प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो. युरोलॉजी तज्ज्ञांच्या मते, आपल्या मेंदू आणि ब्लॅडरमध्ये एक समन्वय असतो, जो हे ठरवतो की लघवी केव्हा करायची. पण जेव्हा आपण हा सिग्नल वारंवार दुर्लक्षित करतो, तेव्हा मेंदू हे सिग्नल गांभीर्याने घेणं कमी करतो.
यामुळे तुम्हाला लघवी करण्याची योग्य वेळ लक्षात राहत नाही आणि तुम्ही गरज नसताना देखील बाथरूमला जाऊ लागता. ही सवय नैसर्गिक ब्लॅडर रिफ्लेक्समध्ये बिघाड करू शकते. युरिन फंक्शन व्यवस्थित राहण्यासाठी, शरीराने दिलेले सिग्नल ओळखणे आणि योग्य वेळी प्रतिसाद देणे गरजेचे आहे.
लघवी रोखण्याची सवय किडनीचे नुकसान करू शकते… (Holding Pee Kidney Damage)
लघवी बराच वेळ थांबवून ठेवणं फक्त ब्लॅडरसाठीच नाही, तर किडनीसाठीही धोकादायक ठरू शकतं. जेव्हा आपण वारंवार किंवा लांब वेळ लघवी थांबवतो, तेव्हा मूत्राशयात वाढणारा दाब हळूहळू किडनीपर्यंत पोहोचतो. यामुळे किडनीवर ताण येतो आणि तिचं कामकाज बिघडू शकतं. तज्ज्ञांच्या मते, लघवी थांबवण्यामुळे किडनीमध्ये युरीन परत जाण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो आणि किडनीचे नुकसान होऊ शकते. ही सवय युरिक अॅसिडचं प्रमाणही वाढवते, ज्यामुळे गाऊट आणि किडनी स्टोनचा धोका निर्माण होतो.