Urine Leakage: लघवी वारंवार व खूप वेगाने येणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होणे, याला ओव्हरअॅक्टिव्ह ब्लॅडर सिंड्रोम (Overactive Bladder – OAB) म्हणतात. ही अशी स्थिती असते, ज्यामध्ये व्यक्तीला अचानक लघवी होते आणि काही वेळा तर असेही होते की, टॉयलेटपर्यंत पोहोचण्याआधीच लघवी बाहेर येते. लघवीवर नियंत्रण न राहणे हे याचे सामान्य लक्षण आहे.
ही समस्या सामान्यतः वृद्धांमध्ये दिसते; पण ती तरुण, महिला (बाळंतपणानंतर) किंवा मधुमेह व मेंदूशी संबंधित आजार असलेल्या लोकांमध्येही असू शकते.
अनेक लोक या त्रासाबद्दल लाज किंवा संकोचामुळे कोणाशी बोलत नाहीत, ना कुटुंबाशी, ना डॉक्टरांशी त्यामुळे ही समस्या अजून वाढते.
जर वेळेवर या समस्येवर उपचार केला नाही, तर या समस्येमुळे दैनंदिन आयुष्यात अडचणी येतातच; पण त्याचबरोबर विविध मानसिक तणाव, झोपेची कमतरता व सामाजिक अंतर अशा अडचणीही निर्माण करू शकते.
ओव्हरअॅक्टिव्ह ब्लॅडर (OAB) होण्याची पाच मुख्य कारणे खालीलप्रमाणे असू शकतात :
खराब जीवनशैली आणि चुकीचा आहार: म्हणजे जास्त प्रमाणात कॅफिन (कॉफी, चहा), धूम्रपान, व दारू पिणं.
तणाव: जास्त मानसिक ताणामुळे मूत्राशयाच्या स्नायूंवर परिणाम होतो आणि त्यामुळे लक्षणे वाढतात.
न्यूरोलॉजिकल (म्हणजे मेंदूसंबंधित) आजार: जसे की, मल्टिपल स्क्लेरोसिस किंवा पार्किन्सन्स, यामुळेही OAB ची लक्षणे तीव्र होतात.
मूत्रमार्गाचा संसर्ग (युरीन इन्फेक्शन): त्यामुळे लघवीवरील नियंत्रण सुटू शकते.
हार्मोनल बदल: शरीरात होणारे हार्मोनचे बदलही या समस्येला कारणीभूत ठरू शकतात.
एक्सेस अॅडव्हान्स युरोलॉजी सेंटर, नवी दिल्ली येथील डायरेक्टर व संस्थापक, तसेच सीनियर युरोलॉजी व अँड्रॉलॉजी तज्ज्ञ डॉ. आशीष सैनी यांनी सांगितले की, अर्जेंसी इनकॉन्टिनन्स हे ओव्हरअॅक्टिव्ह ब्लॅडरचे मुख्य कारण आहे.
या आजाराचे निदान करण्यासाठी सर्वांत आधी युरीन इन्फेक्शन आहे की नाही, हे तपासणे गरजेचे असते.
OAB चे निदान कसे करायचे?
तज्ज्ञांनी सांगितले की, ओव्हरअॅक्टिव्ह ब्लॅडरची समस्या ओळखण्यासाठी युरीन टेस्ट करणे गरजेचे आहे.
युरीन रूटीन, मायक्रोस्कोप व कल्चर टेस्ट करून ही समस्या आहे का, हे समजते.
अल्ट्रासाऊंड करूनदेखील याचे निदान केले जाऊ शकते.
महिलांमध्ये तणावामुळे ही अडचण होऊ शकते.
जर ही समस्या ५० वर्षांनंतर सुरू झाली, तर त्यासाठी PSA टेस्ट केली जाते.
OAB (ओव्हरअॅक्टिव्ह ब्लॅडर)पासून बचाव कसा करावा?
तज्ज्ञांनी सांगितले की, या त्रासात खूप पाणी पिणे टाळावे. दिवसाला फक्त ८ ते १० ग्लास पाणीच प्या.
जर तुम्ही बीअर पिता, तर ती टाळा. कारण- बिअरमुळे लघवीचे प्रमाण वाढते.
लघवी थोडा वेळ थांबवण्याची सवय लावा.
कीगल एक्सरसाइज (Kegel Exercises) करा. या पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजमुळे स्नायू (मांसपेशी) मजबूत होतात.
डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचा वापर नीट करा.