प्रवास करायचा म्हटलं की सर्वात मोठी अडचण वाटते ती म्हणजे बॅग भरण्याची. पॅकिंग करायचं म्हटलं की अनेक जणांना टेन्शन येते, कारण कोणत्या ठिकाणी जायचे, किती दिवस राहायचे आहे, कोणता विशेष कार्यक्रमला उपस्थित राहायचे आहे का या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करून पॅकिंगचे नियोजन करायचे असते. त्यामुळे हे काम फार कटकटीचे वाटते, त्यातच जर पॅकिंग करायला पुरेसा वेळ मिळाला नाही तर गडबडीत काही गोष्टी घेण्याचे राहून जाते आणि मग फिरायला गेलेल्या नव्या ठिकाणी त्या गोष्टी शोधाव्या लागतात. यासाठी जर तुम्ही आधीच पॅकिंग करताना काही टिप्स लक्षात ठेवल्या तर तुम्हाला ही अडचण येणार नाही.
पॅकिंग करताना या टिप्स लक्षात ठेवा
- तुम्ही फिरायला गेलेल्या ठिकाणी दिवसभरात काय काय करणार आहात, कोणत्या ठिकाणी जाणार आहेत यानुसार कपडे आणि इतर कोणते सामान घ्यायचे याची यादी बनवा.
- प्रवासासाठी योग्य बॅग निवडणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही सर्व सामान बसेल अशी बॅग निवडली तर सतत हातात दोन ते तीन बॅग्स घेऊन चालावे लागणार नाही, तसेच बॅग अशी निवडा ज्यामुळे पाठीवर किंवा खांद्यावर जास्त ताण येणार नाही.
- तुम्ही जर थंड ठिकाणी जाणार असाल तर थंडीचे जाड कपडे सोबत ठेवणे विसरू नका.
- साबण, परफ्युम असे पदार्थ सामानाबरोबर घेताना ते द्रव्य (लिक्विड) स्वरूपात घेणे टाळा. कारण त्यामुळे इतर सामान खराब होण्याची शक्यता असते.
- मेडिकल किट आठवणीने सोबत घ्या. यामध्ये तुम्हाला गरज भासू शकेल अशी औषधं देखील ठेवा.
- जर तुमची ट्रिप काही कारणांमुळे एक दोन दिवसांनी वाढली, तर अशावेळी एक्स्ट्रा कपड्यांची गरज भासते. म्हणून कुठेही प्रवासाला जाताना नियोजित दिवसांपेक्षा एक्स्ट्रा कपडे पॅक करावे.