बदलत्या काळाप्रमाणे फेसबुकमध्ये युजर्सच्या सोयीसाठी अनेक नवनवीन बदल केले जातात. अशाच दोन नवीन सुविधा येत्या काही काळात लाँच करण्यात येणार आहेत. ‘रेड एन्व्हलप’ आणि ‘ब्रेकींग न्यूज’ अशी या नव्याने येणाऱ्या फिचर्सची नावे असून त्यामुळे फेसबुक वापरणे आणखी सोपे होणार आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवहार सुरळीत करण्याच्यादृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरु शकते.
आपल्याला कोणाला पैसे पाठवायचे असल्यास रेड एन्व्हलप हे फिचर उपयोगी ठरणार आहे. नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झालेली असताना अशाप्रकारचे फिचर ही काळाची गरज आहे. ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फेसबुकच्या या फिचरचा फायदा होणार आहे. याशिवाय ब्रेकींग न्यूज या सुविधेमधून ताज्या घडामोडी यूजर्सना अगदी सहज कळू शकणार आहेत. या दोन्ही नव्याने येणाऱ्या सुविधांची अद्याप अधिकृत चाचणी झालेली नाही. मात्र त्याबाबत बोलणी आणि प्रक्रिया सुरु असल्याची मात्र जोरदार चर्चा आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला फेसबुकने आपल्या मेसेंजर अॅपमध्ये ग्रुप पेमेंट फिचर लाँच केले होते. त्यामुळे एका ग्रुपमधील व्यक्तींमध्ये पैशांचे व्यवहार करणे शक्य झाले होते. या दोन्ही नव्या फिचर्सचा असाच ग्राहकांना चांगला फायदा होऊ शकतो. सध्या फेसबुकचे २०७ कोटी युजर्स असण्याची शक्यता आहे. त्यातील जवळपास २७ कोटी युजर्स बनावट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेमेंटचा पर्याय फेसबुकसाठी कितपत योग्य असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.