वनस्पतिजन्य अन्नपदार्थ हे हृदयाच्या आरोग्याला उपकारक असतात, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. प्रोग्रेस इन कॉर्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार शेंगदाणे, बदाम, सोयाबीन, डाळी यांसारख्या पदार्थामुळे रक्तदाब, ट्रायग्लिसराइड असे परिणाम कमी होतात कारण वनस्पतिजन्य अन्नात स्टेरेलोसा नावाचा घटक असतो. यामुळे एलडीएल हे कोलेस्टेरॉल कमी होते व एचडीएलचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदयविकाराची मूळ कारणे दूर होतात.
कॅनडातील टोरांटो विद्यापीठातील जॉन सिवेनपायपर यांनी सांगितले, की आहार व जीवनशैली या दोन्ही गोष्टी यात महत्त्वाच्या ठरतात. विशिष्ट प्रकारचा वनस्पतिजन्य आहार घेतल्याने एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण ३० टक्क्य़ांनी कमी होते. दोन हजार उष्मांकावर आधारित असा हा आहार काही व्यक्तींना देण्यात आला, त्यात हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यातून हृदयविकाराची सगळी कारणे दूर होत नाहीत हे मात्र खरे आहे. त्यात कोलेस्टेरॉलशी निगडित कारणे कमी होतात. ब्रोकोलीत हृदयास उपकारक असे पोटॅशियम व मॅग्नेशियम तसेच आहार तंतू असतात. आल्यामुळे वाईट असलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आल्याचा चहा उपयुक्त असतो. गाजरामुळे एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. त्यामुळे रक्तवाहिन्या अवरुद्ध होण्याची शक्यता कमी होते. त्यात अ जीवनसत्त्व, क जीवनसत्त्व, के जीवनसत्त्व, बी ८ जीवनसत्त्व असते. बीटामध्ये नायट्रेट असते, त्यामुळे नायट्रिक ऑक्साइडवायू तयार होऊन रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते. रक्तप्रवाह सुरळीत राहतो. आवळ्यामुळे कोलेस्टेरॉल साठत नाही. अमायनो आम्ले त्यात असतात, त्यामुळे हृदयविकाराला अटकाव होतो.