ज्या ठिकाणाहून आपलं आरोग्य उत्तम रहावं यासाठी चांगले आणि पौष्टिक पदार्थ तयार होतात, त्या स्वयंपाकघराची निगा कशी राखायची, याबद्दल आज आपण समजून घेऊ. सगळेच आपलं स्वयंपाकघर स्वच्छ आणि चकचकीत रहावं यासाठी बाजारातून आणलेल्या क्लिनिंग स्प्रेचा वापर करतात. पण, असे स्प्रे सामान्य लोकांच्या खिशाला झेपणारे नसतात आणि आपल्या पर्यावरणालादेखील हानिकारक असतात.
मग यासाठी काय करायचं? त्याचा उपाय कदाचित आत्ता या क्षणी तुमच्या स्वयंपाकघरात असू शकतो. या एका वस्तूने तुम्ही घरीच किचन साफ करण्यासाठी क्लिनर बनवू शकता.
हा एक पदार्थ म्हणजे लिंबू.
होय! आपण लिंबाचा रस काढल्यानंतर त्यांची सालं शक्यतो कचऱ्यात टाकून देतो. पण, तसे न करता जर लिंबाच्या सालांचा योग्य पद्धतीने वापर केलात तर ते एक उत्तम क्लिनर म्हणून काम करतं.
घरगुती पद्धतीने बनवलेलं हे क्लिनर तुमच्या खिश्यासाठी आणि पर्यावरणासाठी उत्तम आहेच, त्याचसोबत स्वयंपाकघरालादेखील सुगंधी ठेवण्यात मदत करतं.

हेही वाचा : उशीर झाला म्हणून चक्क थांबवलं विमान! हा Viral Video बघून डोक्याला लावाल हात

आर्मेन आदमजान [Armen Adamjan] या इन्स्टाग्राम वापरकर्त्याच्या @creative_explained या इन्स्टाग्राम पेजवरून त्याने या उपयोगी किचन हॅकबद्दल सांगितलं आहे. १५ मिलियनहून अधिक व्ह्यूज असणाऱ्या या व्हिडीओमध्ये त्याने लिंबाच्या सालांचा वापर करून स्वयंपाकघरासाठी क्लिनर कसा बनवायचा हे सांगितलं आहे. या स्प्रेच्या मदतीने तुम्ही स्वयंपाकघरातील मांडणी, भांड्यांवरचे चिवट डाग काढू शकता. तसेच ओव्हन, मायक्रोवेव्ह यांसारख्या गोष्टींचीदेखील साफसफाई करू शकता.

लिंबाचे काही फायदे :

स्वयंपाकघरासाठी क्लिनिंग स्प्रेची रेसिपी बघण्याआधी लिंबाच्या सालींबद्दल थोडी माहिती घेऊ. लिंबू किंवा लिंबाचा रस हा केवळ पदार्थांची चव वाढवण्यासाठी उपयोगी नसून, त्याचे इतर अनेक उपयोग आणि फायदेदेखील आहेत. लिंबामध्ये नैसर्गिकरित्या तेलाचा अंश असून सोबत सायट्रिक ॲसिडदेखील असते. लिंबाच्या या गुणधर्मांमुळे ते कोणतेही चिवट डाग काढण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
त्यामुळे तुम्ही लिंबाचा केवळ रस काढून, त्याची सालं फेकून देण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा! सुगंधी आणि चकचकीत स्वयंपाकघर हवं असेल तर ही रेसिपी बघा आणि घरीच क्लिनिंग स्प्रे बनवा.

साफसफाईसाठी लिंबाचा घरगुती क्लिनिंग स्प्रे का वापरावा?

कारण:
बाहेरून विकत आणलेल्या क्लिनर्सपेक्षा, घरगुती स्प्रे फारच स्वस्त आहे.
यात कोणतेही केमिकल्स नाहीत.
लिंबाच्या नैसर्गिक सुगंधामुळे, स्प्रे केल्यानंतर तुमच्या फुफ्फुसांना कोणताही त्रास होणार नाही.
बनवायला सोपा आणि लिंबाचा वापर झाल्यानंतर त्याच्या सालांचादेखील वापर होतो.

क्लिनिंग स्प्रे घरी कसा बनवावा?

१. लिंबाचा रस काढून झाल्यानंतर त्या सालांना बाजूला ठेवा.
२. लिंबाची सालं एका स्वच्छ आणि कोरड्या स्प्रे बाटलीत भरा.
३. लिंबाची सालं भरलेल्या बाटलीत अर्धा कप व्हाईट व्हिनेगर आणि एक छोटा चमचा मीठ टाका. व्हिनेगर आणि मीठ हे कोणत्याही पृष्ठभागावरचे जंतू मारण्यास उपयोगी असून, लिंबाची शक्तीदेखील वाढवतात.
४. भांडी धुवायचा यामध्ये थेंंबभर साबण टाका. त्यामुळे हे मिश्रण अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ करू शकता.
५. आता या तयार असलेल्या मिश्रणामध्ये बाटली पूर्ण भरेल इतकं पाणी घ्या. बाटलीचं झाकण बंद करून त्याला व्यवस्थित हलवून घ्या. याने बाटलीतील लिंबाच्या सालींचं मिश्रण आणि व्हिनेगर एकत्र होण्यास मदत होईल.
६. ही बाटली घट्ट बंद करून घ्या. तुमच्या स्वयंपाकघराची व्यवस्थित काळजी घेणारा क्लिनिंग स्प्रे तयार आहे.

घरगुती क्लिनिंग स्प्रेचा वापर कसा करावा?

लिंबापासून तयार केलेल्या या क्लिनिंग स्प्रेला तुम्ही गॅसच्या शेगडीवर, सिंकमध्ये, ओट्यावर, फ्रीज किंवा ओव्हनसारख्या वस्तूंवर अशा कोणत्याही गोष्टींवर स्प्रे करू शकता. स्प्रे केल्यानंतर एखाद्या कापडाने ती वस्तू पुसून घ्या. याचा वापर केल्यानंतर हे किती उपयोगी आहे आणि किती सहज सगळे डाग काढून टाकण्यास मदत होते, हे तुमच्या लक्षात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर अशाप्रकारे घरी, लिंबाच्या सालांपासून तयार होणार हा क्लिनिंग स्प्रे, बजेट, पर्यावरण आणि स्वयंपाकघर अशा सर्वांची काळजी घेणारा आहे आणि हो, यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्सदेखील नाहीत.