Vitamin B12 deficiancy: आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांची आवश्यकता असते. व्हिटॅमिन बी१२ हे सर्वात महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. हे अनेक शारीरिक प्रक्रिया राखण्यासाठी जबाबदार आहे. भारतासारख्या देशांमध्ये जिथे मोठी लोकसंख्या शाकाहारी आहे, व्हिटॅमिन बी१२ची कमतरता ही एक गंभीर आरोग्य समस्या बनत आहे. असं असताना लवकर निदान आणि योग्य आहारामुळे ते सहजपणे रोखता येते. सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे गरज पडल्यास दुग्धजन्य पदार्थ, फोर्टिफाइड अन्न आणि पूरक आहारांचा समावेश करणे.

व्हिटॅमिन बी१२चे कार्य

व्हिटॅमिन बी१२ हे आपल्या शरीरासाठी एक महत्त्वाचे पोषक तत्व आहे. ते लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये, डीएनए संश्लेषणात आणि मज्जासंस्थेचे आरोग्य मजबूत राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. प्रौढांना दररोज सरासरी २.४ मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी१२ची आवश्यकता असते. व्हिटॅमिन बी१२ची सर्वात मोठी समस्या म्हणजे आपले शरीर ते स्वत: तयार करू शकत नाही. ते आपल्याला आहारातूनच मिळवावे लागते.

मांसाहारी लोकांसाठी व्हिटॅमिन बी१२चे स्त्रोत सहज उपलब्ध आहेत. मांस, मासे आणि अंडी यातून व्हिटॅमिन बी१२ मिळते. असं असताना भारतासारख्या मोठ्या प्रमाणात शाकाहारी लोकसंख्या असलेल्या देशात व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता ही एक सामान्य समस्या ठरत आहे. एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हॉर्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक डॉ. बिमल झज्जर यांनी शाकाहारी लोकांमध्ये बी१२च्या कमतरतेबद्दल आणि ती कशी दूर करावी याबाबत तीन प्रमुख गोष्टी सांगितल्या आहेत.

शाकाहारी लोकांमध्ये व्हटॅमिन बी१२च्या कमतरतेचं कारण

व्हिटॅमिन बी१२ हे प्रामुख्याने मांसाहारी पदार्थांमध्ये आढळते. ते दूध, दही आणि चीजसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्येदेखील आढळते. मात्र, शाकाहारी लोक पुरेशा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करत नसल्याने त्यांना व्हिटॅमिन बी१२ची कमतरता होऊ शकते. ही कमतरता हळूहळू होते, कारण शरीराचे यकृत अनेक वर्षे बी१२ साठवू शकते. सुरूवातीला लक्षणे दिसत नसली तरी, हळूहळू यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

बी१२ कमतरतेच्या लक्षणांकडे दुर्लक्ष

बी१२ ची कमतरता ही अचानक होत नाही, तर ती हळूहळू होत जाते. त्याची लक्षणंही साधारण असतात आणि अनेकदा ती दुर्लक्षित केली जातात. ती बहुतेकदा अशक्तपणा, थकवा, मूड स्विंग किंवा स्मरणशक्तीच्या समस्या यामधून दिसून येते. ही लक्षणे अनेकदा वेगळाच आजार असल्याप्रमाणे ओळखली जातात. ही कमतरता लवकर ओळखणे शक्य होत नाही.

ह्रदय आणि नसांवर परिणाम

व्हिटॅमिन बी१२चा ह्रदय आणि नसांवर सर्वात जास्त परिणाम होतो. या कमतरतेमुळे शरीरात होमोसिस्टीनची पातळी वाढू शकते. यामुळे ह्रदयरोगाचा धोका वाढतो. बी१२च्या दीर्घकाळ कमतरतेमुळे नसा खराब होणे, मुंग्या येणे, हात आणि पाय सुन्न होणे आणि संतुलन बिघडणे अशा समस्या उद्भवू शकतात.

शाकाहारी बी१२च्या कमरतेवर मात कशी करू शकतात?

व्हिटॅमिन बी१२च्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत छोटे बदल करणे फायदेशीर ठरू शकते. जर लक्षणे लवकर ओळखली गेली तर ही कमतरता सहजपणे दूर करता येते. तुमच्या आहारात सोया मिल्क, बदामाचं दूध आणि न्यूट्रिशनल यीस्टसारखे फोर्टिफाइड पदार्थ समाविष्ट करा. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बी१२ सप्लिमेंट्सही घेऊ शकता.

याव्यतिरिक्त दूध, दही आणि चीज यासारखे दु्ग्धजन्य पदार्थ खा. शाकाहारी लोकांसाठी हे उत्तम पर्याय आहेत. टेम्पेह आणि नोरी किंवा सीव्हीड सारखे आंबवलेले पदार्थदेखील काही प्रमाणात बी१२ पुरवतात.