Vitamin D Deficiency Symptoms: आपलं आयुष्य आता बहुतेक वेळा बंद खोलीत, एसी ऑफिसमध्ये किंवा मोबाईल-कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोरच जातं. सूर्यप्रकाशात वेळ घालवणं म्हणजे जणू भूतकाळातील गोष्ट झालीय. पण, हाच सूर्य आपल्या आरोग्याचा एक अत्यंत महत्त्वाचा साथीदार आहे. कारण- तो देतो ‘सनशाईन व्हिटॅमिन’ म्हणजेच व्हिटॅमिन डी, जे आपल्या शरीरासाठी तितकंच आवश्यक आहे जितकं पाणी आणि अन्न. आता प्रश्न येतो जर हे व्हिटॅमिन शरीरात कमी झालं, तर काय होतं? तर शरीर हळूहळू अदृश्य संकेत देतं. मात्र हे संकेत ओळखले नाहीत, तर पुढे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. जाणून घ्या, व्हिटॅमिन डीची कमतरता सांगणारे ९ गुप्त इशारे, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करूच नये.

व्हिटॅमिन D कमतरतेची ‘ही’ ९ लक्षणं दिसतायत का तुम्हालाही?

१. सतत थकवा, दमल्यासारखं वाटणं

भरपूर झोप घेतली तरी सकाळी उठल्यावर अंगात जोश नसतोय? सतत थकवा जाणवतोय? हा फक्त कामाचा ताण नाही. शरीरातील ऊर्जानिर्मितीवर व्हिटॅमिन डी मोठा प्रभाव टाकतं. त्याची कमतरता म्हणजे पेशींना कमी इंधन आणि परिणामी सततचा थकवा.

२. स्नायू दुखणे

जिममध्ये गेल्याशिवायही स्नायू दुखतात? जिना चढताना त्रास होतो? हेही व्हिटॅमिन डी कमी असल्याचं स्पष्ट लक्षण आहे. स्नायूंच्या पेशींना योग्य कार्य करण्यासाठी या व्हिटॅमिनची गरज असते.

३. हाडे आणि पाठीचा त्रास

कंबरेत, पाठीमध्ये, पायात दुखणं? हाडांची मजबुती कमी होत चालल्याचे हे संकेत आहेत. व्हिटॅमिन डी हाडांमध्ये कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करतं. त्याच्याशिवाय हाडं कमकुवत होतात आणि लवकर तुटतात.

४. मूड स्विंग्स, नैराश्य

हिवाळ्यात किंवा ढगाळ हवामानात मूड ऑफ होतो? ते केवळ वातावरणामुळे नाही. संशोधन सांगतं की, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मेंदूतील सेरोटोनिनचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे उदासीनता, राग, चिंता यांसारख्या भावना वाढतात.

५. वारंवार सर्दी-खोकला किंवा संसर्ग

दर महिन्याला आजारी पडता का? रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याचं एक कारण म्हणजे व्हिटॅमिन डी कमी असणं. त्यामुळे शरीराला विषाणूंविरुद्ध लढण्याची ताकद कमी होते.

६. केस गळणे आणि त्वचेचा कोरडेपणा

खूप शॅम्पू, सिरम वापरूनही केस गळतायत? त्वचा राठ, निस्तेज दिसतेय? हे बाहेरचं नव्हे, आतलं कारण आहे आणि ते म्हणजे व्हिटॅमिन डी ची कमतरता! हे व्हिटॅमिन केसांची मुळे आणि त्वचेला पोषण देतं.

७. नीट झोप न लागणे

सकाळी डोळे सुजलेले? संशोधन सांगतं की, व्हिटॅमिन डी मेंदूतील झोप नियंत्रक हार्मोन्सवर परिणाम करतं. ते योग्य प्रमाणात असेल, तर गाढ झोप लागते आणि मन शांत राहतं.

८. वारंवार पडणे किंवा हाडे तुटणे

व्हिटॅमिन डी कमी असलेल्या लोकांची हाडं कमजोर होतात, त्यामुळे लहान धक्का लागला तरी फ्रॅक्चर होऊ शकतं. हे विशेषत: महिला आणि वृद्धांमध्ये दिसतं.

९. जखम बरी होण्यास उशीर

कट, जखम, सर्जरीनंतरही जखम लवकर न भरल्यास, त्वचा कोरडी दिसल्यास हे सगळं शरीरातील डी व्हिटॅमिनच्या कमतरतेचं सूचक असू शकतं.

काय कराल उपाय?

सकाळी १५-२० मिनिटं सूर्यप्रकाशात वेळ व्यतीत करा, अंडी, मासे, दूध, तूप यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घ्या.

लक्षात ठेवा: शरीरातील अनेक त्रासांची सुरुवात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेपासूनच होते म्हणून आजच सूर्यप्रकाशाला तुमचा मित्र बनवा.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)