Does Watching Reels Affect Your Brain Like Alcohol : आजकाल सोशल मीडियावर रील्स पाहण्याचा ट्रेंड सर्व वयोगटांतील लोकांमध्ये झपाट्यानं वाढतोय. तासन् तास ते रील्स पाहण्यात अन् शेअर करण्यात घालवतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते रील्स पाहण्यात अधिक वेळ घालवतात. काही सेकंदांच्या या रील्सचे व्हिडीओ पाहण्यास कमी वेळ लागतो; पण त्याचा मेंदूवर वाईट परिणाम होतो.

रील्स व्हिडीओंचे हे व्यसन एकूणच जगातील सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक ठरले आहे. चीनमधील युजर्स दररोज सरासरी १५१ मिनिटे व्हिडीओ पाहतात आणि त्यापैकी ९५.५ टक्के इंटरनेट युजर्स याच्या आहारी गेले आहेत.

तियानजिन नॉर्मल युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्राचे प्राध्यापक कियान वांग म्हणाले की, जास्त रील्स पाहिल्यामुळे एकाग्रता, झोप व मानसिक आरोग्यावर परिणाम तर होतोच आणि त्याशिवाय नैराश्याची समस्यादेखील वाढते.

प्रोफेसर कियान वांग यांच्या मते, लहान स्वरूपातील व्हिडीओंमुळे एकाग्रता, कौशल्ये आणि स्मरणशक्तीवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. न्यूरोलॉजिस्ट व मानसिक आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सतत रील्स पाहण्यामुळे मेंदूच्या कार्यावर त्याच प्रकारे परिणाम होऊ शकतो, ज्या प्रकारे दारू प्यायल्यानंतर होतो.

गुरुग्राम येथील मारेंगो एशिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो अँड स्पाइन, मारेंगो एशिया हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गुप्ता यांच्या मते, शॉर्ट स्वरूपाचे व्हिडीओ लगेच सुरू होतात आणि संपतात. त्यामुळे मेंदूला ते समजून घेऊन, प्रक्रिया करणे कठीण जाते. लहान व्हिडीओ कमीत कमी प्रयत्नात हाय डोपामाइन अनुभव देतात, ज्यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो. कालांतराने त्याचा प्रभाव वाढतो आणि नंतर त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

खरं तर, रील्स व्हिडीओंचे स्वरूप लहान आणि जलद असते, ज्यामुळे मेंदूला दर काही सेकंदांनी नवीन माहिती किंवा दृश्ये मिळतात. त्यामुळे मेंदूला त्वरित समाधानाची सवय होते. ही प्रक्रिया दीर्घकाळात लक्ष केंद्रित करण्याची आणि एकाच कामात अडकण्याची क्षमता कमी करू शकते. त्यामुळे मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवर परिणाम होऊ शकतो, जो प्राप्त माहितीच्या आधारे आपले विचार, वर्तन व भावनांचे मार्गदर्शन करतो.

रील पाहणे आणि दारू पिणे हे एकसारखेच?

न्यूरोलॉजिस्टच्या मते, जेव्हा आपण रील्स पाहतो तेव्हा मेंदूच्या रिवॉर्ड सेंटरला वारंवार लहान डोपामाइन बूस्ट मिळतात. हे तेच न्यूरोट्रान्समीटर आहे, जे आनंद व समाधानाची भावना निर्माण करते. जेव्हा व्यक्ती दारू पिते, तेव्हा हेच डोपामाइन रिलीज होत असते. तसेच व्यक्ती जेव्हा सतत रील्स स्क्रोल करतो तेव्हा मेंदूला या डोपामाइन हिटचे व्यसन लागू शकते, ज्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा नवीन रील्स पाहण्याची इच्छा होते. ज्याप्रमाणे दारू प्यायल्याने वारंवार ती पिण्याची इच्छा होते, त्याप्रमाणे रील्सबाबतही होऊ शकते.