तुळशीच्या लग्नापासून लग्नाच्या मुहूर्तांना खऱ्या अर्थाने सुरुवात होते. लग्नाची तारीख निश्चित होताच खरेदीची लगबग सुरू होते. वधू-वराला आपल्या लग्नसोहळ्यानिमित्त इतरांपेक्षा खास ट्रेंडी गेटअप करायचा असतो. तसेच लग्नसोहळ्यातील हळद, मेहंदी, संगीत आणि लग्नाचे विधी ते रिसेप्शन, पूजा अशा अनेक कार्यक्रमांसाठीही वेगवेगळा पेहराव आणि दागिने परिधान केले जातात. ज्यामुळे वधू-वर आणि त्यांची घरची मंडळी लग्नाचा बस्ता नेमका कुठे खरेदी करायचा, या विचारात पडतात. कारण वधू-वराबरोबरच घरच्या अनेक मंडळींसाठी कपडे खरेदी करायचे असतात. यामुळे यंदा तुमच्याही घरात लगीनघाई असेल तर आम्ही तुम्हाला लग्नाचा बस्ता खरेदीसाठी मुंबईतील काही प्रसिद्ध मार्केट्स सांगणार आहोत, ज्या ठिकाणी तुम्हाला स्वस्तात मस्त खरेदी करता येऊ शकते.
हिंदमाता (दादर पूर्व)
मुंबईत लग्नाचा बस्ता खरेदी करण्याचे सर्वात जुने आणि प्रसिद्ध मार्केट म्हणजे दादर. दादर पूर्वेला गेल्यानंतर तुम्हाला एका रांगेत साड्यांची शेकडो दुकानं दिसतील, जिथे तुम्ही अगदी होलसेल रेटमध्ये साड्या खरेदी करू शकता. अगदी २०० रुपयांपासून ते ५० हजारांपर्यंतच्या साड्या मिळतील; तर नवरीसाठी १५०० रुपयांपासून शालू खरेदी करू शकता. तसेच घागरा-चोळीतही अनेक व्हरायटी पाहायला मिळते. याशिवाय नवऱ्या मुलासाठीही कुर्ता-पायजमा ते ब्लेजर सेटमध्ये व्हरायटी मिळते.
नटराज मार्केट (मालाड पश्चिम)
मुंबई उपनगरातील मालाड पश्चिमेकडील अगदी स्टेशनच्या शेजारी असलेले नटराज मार्केटमध्येही लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी भरपूर दुकानं आहेत. विशेषत: रिसेप्शनसाठी लेहंगा-चोली घालण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणी स्वस्तात मस्त बेस्ट ऑप्शन पाहायला मिळतील. याशिवाय, ड्रेस मटेरिअल किंवा रेडिमेट ड्रेसचीही अनेक दुकानं आहेत.
भुलेश्वर मार्केट
लग्नाचा बस्ता खरेदी करण्याचे सर्वात जुने आणि प्रसिद्ध मार्केट म्हणून भुलेश्वर मार्केट ओळखले जाते. या ठिकाणी तुम्हाला अगदी कमी किमतीत साड्या खरेदी करता येऊ शकतात. त्यामुळे या मार्केटमध्ये नेहमीच महिला आणि तरुणींची गर्दी असते. साड्या, लेहंगा सेट, दागिन्यांपासून ते कॉस्मेटिकपर्यंत लग्नासाठी आवश्यक अनेक गोष्टींची खरेदी तुम्हाला या एकाच मार्केटमध्ये करता येऊ शकते. लग्नात सुवासिनींना दिल्या जाणाऱ्या वस्तूही या ठिकाणी स्वस्तात मिळतात.
क्रॉफर्ड मार्केट
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटही लग्नाच्या शॉपिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे. या ठिकाणी भुलेश्वर मार्केटप्रमाणेच वधूच्या साड्या, वराचे कपडे आणि पाहुण्यांसाठीचे कपडे खरेदी करता येऊ शकतात. याशिवाय लग्नातील विविध वस्तू, ट्रेंडी ज्वेलरी, फूटवेअरमध्येही खूप ट्रेंडी व्हरायटी खरेदी करता येते.
(याशिवायही लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी मुंबईत इतरही अनेक मार्केट्स आहेत.जिथे तुम्ही लग्नासाठी स्वतात मस्त खरेदी करु शकता.यातील कोणतं मार्केट तुम्हाला खरेदीसाठी बेस्ट वाटते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा…)