weight loss tips: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वजन कमी करणे हे अनेकांसाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. सोशल मीडियावर दिसणारे “फॅड डाएट”, “जलद निकाल” आणि “३० दिवसांत तंदुरुस्त व्हा” असे दावे अनेकांना आकर्षित करतात, परंतु बहुतेक वेळा हे उपाय टिकाऊ नसतात. खरा बदल हा मोठ्या धक्क्यातून येत नाही तर छोट्या, सातत्यपूर्ण सवयींमधून येतो. प्रमाणित फिटनेस आणि पोषण प्रशिक्षक एम्मा हूकर यांनी तीन वर्षांत तब्बल १२० पौंड किंवा ७० किलोग्रॅमपेक्षा जास्त वजन कमी केले. त्यांच्या मते, वजन कमी करणे हे उपासमारीबद्दल नाही तर संतुलन, संयम आणि आत्मविश्वासाबद्दल आहे.

एम्मा म्हणते, मी सुरुवात करताना जर या साध्या गोष्टी मला माहीत असत्या तर प्रवास सोपा झाला असता. तिच्या अनुभवातून मिळालेल्या या सात सवयी केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाहीत तर निरोगी आणि संतुलित जीवनशैलीदेखील तयार करतात.

१. अवास्तव अपेक्षा ठेवू नका

वजन कमी करण्याच्या सुरुवातीला आठवड्यातून सहा दिवस व्यायाम करा, काहीही खाऊ नका आणि त्वरित निकाल पाहा अशी ध्येये ठेवली जातात. परंतु, या अपेक्षा अनेकदा थकवणाऱ्या आणि निराशाजनक असतात. एम्मा म्हणते, लहान, सोप्या पावलांनी सुरुवात करा – दररोज थोडे चालणे, जास्त पाणी पिणे किंवा झोपण्याच्या वेळापत्रकाचे पालन करणे; या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मोठे बदल होऊ शकतात.

२. स्वतःला उपाशी ठेवू नका.

खरं सांगायचं तर एम्मा म्हणते की, डाएटिंग किंवा उपाशी राहिल्याने तुमचे वजन कमी होत नाही. उपाशी राहिल्याने तुमचे चयापचय मंदावते आणि नंतर तुम्ही जास्त खाण्यास सुरुवात करता. जामा नेटवर्कमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की दीर्घकाळ कॅलरीजचे सेवन मर्यादित ठेवल्याने शरीराची ऊर्जा निर्मितीदेखील कमी होते, म्हणूनच पुरेसा, संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.

३. लहान विजयांचा आनंद घ्या

वजन हे यशाचे एकमेव माप नाही. तुम्ही या आठवड्यात जास्त खाणे टाळले असेल, ताणतणावाला बळी पडले नसाल किंवा फक्त अधिक उत्साही वाटले असेल तर हे सर्व खरे यश आहे. एका संशोधनात दिसून आलं की, वजन कमी करणारे लोक “नॉन-स्केल व्हिक्टरी” म्हणजेच वजनाव्यतिरिक्त यशांना अधिक महत्त्व देतात.

४. हा प्रवास एकट्याने करू नका

जेव्हा तुम्हाला पाठिंबा मिळतो तेव्हा प्रवास सोपा होतो; मित्रांद्वारे असो, प्रशिक्षकाद्वारे असो किंवा ऑनलाइन सपोर्ट ग्रुपद्वारे असो प्रेरित आणि जबाबदार राहणे महत्त्वाचे आहे. एका अभ्यासानुसार, ज्या लोकांना ऑनलाइन सपोर्ट ग्रुपमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या, त्यांनी इतरांच्या तुलनेत जास्त वजन कमी केलं.

५. अपराधीपणाशिवाय विश्रांती घ्या

शरीराला पुन्हा निर्माण करण्यासाठी विश्रांतीची आवश्यकता असते. झोपेचा अभाव तणाव संप्रेरक कॉर्टिसोल वाढवतो, जो चरबी साठवण्याशी संबंधित आहे. दररोज सात ते आठ तासांची गाढ झोप आणि योगा किंवा स्ट्रेचिंगसारखे “सक्रिय विश्रांतीचे दिवस” शरीरासाठी आवश्यक आहेत.

६. तीव्रतेपेक्षा सातत्य यावर लक्ष केंद्रित करा


एम्मा म्हणते, “दोन तासांच्या जिम सेशनने तुमचे आयुष्य बदलणार नाही, पण आठवड्यातून चार वेळा सातत्याने १० मिनिटे व्यायाम केल्याने नक्कीच बदल होईल.” नियमितता ही कायमस्वरूपी सवयींची गुरुकिल्ली आहे.

७. स्वतःवर दया करा

वजन कमी करणं हा फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक प्रवास आहे. स्वतःला सतत दोष देण्याऐवजी, प्रेमाने आणि संयमाने पुढे जा. प्रगती कधीच सरळ रेषेत होत नाही, ती चढउतारांनी भरलेली असते.

शेवटी एम्मा हूकरचा अनुभव दर्शवितो की वजन कमी करणे हे “डाएटिंग”बद्दल नाही तर स्वतःशी प्रामाणिक राहणे आणि तुमच्या जीवनशैलीत संतुलन निर्माण करणे आहे. लहान बदल सातत्य आणि आत्मविश्वास हे खऱ्या परिवर्तनाचे तीन आधारस्तंभ आहेत.