आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी संतुलित जीवनशैली, योग्य आहार, तणावमुक्त दिनचर्या आणि शारीरिक सक्रियता अत्यंत महत्त्वाची आहे. या सवयी अंगीकारल्याने शरीर निरोगी राहतेच, शिवाय मेंदूची कार्यक्षमताही वाढते. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्यांचा समावेश आवश्यक आहे. त्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे असतात, ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. पण फक्त निरोगी पदार्थ खाणे पुरेसे नाही, तर काही हानिकारक पदार्थ टाळणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.पॅकेटबंद स्नॅक्स, रेडी-टू-ईट पदार्थ, समोसे-पकोड्यांसारखे डीप फ्राईड खाद्यपदार्थ आणि फास्ट फूड यांचा त्यात समावेश होतो. अशा पदार्थांमुळे शरीरात आणि कोलेस्ट्रॉल आणि चरबी वाढते,ज्यामुळे लठ्ठपणा, हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढतो. त्याचबरोबर सॉफ्ट ड्रिंक,कोल्ड ड्रिंक व प्रीझर्व्ह्ड ज्यूससारखी पेये पचनसंस्थेचे कार्य बिघडवतात आणि मेंदूच्या कार्यक्षमतेलाही तोटा पोहोचवतात.

सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या मते,काही खाद्यपदार्थ असे आहेत,जे आरोग्यासाठी जणू विषासारखे काम करतात.त्यामध्ये सर्वप्रथम साखर आहे.आज मिळणारी रिफाइंड साखर फक्त कॅलरीज देते;पोषण काहीच नाही.दुसरे म्हणजे दूध लहान मुलांना ते पचते;परंतु बहुतेक प्रौढ व्यक्तींना ते नकोसे वाटते, पण मोठ्या वयात बहुतेक लोकांना त्याची अडचण होते. दूध कफ वाढवते व शरीर सुस्त बनवते. त्याचप्रमाणे रिफाइंड धान्य टाळणे आवश्यक आहे. त्यातून पोषक द्रव्ये नष्ट होतात आणि उरतो तो केवळ स्टार्च. शेवटी चहा–कॉफीचे अति सेवनही घातक आहे. ही पेये तात्पुरती ऊर्जा देतात; पण नंतर ती थकवा वाढवतात आणि शरीराची सहनशक्तीही कमी करतात.

१. साखरेपासून दूर राहा

भारतीयांच्या आहारात गोड पदार्थांना खास स्थान आहे. मिठाई, पेये किंवा डेझर्टमध्ये साखर मोठ्या प्रमाणात असते. मात्र, ही साखर जितकी चवदार वाटते, तितकीच ती शरीरासाठी घातक ठरते. साखर ही पूर्णपणे प्रोसेस्ड असते. त्यात फक्त कॅलरीज असतात; पोषण नसते. पूर्वी गूळ किंवा नैसर्गिक स्वरूपात मिळणारी साखर तुलनेने हितकारक असते; पण आज मिळणारी रिफाइंड साखर आरोग्यासाठी घातक आहे. ही साखर लठ्ठपणा वाढवते आणि शरीराच्या आरोग्याला हानी पोहोचवते.

२. दुधाचे मर्यादित सेवन

भारतात पिढ्यान् पिढ्या दूध हे आरोग्यासाठी अत्यावश्यक मानले गेले आहे. सकाळची सुरुवात दुधाने करणे, मुलांना रोज दूध पाजणे ही सवय जवळपास प्रत्येक घरात आहे. पण, सर्वांसाठी दूध फायदेशीर असेलच, असे नाही. सदगुरूंनी सांगितले की, फक्त लहान मुले दूध सहज पचवू शकतात; पण बहुतेक प्रौढांना दूध पचत नाही. शरीरात दूध पचवणारे एन्झाइम नसल्यामुळे ते कफ वाढवते आणि आळस निर्माण करते. कॅल्शियमसाठी दुधावर अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण- कॅल्शियम देणारे अनेक नैसर्गिक पदार्थ उपलब्ध आहेत.

३. प्रक्रिया केलेले धान्य टाळा

संपूर्ण धान्यात पोषण द्रव्ये, जीवनसत्त्वे व खनिजे आढळतात; पण प्रक्रिया केलेल्या धान्यातून हे सर्व आवश्यक घटक काढून टाकले जातात आणि उरतो तो केवळ स्टार्च. त्यामुळे शरीराला पोषण मिळत नाही. टिकण्यास उपयुक्त असलेले हे धान्य आरोग्यास मात्र हानिकारक असते.

४. चहा–कॉफीचे अति सेवन टाळा

बहुतांश लोक सकाळी उठल्यावर झोप उडवण्यासाठी किंवा काही लोक सकाळच्या वेळी होणारी चिडचिड दूर करण्यासाठी चहा–कॉफीचा पर्याय निवडतात आणि त्यामुळे भारतीयांच्या जीवनशैलीत चहा–कॉफी महत्त्वाचा भाग आहे. परंतु, सदगुरूंच्या मते- हे पेय तात्पुरती ऊर्जा देतात आणि नंतर शरीर थकवतात. वारंवार सेवन केल्याने शरीराची ऊर्जा साठवण्याची क्षमता कमी होते आणि सहनशक्ती घटते.