Wrong Blood Transfusion: रक्त हा आपल्या शरीराचा एक आवश्यक भाग आहे आणि मानवी शरीरात वेगवेगळे रक्तगट असतात. अनेकदा काही आवश्यक प्रसंगी शरीरात बाहेरून सारख्या रक्तगटाचे रक्त एखाद्या व्यक्तीला दिले जाते. जर एखाद्या व्यक्तीचा रक्तगट ‘ए’ पॉझिटिव्ह असेल तर त्याला ‘ए’ पॉझिटिव्ह रक्तच दिले जाते. मात्र जर यामध्ये काही चूक झाली तर काय होईल याचा अंदाजही आपण लावू शकणार नाही. काही रक्तगटांना ‘ए’ पॉझिटिव्ह असलेल्यांचे रक्त दिले जाते, तर काहींना नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जर ‘बी’ पॉझिटिव्ह रक्त असलेल्या एखाद्या व्यक्तीला ‘ए’ पॉझिटिव्ह रक्त दिले तर काय होईल? त्या व्यक्तीचा जीव जाईल का? तर मग जाणून घ्या नेमकं अशावेळी काय होऊ शकतं?
रक्तगट वेगळे का असतात?
रक्तगट वेगळे असण्याचे मुख्य कारण म्हणजे लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावरील अँटीजेन्स नावाच्या विशिष्ट प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सचा गट. हे अनुवांशिकतेवर अवलंबून असते. ते मुलांना त्यांच्या पालकांकडून मिळतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या रक्ताचे वर्गीकरण होते.
प्रत्येक व्यक्तीचा रक्तगट त्यांच्या अँटीजेन्स आणि अँटीबॉडीजच्या आधारे निश्चित केला जातो. अमेरिकन रेड क्रॉसच्या मते, ए पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या लोकांच्या रक्तात ‘ए’ अँटीजेन्स आणि अँटी-बी अँटीबॉडीज असतात. त्याचप्रमाणे ‘बी’ पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या रक्तातील अँटीजेन्स आणि अँटी-ए अँटीबॉडीज असतात. तर, जर दुसऱ्याच्या शरीरात वेगळ्या रक्तगटाचे रक्त दिल्यास नेमके काय होत असेल. राष्ट्रीय आरोग्य संस्थांनुसार, जर एखाद्या ‘ए’ पॉझिटिव्ह व्यक्तीला चुकून ‘बी’ पॉझिटिव्ह रक्त दिले गेले, तर त्याच्या रक्तात असलेले अँटी-बी अँटीबॉडीज त्या रक्तसंक्रमित ‘बी’ रक्तगटाच्या ‘बी’ अँटीजेन्सवर हल्ला करतात. यामुळे लाल रक्तपेशी फुटतात. या संपूर्ण प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत अॅक्यूट हेमोलिटिक ट्रान्सफ्यूजन रिएक्शन म्हणतात.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अँटीजेन्सना ओळखते. जेव्हा चुकीचा रक्तगट दिला जातो, तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती बाहेरच्या अँटीजेन्सविरूद्ध हल्ला करू शकते.
रक्तगटाचे प्रकार
रक्तगटाचे चार मुख्य प्रकार आहेत. A, B, AB आणि O. यांपैकी प्रत्येक रक्तगट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो. तो आरएच फॅक्टरवर अलंबून असतो. आरएच फॅक्टर हा एक महत्त्वाचा अँटीजेन आहे, जो रक्ताच्या प्रकारात फरक करतो. आरएच अँटीजेन उपस्थित असेल तर रक्तगट पॉझिटिव्ह असतो आणि आरएच फॅक्टर नसेल तर निगेटिव्ह असतो.
समस्या काय असू शकते?
तज्ज्ञ आणि विविध वैद्यकीय संस्थांचे म्हणणे आहे की, यामुळे अनेक गुंतागुंत होऊ शकतात. काही मिनिटांतच ही स्थिती गंभीर होऊ शकते. रूग्णांना प्रचंड ताप, थंडी वाजून येणे, गडद लघवी, पाठदुखी, कमी रक्तदाब आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. डॉक्टर अनेक प्रकरणांमध्ये औषधोपचाराने परिस्थिती नियंत्रित करू शकतात. मात्र, गुंतागुंत होण्याचा धोका अजूनही कायम आहे. रक्त संक्रमणापूर्वी प्रत्येक रूग्णालयात क्रॉस-मॅचिंग केले जाते, जिथे रूग्ण आणि दात्याच्या रक्ताची सुसंगतता तपासली जाते. या प्रक्रियेदरम्यान कोणतीही समस्या आढळल्यास रक्त संक्रमण थांबवले जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर रक्तदात्याकडून रूग्णाला दुहेरी तपासणी केल्यानंतरच पुढे प्रक्रिया केली जाते.
