Kyasanur forest disease (KFD) : कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील होसानगर येथील एका १९ वर्षीय तरुणीचा कायसनूर वन रोगामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिवमोग्गा येथील अरम्ने कोप्पा गावातील रहिवासी असलेल्या या तरुणीच्या ४ जानेवारी रोजी कायसनूर वन रोगाच्या चाचण्या (KFD) पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिला उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील KMC रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या वर्षात या आजारामुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. पण, या आजारामुळे आता दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कायसनूर वन रोग हा एक प्रकारचा विषाणूजन्य आजार आहे, जो उंदीर, चिचुंद्री आणि माकडांना संक्रमित करणाऱ्या विषाणूमुळे होतो.
केस रोज गळून शेपटीसारखे झाले? बदाम तेलात मिसळा ‘हे’ दोन पदार्थ; केस होतील घनदाट काळे अन् लांबसडक!
कायसनूर वन रोग (KFD) काय आहे?
कायसनूर वन रोग हा मुख्यत: माकड आणि मानवांना प्रभावित करतो. १९५७ मध्ये कर्नाटकातील कायसनूर जंगलातील एका आजारी माकडात हा आजार पहिल्यांदा आढळला होता. तेव्हापासून दरवर्षी ४०० ते ५०० लोकांना या आजाराची लागण होत आहे. दरम्यान, संपूर्ण पश्चिम घाटात कायसनूर वन रोग एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून उदयास येऊ लागली आहे. कायसनूर वन रोगाचे विषाणू माकडे, उंदीर आणि पक्ष्यांवर हल्ला करतात. दरम्यान, हा आजार मानवाला माइट नावाच्या कीटकाच्या चाव्यामुळे किंवा संक्रमित प्राण्याच्या संपर्कात आल्याने होतो. संक्रमित व्यक्तींमध्ये ५ ते १२ दिवस थंडी वाजून येणे, अंगदुखी, डोकेदुखी आणि उच्च ताप ही लक्षणे दिसतात. काही वेळा याची लक्षणे फार गंभीर असतात, ज्यामुळे मृत्यूचा धोका असतो.
कायसनूर वन रोगाला सामान्यतः मंकी फीवर असेही म्हणतात. हा एक विषाणू आहे, जो मानव आणि माकडांच्या शरीरावर हल्ला करतो.
कायसनूर वन रोगाचा प्रसार कसा होतो?
हा रोग हेमाफिसालिस स्पिनिगेरा वेक्टरद्वारे प्रसारित होऊ शकतो. हा विषाणू जंगलातील छोटा किडा आणि इतर प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो; ज्यात खार, उंदीर यांचा समावेश आहे. आजारी मृत माकडांशी थेट संपर्कात आल्यानेही हा आजार होऊ शकतो. हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित होत नाही. हा आजार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये पसरतो आणि जानेवारी ते एप्रिलमध्ये त्याचे प्रमाण वाढते.
कायसनूर वन रोगाची लक्षणे
कायसनूर वन रोगाची विविध लक्षणं आहेत. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे तीव्र डोकेदुखीसह थंडी जाणवणे. या आजाराची सुरुवात अचानक थंडी वाजून जास्त तापाने होते. किडा चावल्यानंतर दोन ते सात दिवसांनी लक्षणे दिसतात. ताप साधारणपणे १२ दिवस किंवा त्याहून अधिक काळ राहतो आणि लक्षणे दिसल्याच्या चार दिवसांनंतर नाक, घसा, हिरड्या आणि अगदी आतड्यांमधून लक्षणीय रक्तस्राव होतो. गंभीर संसर्गामुळे फुफ्फुसात रक्तस्त्राव होऊ शकतो किंवा आतड्यांमध्ये रक्त कमी होऊ शकते, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. या आजाराशी संबंधित काही न्यूरोलॉजिकल चिन्हे खालीलप्रमाणे आहेत.
मळमळ
उलट्या होणे
स्नायू कडक होणे
मानसिक विकार
झटका येणे
दृष्टी कमजोर होणे
तीव्र डोकेदुखी
खराब प्रतिक्षेप
या आजाराचा कालावधी साधारणपणे तीन ते आठ दिवसांचा असतो. पण, हे अनेकदा संक्रमित व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवरदेखील अवलंबून असते आणि ते बदलू शकते. यात काहीवेळा रुग्णाला थकवा जाणवू शकतो किंवा तीव्र स्नायू दुखू शकतात, ज्यामुळे एखाद्याच्या दैनंदिन कामात अडथळा येतो.
कायसनूर वन रोगावर उपचार कोणते?
कायसनूर वन रोगाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण करणे सुरक्षित आहे. या रोगाची लस ७ ते ६५ वर्षे वयोगटातील एका महिन्याच्या कालावधीत दोन डोसमध्ये दिली जाते. तसेच कीटकांपासून आणि टिक्सपासून (लहान किडा) वाचण्यासाठी संरक्षणात्मक कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो.