What To Eat To Reduce Bad Cholesterol : जगभरात हृदयविकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दैनंदिन कामाचा ताण, चुकीच्या खाण्याच्या सवयी ही त्याची कारणे आहेत. त्यामुळे थकवा, ताणतणाव, वाढलेला रक्तदाब व कोलेस्ट्रॉल या सर्वांचा हृदयावर हळूहळू परिणाम होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदय हा आपल्या शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळे ते निरोगी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठीच तुमच्या दैनंदिन आहारात काही नैसर्गिक पदार्थांचा समावेश करा. तर, खालील फळांचे सेवन केल्याने केवळ हृदयाचे आरोग्यच सुधारणार नाही, तर अनेक फायदेदेखील मिळतील.

तज्ज्ञांच्या मते, काही फळे हृदयासाठी अमृतासमान असतात. त्यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे व खनिजे भरपूर प्रमाणात असतात; जी हृदयाच्या धमन्यांमधील प्लेक कमी करतात, रक्ताभिसरण सुधारतात व कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करतात. म्हणूनच तुमच्या दैनंदिन आहारात खास फळांचा समावेश केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो.

सफरचंद – हार्वर्ड हेल्थच्या मते, सफरचंद तुमच्या हृदयासाठी सर्वोत्तम फळ मानले जाते. यात फ्लॅट पेक्टिन असते. पेक्टिन म्हणजे विरघळणारे फायबर, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्याव्यतिरिक्त सफरचंदातील अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या धमन्यांमधील जळजळ कमी करतात. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते आणि हृदयरोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

संत्री – कॅनडाच्या हार्ट अँड स्ट्रोक फाउंडेशननुसार, संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फ्लेवोनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात; जे हृदयासाठी फायदेशीर असतात. हे फळ रक्तदाब कमी करण्यास, हृदयाच्या धमन्यांची लवचिकता टिकवतात. दररोज संत्री खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते, शरीराला ऊर्जा मिळते आणि हृदय दीर्घकालीन निरोगी राहते.

द्राक्षे – द्राक्षांमधील पॉलीफेनॉल हृदयासाठी चांगले असतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. द्राक्षांचे नियमित सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि मेंदू, हाडांसाठी ते उपयोगी वा फायदेशीर ठरते.

पपई – पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर जीवनसत्त्वे असतात. हे फळ कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, पचन सुधारण्यास मदत करतात. पपईचे नियमित सेवन केल्याने शरीर हलके होण्यास, ताजेतवाने राहण्यास आणि हृदयाच्या आरोग्यास चालना मिळण्यास मदत होते.

डाळिंब – डाळिंबाला अमृतासमान मानले जाते. त्यामध्ये असणारे पॉलीफेनॉल रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. डाळिंब खाल्ल्याने रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात आणि रक्ताभिसरण सुधारते. दररोज डाळिंब खाण्याची सवय लावल्याने हृदयरोग, स्ट्रोक यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.