Weight Gain: आजच्या काळात बहुतांश लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. फिट राहणे, आकर्षक दिसणे यासाठी अनेक जण डाएटिंग करतात, व्यायामशाळेत तासन्तास घाम गाळतात. पण सगळ्यांचीच समस्या वजन कमी करण्याची नसते. काही जण शरीरात ताकद नसल्यामुळे आणि आत्मविश्वास कमी झाल्यामुळे त्रस्त असतात. अशा लोकांसाठी वजन वाढवणे ही एक मोठी चिंता असते.
वजन वाढवण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात, प्रथिनयुक्त पदार्थ, सप्लिमेंट्स, जंक फूड अशा गोष्टी खाल्ल्या जातात. पण खरेतर नैसर्गिक, पौष्टिक आणि सहज मिळणारे अन्नपदार्थ वजन वाढवण्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात. अशाच पदार्थांमध्ये खजूर हे एक उत्तम सुपरफूड मानले जाते. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरी, फायबर, हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे शरीराला ऊर्जा देण्यासोबतच मसल्स ग्रोथसाठीसुद्धा उपयुक्त ठरते.
वजन वाढवण्यासाठी खजूर कसा खावा?
१.दुधासोबत खजूर
रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात ४–५ खजूर टाकून ते पिणे हा एक उत्तम उपाय आहे. दूध आणि खजूर या दोन्हीमध्ये नैसर्गिक साखर असते, जी शरीराला ऊर्जा देण्यासोबतच मसल्स मजबूत करते.
२.खजूर स्मूदी
ज्यांना गोड खाण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी खजूर स्मूदी हा उत्तम पर्याय आहे. दूध, केळं आणि खजूर एकत्र ब्लेंड करून स्वादिष्ट स्मूदी तयार करता येते. हे पेय एकीकडे झटपट ऊर्जा देते तर दुसरीकडे वजन वाढवण्यासही मदत करते.
३. खजूर लाडू किंवा मिठाई
खजूरपासून पौष्टिक लाडू आणि मिठाया तयार करता येतात. त्यात ड्रायफ्रूट्स आणि थोडेसे तूप किंवा तिळ घालून केलेले लाडू आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. हे लाडू खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि वजन वाढते.
४. गुळासोबत खजूर
खजूर आणि गूळ हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. खजूरमध्ये लोह, फायबर आणि मिनरल्स असतात, तर गुळामुळे पचनशक्ती सुधारते. दोन्हींचा एकत्रित परिणाम वजन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो.
५. खजूर आणि चणे
भिजवलेले चणे आणि खजूर एकत्र खाल्ल्यास शरीराला भरपूर प्रथिने आणि पोषण मिळते. चणे मसल्स मजबूत करतात तर खजूर शरीराला उर्जा देतात. हा संयोजन रोजच्या आहारात घेतल्यास दुबळेपणा दूर होतो.
खजूर खाण्याचे इतर फायदे
वजन वाढवण्यासोबतच खजूर खाण्याचे अनेक इतर फायदे आहेत. यामुळे पचनशक्ती सुधारते, रक्ताची कमतरता कमी होते, हाडे मजबूत होतात आणि शरीरात नैसर्गिक ऊर्जा टिकून राहते. सकाळी उपाशीपोटी २–३ खजूर खाल्ले तरी दिवस भरपूर उत्साहाने जातो.