Healthy sleep tips: आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फक्त योग्य आहार पुरेसा नसतो, तर पुरेशी आणि योग्य वेळेवर घेतलेली झोपदेखील तितकीच महत्त्वाची असते. अनेकांना वाटतं की आठ तास झोप घेतली की पुरेसे आहे, पण खरा प्रश्न असा आहे — “झोपेची योग्य वेळ कोणती?” कारण झोपेची वेळ शरीराच्या जैविक घड्याळाशी थेट जोडलेली असते. चुकीच्या वेळी झोपल्याने शरीराच्या नैसर्गिक प्रक्रिया बिघडतात आणि आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

झोपेच्या वेळेचा आरोग्यावर परिणाम

आजकाल बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप वापरतात. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे मेंदूला झोपेचे सिग्नल उशिरा मिळतात, त्यामुळे झोप लागायला वेळ लागतो. परिणामी, झोपेचे चक्र बिघडते आणि दुसऱ्या दिवशी थकवा, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव आणि हार्मोनल असंतुलन यांसारख्या समस्या उद्भवतात. दीर्घकाळ अशी सवय राहिल्यास हृदयविकार, लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

रात्री झोपण्याची आदर्श वेळ

अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलं आहे की, रात्री १० वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत झोप घेणे हा सर्वात योग्य काळ मानला जातो. क्लीव्हलँड क्लिनिकच्या अहवालानुसार ब्रिटनमध्ये ८८,००० लोकांवर केलेल्या अभ्यासात असं आढळलं की, रात्री १० वाजता झोपल्यास शरीराला स्वतःची दुरुस्ती आणि नव्या ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. या वेळेत झोप घेतल्याने शरीरातील सर्केडियन रिदम (biological clock) नीट काम करतं आणि मानसिक तसेच शारीरिक आरोग्य सुधारतं.

एका दिवसात किती तास झोप आवश्यक?

प्रौढ व्यक्तींना सरासरी ७ ते ९ तासांची झोप आवश्यक असते. जर आपण रात्री १० वाजता झोपलात, तर सकाळी ६ वाजेपर्यंतची आठ तासांची झोप सहज पूर्ण होते. रोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे शरीराची नैसर्गिक झोपेची पद्धत ठरते आणि गाढ, झोप मिळते. मुलं आणि किशोरवयीन मुलांना मात्र ९ ते ११ तासांची झोप गरजेची असते, कारण त्यांच्या शरीराचा विकास वेगाने होत असतो.

योग्य वेळी झोप घेणे हे केवळ आरामासाठी नाही तर दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे रात्री १० वाजताच बिछान्यावर जाण्याची सवय लावा आणि दिवसाची सुरुवात ताजेतवाने मनाने करा. आरोग्यदायी जीवनशैलीची ही एक छोटी पण प्रभावी पायरी आहे.