आजच्या धावपळीच्या जीवनात खाण्याच्या सवयीदेखील पूर्णपणे बदलल्या आहेत, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होत आहेत. ज्या समस्या पूर्वी वाढत्या वयात चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या वाईट सवयींमुळे त्रास देत असत, त्या आता खूप लहान वयातच लोकांना अनारोग्याच्या दिशेने नेत आहेत. आजच्या काळात मोठ्या संख्येने लोक लहान वयातच हृदयाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त आहेत. लहान वयातच अनेक जण हृदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीत हृदयाच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. हृदयाच्या आरोग्यासाठी जीवनशैलीत बदल, खाण्याच्या आरोग्यदायी सवयी व योग्य रीतीने शारीरिक हालचाली यांचे शिस्तीने पालन करणे महत्त्वाचे आहे. दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटमधील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे प्रधान संचालक डॉ. निशिथ चंद्रा यांनी हृदय निरोगी ठेवण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत काय पाळले पाहिजे ते सांगितले आहे.
संतुलित आहार
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहार खूप फायदेशीर ठरतो. संपूर्ण धान्य, ओट्स, फळे व भाज्या यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खा. त्याशिवाय तुम्ही सफरचंद, संत्री, ब्रोकोली व गाजर खाऊ शकता. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत मिळते. कारण- उच्च कोलेस्ट्रॉल हे हृदयविकाराच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. ऑलिव्ह ऑइल, अॅव्होकॅडो इत्यादी वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात.
व्यायाम
दैनंदिन दिनचर्येत व्यायाम केल्याने शरीर सक्रिय राहतेच. त्याशिवाय अनेक आजारांपासूनही बचाव होतो. आठवड्यातून किमान १५० मिनिटे व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही चालणे, पोहणे, सायकलिंग, असे व्यायाम करू शकता. त्याशिवाय तुम्ही ७५ मिनिटे धावणे किंवा अॅरोबिक्ससारखे गतिमान व्यायामदेखील करू शकता. व्यायामामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळते. शरीराचे वजन नियंत्रित करण्यासाठीदेखील ते प्रभावी आहे.
वजन नियंत्रण
शरीराचे वजन हृदयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवते. बॉडी मास इंडेक्स १८.५ ते २४.९ दरम्यान असावा. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांच्या कॅलरीजच्या सेवनाकडे लक्ष द्यावे. गोड आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा. दररोज ३० ते ४० मिनिटे चाला. कंबर ते नितंब हे प्रमाण पुरुषांसाठी ०.९ पेक्षा कमी आणि महिलांसाठी ०.८५ पेक्षा कमी असणे योग्य मानले जाते.
रक्तदाबावर लक्ष ठेवा
जर रक्तदाब १२०/८० मिमीएचजीपेक्षा जास्त असेल, तर हृदयरोगाचा धोका वाढतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मिठाचे सेवन कमी केले पाहिजे. दररोज पाच ग्रॅम ते एक चमचा मीठ पुरेसे आहे. ध्यानधारणा आणि योगामुळे ताण कमी होण्यास आणि रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.
पुरेशी झोप
पुरेशी झोप न घेतल्याने हृदयरोगाचा धोका २०% वाढतो. हृदयाच्या आरोग्यासाठी दिवसातून ७-८ तास झोप घेणे आवश्यक आहे. दररोज एकाच वेळी झोपा आणि उठा. तुमची खोली अंधारी आणि शांत ठेवा. झोपण्यापूर्वी कॅफिन आणि मोबाईल फोनचा वापर टाळा.