निरोगी जीवन जगण्यासाठी व्यायाम, आहार आणि झोप या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. या तीन घटकांमुळे तुमच्या शरीराचे कार्य सुरळीत राहते, शिवाय अनेक आजारांपासून दूर राहता येते. त्यामुळे जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांनी आहाराची योग्य काळजी घेणे फार महत्वाचे आहे. व्यायामापूर्वी आणि नंतर तुम्ही कोणत्या प्रकारचा आहार खायला हवा यावर तुमच्या शरीराचे कार्य अवलंबून असते. यामुळे तुम्हालाही जिमला जाण्यापूर्वी आणि नंतर योग्य आहार घ्यायचा असेल तर फिटनेसतज्ज्ञ डॉ. सनी यांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा.
डॉ. सनी यांच्या मते, व्यायाम करताना अस्वस्थता जाणवू नये यासाठी योग्य आणि निरोगी आहार घेणे गरजेचे आहे. हा आहार पचण्याजोगा असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला चांगली ऊर्जा मिळेल आणि तुम्हाला एकदम फिट ठेवेल.
व्यायाम करण्याआधी तुम्ही तृणधान्य, ब्राउन राईस आणि ओट्स यांसारखे पदार्थ खाऊ शकता. कारण असे कार्बोहायड्रेट पदार्थ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि वाढीस मदत करण्यासाठी व्यायाम करण्यापूर्वी चीज, दही, शेंगदाणे, अंडी असे प्रोटीनयुक्त पदार्थ देखील खाण्याचा सल्ला दिला जातो.
याशिवाय तुम्ही अंडी, टोस्ट, नट्स आणि ओट्सचे जाडे भरडे पीठ, चीज सँडविच याचाही समावेश करू शकता.
जिममध्ये जाण्यापूर्वी तुमच्या शरीराला योग्य पोषण देणे महत्वाचे आहे, यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समधून तुमच्या शरीराला सतत ऊर्जा मिळत राहते आणि प्रोटीन्समुळे स्नायूंचे कार्य सुरळीत होते.
जिम केल्यानंतर काय खावे?
डॉ. सनी यांच्या मते, जिम सेशननंतर किंवा वर्कआऊटनंतर तुमच्या शरीरातील ऊर्जा भरून काढण्यावर आणि स्नायू रिकव्हर करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
यासाठी प्रोटीनयुक्त, कार्बोहायड्रेट्सयुक्त आहार घ्या, ज्यामुळे स्नायूंच्या उतींचे आरोग्य चांगले राहते; तर ग्लायकोजेन स्टोअर्स पुन्हा भरते.
यासाठी आहारात तुम्ही रताळे, ग्रील्ड चिकन, चणे, क्विनोआ सॅलेड, प्रोटीन पावडर, फळे आणि दही वापरून बनवलेले स्मूदी असे पदार्थ खाऊ शकता.
व्यायाम करण्याआधी आणि नंतर योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करणे फार महत्त्वाचे आहे. विशेषत: व्यायाम केल्यानंतर शरीरातील कमी झालेले पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी पाणी किंवा स्पोर्ट्स ड्रिंक पिण्याची शिफारस केली जाते, यामुळे तुम्हाला पुन्हा तंदुरुस्त राहण्यास मदत होते.