Morning Breakfast: नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार आहे. लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो, प्रत्येकाने सकाळची सुरुवात हेल्दी नाश्त्यानेच करावी. मग ते शाळा-कॉलेजला जाणारे असो किंवा ऑफिसला जाण्यासाठी धावपळ करणारे असो; नाश्त्यासाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे. पण, प्रश्न असा पडतो की रोज सकाळी नाश्त्याला काय करायचं? घरात स्वयंपाक करणाऱ्या महिलांसमोर हा प्रश्न कायम उभा राहतो. म्हणूनच इथे आम्ही तुमच्यासाठी आठवड्याच्या सातही दिवसांसाठी सात वेगळ्या आणि चविष्ट नाश्त्याच्या रेसिपीज घेऊन आलो आहोत.

आठवडाभरासाठी ७ स्वादिष्ट आणि हेल्दी ब्रेकफास्ट आयडिया

⦁ सोमवार – पोहे

आठवड्याची सुरुवात हलक्या-फुलक्या आणि चविष्ट पदार्थाने केली तर दिवसभर मूड छान राहतो. पोहे हा असा पदार्थ आहे, जो बनवायलाही सोपा आणि खायलाही छान लागतो. पोहे एका चाळणीत घेऊन स्वच्छ पाण्याने धुवा. मग चाळणीतच पाणी निथळण्यासाठी ठेवा. हे पोहे ५-७ मिनिटे भिजतील, ते मऊ होतील. एका कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर जिरे, शेंगदाणे आणि कढीपत्ता घाला. शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर पोहे कढईत घाला. त्यावर चवीनुसार मीठ आणि साखर (घालत असाल तर) घाला. हलक्या हाताने पोहे मिक्स करा, जेणेकरून पोहे तुटणार नाहीत. पोहे तयार झाल्यावर लिंबाचा रस घालून मिक्स करा. वरून ओला नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा

⦁ मंगळवार – मूग डाळ चिला

चिला हा उत्तर भारतातील लोकप्रिय पदार्थ असला तरी आता सगळीकडे बनवला जातो. मूग डाळीत प्रोटीन भरपूर असल्याने हा नाश्ता शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. मूग डाळ स्वच्छ धुवून ४-५ तास पाण्यात भिजत ठेवा. भिजवलेली डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आवश्यक असल्यास थोडे पाणी वापरा. वाटलेल्या डाळीमध्ये मीठ, हळद, मिरची पावडर, कोथिंबीर, जिरे आणि हिंग घाला. सर्व एकजीव करा. नॉन-स्टिक तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा. तव्यावर १ डावभर डाळीचे मिश्रण पसरवा. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत खरपूस भाजून घ्या. गरमागरम मूग डाळ चिला चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

⦁ बुधवार – उत्तपा

सकाळी पटकन तयार होणारा आणि पोटभर नाश्ता म्हणजे उत्तपा. हा पदार्थ सुजीपासून केला की अजून हलका आणि हेल्दी होतो. ही एक झटपट आणि चविष्ट रेसिपी आहे, एका भांड्यात सुजी, दही आणि मीठ घालून चांगले मिसळा.या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून पुन्हा मिसळा. आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालून मिश्रण उत्तप्पा बनवण्यासाठी योग्य कन्सिस्टन्सीमध्ये आणा.नॉन-स्टिक पॅन गरम करा आणि थोडे तेल किंवा तूप पसरवा, तयार मिश्रणाचा एक मोठा चमचा मिश्रण पॅनवर घालून गोल उत्तप्पा तयार करा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शिजू द्या. चटणी किंवा सांबारसोबत गरमागरम सर्व्ह करा.

⦁ गुरुवार – इडली

इडली हा असा पदार्थ आहे, जो नेहमीच आरोग्यदायी पर्याय मानला जातो. तांदळापासून किंवा सुजीपासून बनवलेल्या इडल्या पचायलाही सोप्या असतात. एका भांड्यात उडीद डाळ आणि मेथी दाणे घ्या आणि दुसऱ्या भांड्यात तांदूळ आणि पोहे घ्या. दोन्ही मिश्रणं स्वच्छ धुऊन घ्या आणि कमीतकमी ४-५ तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. भिजलेल्या डाळी आणि तांदळातील पाणी काढून टाका. डाळ आणि तांदूळ एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घाला आणि चांगले मिक्स करा. हे मिश्रण उबदार ठिकाणी ८ ते १० तास किंवा रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा. इडली पात्रामधील साच्यांना तेलाचा हात लावा. तयार झालेले आंबलेले पीठ साच्यांमध्ये भरा. इडली पात्र प्रेशर कुकरमध्ये ठेवा, पाणी घालून झाकण लावा आणि मोठ्या आचेवर १०-१२ मिनिटे इडली वाफवून घ्या. इडली पात्रातून तयार झालेल्या मऊ, स्पॉन्जी इडल्या बाहेर काढा. चटणी किंवा सांबारसोबत गरमागरम सर्व्ह करा.

⦁ शुक्रवार – मसाला ओट्स

ओट्स म्हणजे हेल्दी डाएटचा महत्त्वाचा भाग. पण, सगळ्यांना साधे ओट्स आवडतातच असं नाही. म्हणून त्यात मसाले, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची वगैरे भाज्या टाकल्या की त्याची चव जबरदस्त होते. मसाला ओट्स बनवण्यासाठी प्रथम तेलात मोहरी, जिरे, कडीपत्ता घालून फोडणी द्या. मग कांदा, टोमॅटो आणि इतर भाज्या परतून घ्या. त्यात हळद, तिखट, जिरेपूड, धणेपूड आणि गरम मसाला घालून परतून घ्या. नंतर ओट्स आणि पाणी घालून शिजवा. शेवटी कोथिंबीर आणि लिंबू पिळून गरमागरम सर्व्ह करा.

⦁ शनिवार – उपमा

आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात हलका आणि पोटभर नाश्ता हवा असेल तर उपमा हा नेहमीच चांगला पर्याय आहे. उपमा बनवण्यासाठी १ कप रवा भाजून घ्या, नंतर एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि आवडीच्या भाज्या (कांदा, टोमॅटो, गाजर) परतून घ्या. त्यात पाणी, मीठ घालून उकळी आणा आणि उकळी आल्यावर भाजलेला रवा हळूहळू टाकत ढवळा. उपमा शिजल्यावर कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.

⦁ रविवार – मसूरची लापशी

रविवारची सकाळ साधारणपणे निवांत असते.अशावेळी हलका पण पौष्टिक नाश्ता उत्तम ठरतो. मसुरची लापशी ही पचायलाही सोपी असते. मसूर डाळ स्वच्छ धुवा.तिला कुकरमध्ये पाणी घालून मऊ शिजवून घ्या. शिजलेली डाळ घोटून घ्या जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत.एका भांड्यात तूप गरम करा. त्यात शिजवलेली मसूरची डाळ घाला. गुळाच्या साखरेचा पाक करून तो शिजलेल्या डाळीत घाला.मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. वेलची पूड आणि ड्राय फ्रुट्स घालून मिक्स करा.गरमगरम मसूरची लापशी सर्व्ह करा.