lokprabha logo
इंरिरटिअ विशेष

संदेश बेंद्रे –

response.lokprabha@expressindia.com

‘घरीच बसून ऑफिसचं काम करता आलं तर किती बरं होईल’ असं वाटण्याच्या काळापासून ‘वर्क फ्रॉम होमपेक्षा ऑफिसला जाणं परवडलं’ पर्यंत आता आपण पोहोचलो आहोत. घरात बसून मीटिंगला उपस्थिती लावायची म्हणजे द्राविडी प्राणायाम. एकीकडे कूकरच्या शिट्टय़ा, दुसरीकडे मुलांचा आरडाओरडा, मधेच दारावरची घंटी वाजते.. सगळाच घोळ! घरच्या खुर्चीत बसून पाठ दुखायला लागली आहे, शाळा-ऑफिस घरीच सुरू असल्यामुळे चार्जिग पॉइंट्स पुरेनासे झाले आहेत, लक्ष केंद्रित करणे कठीण होऊन बसले आहे.. घरून काम करण्याची हौस भागून काळ लोटला असला, तरी परिस्थिती एवढय़ात बदलणार नाही. त्यामुळे घरातच ऑफिस थाटण्याचे कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Mumbai, accident death, uncle, negligence, Nephew
मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

जागेची निवड

घरून काम करताना कामावर लक्ष केंद्रित व्हावे, यासाठी त्यातल्या त्यात जिथे थोडी शांतता असेल, अशी जागा निवडा. घरातील एका खोलीत किंवा बंद बाल्कनीत तुम्ही ऑफिससारखा सेटअप लावू शकता. हे पर्याय उपलब्ध नसल्यास घरातली बैठकीची खोली (लिव्हिंग रूम) हा देखील उत्तम पर्याय ठरेल. सध्या टाळेबंदीच्या काळात घरी फार कोणाचे येणे-जाणे नसते, त्यामुळे बैठकीच्या खोलीत काम केल्यास फारसा व्यत्यय येण्याची शक्यता नसते. काम करण्यासाठी बेडरूमचा वापर शक्यतो टाळावा, जेणेकरून कुटुंबातील इतर व्यक्तींना त्याचा त्रास होणार नाही. बैठकीच्या खोलीतली काही जागा मोकळी ठेवून स्लायडिंग किंवा फोल्डिंग पार्टिशन लावून आपला ऑफिस सेटअप निर्माण करता येऊ शकतो.जाडजूड पडदा लावूनही अशी जागा तयार करता येऊ शकते. शक्यतो खिडकीजवळ ऑफिस सेटअप करावा, त्यामुळे नैसर्गिक सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा मिळू शकते. लाकडी पार्टिशनवर खर्च करायचा नसेल, तर घरातलेच एखादे कपाट किंवा कॅबिनेट ठेवून ऑफिसची जागा वेगळी करता येईल.

फर्निचर

तुमची गरज आणि कामाच्या स्वरूपाचा विचार करून डेस्क किंवा टेबलची रचना करावी. लॅपटॉपचा वापर करणाऱ्यांसाठी फोल्डिंग टेबल हा उत्तम पर्याय आहे. ज्यांना डेस्कटॉप वापरावा लागतो त्यांनी ३० इंच उंचीच्या टेबलची निवड करावी. टेबलला खण असल्यास अधिक चांगले. असे टेबल ऑनलाइन उपलब्ध आहेत शिवाय जवळपासच्या दुकानातूनही ते विकत घेता येतात. ऑफिस टेबलचा आकार गरजेप्रमाणे छोटा-मोठा असू द्या. या टेबलवर उपयुक्त वस्तूंव्यतिरिक्त इतर वस्तू ठेवणे टाळा. जागा असल्यास मुख्य टेबल व्यतिरिक्त कोपऱ्यात आणखी एक पर्यायी टेबल / डेस्क असावे. इतर फाइल्स तसेच कागदपत्रे, संगणकासाठीचे इतर साहित्य ठेवण्यासाठी ते खूप उपयुक्त होऊ शकते.जास्त फाइल्स अथवा कागदपत्रे ठेवावी लागत असल्यास बाजारात उपलब्ध असणारे ओपन फायलिंग रॅक खरेदी करता येतील. टेबलाजवळील भिंतीवर व्हाइट बोर्ड अथवा पिन अप बोर्ड लावून त्यावर वेळापत्रक डकवता येईल. शिवाय दिवसभरातल्या महत्त्वाच्या कामांच्या नोट्सही लावता येतील. टेबलजवळ चार्जिग पॉइंट असायला हवा. नसल्यास नवा पॉइंट बसवून घ्या. बाजारात मल्टिपल बोर्ड किंवा एक्स्टेंशन बोर्ड उपलब्ध असतात. त्यावर एकापेक्षा जास्त पोर्ट कनेक्ट करता येतात. डेस्कवर टेबल लॅम्प असल्यास रात्री उशिरापर्यंत काम करू शकाल आणि त्याचा इतर सदस्यांना त्रासही होणार नाही. ऑफिस सेटअपच्या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी टेबल फॅन अथवा कूलरही वापरू शकता.कामासाठी योग्य आसनव्यवस्था घरात उपलब्ध नसल्यामुळे पाठी, मानेची दुखणी अनेकांच्या मागे लागली आहेत. हे टाळण्यास घरातल्या नेहमीच्या खुर्चीवर बसून काम करणं टाळा. खास कार्यालयीन वापरासाठी मिळणारी, उंची कमी-जास्त करता येईल अशी खुर्ची निवडा. हा खर्च जास्त वाटत असेल, तर पाठीच्या कण्याची दुखणी जडल्यास उपचारांवर किती खर्च करावा लागेल, याचाही एकदा विचार करा.

वातावरणनिर्मितीसाठी

काम करण्याच्या जागी कायम सकारात्मक वातावरण असणे आवश्यक आहे. त्यातून उत्साह वाढतो आणि काम ठरलेल्या वेळेत आणि पूर्ण क्षमतेने करणे शक्य होते. तुम्ही बाल्कनीत ऑफिस सेटअप करत असाल तर तिथे एखादे रोप लावलेली कुंडी ठेवा. घरातील बंद खोलीत काम करणार असाल, तर तिथेही कमी प्रकाशात जगू शकणारे झाड लावता येईल. घरातील ऑफिस सेटअपमध्ये रंगसंगती फार महत्त्वाची असते. शक्य असल्यास हलक्या रंगछटांचा वापर करा. त्यामुळे ताजेतवाने आणि उत्साही वाटेल. भडक रंगसंगतीचा वापर आवर्जून टाळा. वॉलपेपरसाराखा स्वस्त-मस्त पर्यायही स्वीकारता येईल. भिंतीवर सकारात्मक संदेश किंवा दृश्ये असलेल्या फोटो फ्रेम्स लावा. त्यामुळे काम करण्यास प्रोत्साहन मिळू शकते. काम करण्याच्या जागी पुरेसा प्रकाश असणेही खूप आवश्यक आहे. खोलीत कमी प्रकाश असेल तर कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो. काम करताना वातावरणनिर्मितीसाठी तुम्ही तुमच्या आवडीचे संगीत तुमच्या लॅपटॉपवर अथवा डेस्कटॉपवर हळुवार आवाजात लावू शकता. त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल.

जुन्या वस्तूंना नवे रूप

साथीचे सावट किती काळ कायम राहील, हे सांगता येत नाही, मात्र कधी ना कधी ते सरणारच आहे. त्यामुळे घरात ऑफिस थाटताना जास्त खर्च करू नका. स्वस्त आणि फायदेशीर वस्तू घेण्यावर भर द्या. नवीन वस्तू घेणे शक्य नसल्यास रिसेलर्सशी संपर्क साधू शकता. घरामध्ये उपलब्ध असलेल्या, पण फारशा वापरल्या न जाणाऱ्या वस्तूंचा विविध प्रकारे वापर करता येतो. फक्त त्यासाठी थोडी कल्पकता आवश्यक असते. पेन, पेन्सिल ठेवण्यासाठी जुना कॉफी मग अथवा फुलदाणी वापरा. वृत्तपत्रे, साप्ताहिके, फाइल्स आणि इतर कागदपत्रे ठेवण्यासाठी टेबलशेजारी बास्केट ठेवता येईल, जेणेकरून महत्त्वाच्या वस्तू गहाळ होण्याची शक्यता टळेल आणि आवश्यक असतील तेव्हा त्या सहज मिळतील. ऑफिसला नेण्याची बॅग धूळ खात पडलेली असेल तर तिचा वापर महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी करता येईल.

मीटिंगची जागा

सहकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटता येत नसल्यामुळे व्हच्र्युअल मीटिंग्जना गेल्या दीड वर्षांत अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. अशा मीटिंग्जसाठी घरातील इतर सदस्यांचा वावर नसणारा कोपरा निवडावा. पुरेसा प्रकाश असलेली खिडकीसमोरची किंवा भिंतीजवळची जागा अशा चर्चासाठी योग्य ठरते. घरात लहान मुले असतील तर व्हिडीओ कॉलमध्ये व्यत्यय ठरलेलाच! त्यामुळे अशा वेळी बंद खोलीत कामाचा सेटअप लावा. मीटिंग्जच्या वेळी खोलीचा दरवाजा बंद ठेवावा. असे केल्याने घरातील इतर सदस्यांना तुम्ही कामात व्यग्र असल्याचे आपोआप समजते आणि तुमच्या मीटिंगमुळे त्यांचे दैनंदिन व्यवहार अडून राहात नाहीत.
वेळच्या वेळी ऑफिसला जाणे आणि सर्व सहकाऱ्यांबरोबर काम करणे हा एक वेगळाच अनुभव होता. टाळेबंदी कधी ना कधी संपेल आणि सर्वाना त्याचा पुन्हा एकदा अनुभव घेता येईल. पण तोपर्यंत तक्रारी, चिडचिड आणि तडजोडी करत बसण्यापेक्षा घरातल्या घरात स्वतच स्वतचे ऑफिस बांधून पाहायला काय हरकत आहे?

(लेखक इंटिरिअर डिझायनर आणि नेपथ्यकार आहेत.)
सौजन्य – लोकप्रभा